शेडनेट व
हरीतगृह उभारणी सेवा
पुरवठादारांनी नोंदणी
करावी
नांदेड दि. 28 :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2018-19 अंतर्गत जिल्ह्यात हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी करणाऱ्या सेवा पुरवठादारांनी जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्याकडे नोंदणी करावी.
प्रस्ताव सेवा पुरवठादार नोंदणीसाठी पुढील प्रमाणे अटी व शर्ती राहतील. हरितगृह, शेडनेट हाऊस उभारणी शेतकऱ्यांना गुणवत्तापुर्ण, दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी सेवा पुरवठादार हा जीएसटी नोंदणीकृत असावा. शॉपॲक्ट प्रमाणपत्रधारक असणे बंधनकारक आहे. सेवा पुरवठादारास हरितगृह / शेडनेट हाऊस उभारणीचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा. तसेच मागील 3 वर्षाची उलाढाल प्रतिवर्षी कमीतकमी एक कोटी रुपये असावी. त्या पुष्टयर्थ सेवा पुरवठादारास मागील लगत तीन वर्षाचा सनदी लेखापालाने प्रमाणित केलेला आर्थिक ताळेबंद सादर करावा लागेल व वर्षवार यापूर्वी उभारणी केलेल्या हरितगृह / शेडनेट हाऊस लाभार्थ्यांच्या याद्या सादर करणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सुचनेत नमुद असलेल्या मॉडेलनिहाय डिझाईनप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरुन हरितगृह / शेडनेटगृह उभारणी करण्याबाबतचे विहीत नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-13) सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. तसेच हरितगृह / शेडनेट हाऊसच्या सांगाड्याची पाच वर्षाची वॉरन्टी द्यावी लागेल (सेवा पुरवठादाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). जी आय पाईपच्याबाबत IS 1161:2014 या मानांकनाच्या जी आय पाईपचे अधिकृत वितरक किंवा अधिकृत विक्रेता असल्याबाबतचे पुरावा व प्रमाणपत्र सेवा पुरवठादाराने द्यावे लागेल. शेडनेट (टेपनेट / मोनोनेट), इन्सेक्ट नेट, पॉली फिल्म इत्यादी साहित्य बिआयएस मानांकाप्रमाणे पुरवठा करण्याबाबतचे हमीपत्र (प्रपत्र - 13) द्यावे लागेल. त्यासाठी उत्पादकाचे अधिकृत वितरक / विक्रेता असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नेट/फिल्म याबाबत 1 वर्षाची गॅरंटी (बदलून देणे) व 2 वर्षाची वॉरंटी द्यावी लागेल. (सेवा पुरवठाराच्या खर्चाने दुरुस्ती करुन देणे) (नैसर्गीक आपत्ती, विध्वंसक प्रवृत्ती वा तत्सम कारणे वगळून). 7) पॉली फिल्मच्याबाबत आयातीत पॉली फिल्म वापरणार असल्यास अधिकृत आयातदार किंवा अधिकृत आयातदाराचे वितरक किंवा विक्रेता असल्याबाबत संबंधीत आयातदाराचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पॉली फिल्मच्याबाबत उत्पादकाने प्रमाणित केलेले तांत्रिक माहितीचे विविरण पत्र (Technical data sheet), पॉली फिल्मचा दर्जा व गुणधर्माबाबतचे प्रमाणपत्र तसेच सिपेट या संस्थेचा 6 महिन्यांपेक्षा जुना नसलेला तांत्रिक तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक राहील. सेवा पुरवठादाराची नोंदणी ही साहित्य पुरवठ्यासह संपूर्ण हरीतगृह/शेडनेटगृह उभारण्यासाठी करावयाची असून केवळ साहित्य पुरवठ्यासाठी नाही.
आदी अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पुरवठादारांस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातर्फे नोंदणी क्रमांक आणि नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment