Wednesday, July 25, 2018


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 27 जुलै 2018 पासून घोषित करण्यात येत आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शुक्रवार 27 जुलै 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 26 ऑगस्ट 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड, दि. 25 :- जिल्ह्यात गुरुवार 26 जुलै 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 9 ऑगस्ट 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी सूचना  
नांदेड , दि. 25 :- गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कापुस जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक, कापुस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ व तालुका कृषि अधिकारी यांची सभा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड येथे नुकतीच घेण्यात आली. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या सभेत पुढील प्रमाणे सुचना देण्यात आल्या.  मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करुन कुठेही गुलाबी बोंडअळीचे पतंग तयार होऊन प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिनिंग मिलमधील किडके बियाणे त्वरीत नष्ट करण्यात यावेत. पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकी पासून झाड उगवू देऊ नये. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाऱ्या पतंगाची गणना करुन तालुका कृषि अधिकारी यांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापडळे सायं 6 ते 11 या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग जमा होतील असे पहावे. कृषि उत्पन्न बाजार समिती व जिनिंग मालक यांनी त्यांच्या परिसरात 2 हजार शेतकऱ्यांना कामगंध सापळे ल्युर्स उपलब्ध करुन दयावे. याप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या मिलधारकावर क्रिमीनल पिनल कोड 133 अंतर्गत (सार्वजनिक हितास बाधा पोहचवणे) कायदेशीर कार्यवाही तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे पर्यावरण कायदा अंतर्गत परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल व सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.  
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी आभार मानले. कापुस संशोधन केंद्राचे कापुस विशेष डॉ. बेग, डॉ. तेलंग, डॉ. पांडागळे, ग्रेडर श्री. सुर्यवंशी, श्री. माने तसेच कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. शिंदे, प्रा. कल्याणकर, प्रा. तुरखडे उपस्थित होते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
000000

Tuesday, July 24, 2018


घोगरवाडी या गावातील प्रश्न मार्गी लावावेत  
 --- किरण कुलकर्णी
नांदेड , दि. 24 :- घोगरवाडी ता. किनवट या गावातील प्रश्न मार्गी लावावेत. ग्रामसेवक , तलाठी यांनी कोलाम, प्रधान, गोंड या प्रवर्गाच्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ग्रामसेवक व तलाठी यांनी या नागरिकांना कायद्याची माहिती करुन द्यावी. विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती करुन देण्यात यावी. आणि योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी सांगितले.  
पुणे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक तथा सचिव विशेष तपासणी समिती किरण कुलकर्णी यांनी घोगरवाडी ता. किनवट या गावास भेट दिली.  गावातील नागरिकांनी पारंपरिक पध्दतीच्या ढेमसा हे नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले. 
नांदेड जिल्ह्यामध्ये तसेच औरंगाबाद महसूल विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेवून अनुसूचित जमातीच्या बोगस जात प्रमाणपत्रे , अवैध मार्गाने अनुसूचित जमातीची बनावट जात प्रमाणपत्रे व पडताळणी समितीचे बनावट आदेश, न्यायालयाचे बनावट आदेश / निर्णय तयार करणे इत्यादीची सखोल तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली किनवट उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत नागरिकांच्या अडीअडचणींचे सखोल चर्चा करुन तसेच पुरावे दाखल करणे, अन्य विविध विषयांच्या मुद्द्यावर  चर्चा करण्यात आली. तसेच समितीच्या कामकाजासंदर्भात निवेदने स्वीकारण्यात आली.  
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय आयुक्त कार्यालय , औरंगाबाद उपजिल्हाधिकारी (मागासवर्ग कक्ष) सरिता सुमात्रे, किनवट उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार नरेंद्र देशमुख, गटशिक्षणाधिकारी पी.टी. जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस. आर. बारसे, वरिष्ठ संशोधन अधिकारी विजयकुमार कटके आदि संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
0000
 



Sunday, July 22, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड , दि. 22 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 23 जुलै 2018 रोजी दारव्हा येथून खाजगी वाहनाने  पुसद, महागाव, वारंगा मार्गे  दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे समवेत महाराजस्व अभियान संदर्भात चर्चा. सायंकाळी 5.30 वा. खाजगी वाहनाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेडकडे प्रयाण. सायं. 6 वा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आषाढी महोत्सव 2018 या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ-  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडीयम नांदेड. सोईनुसार खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण आगमन व राखवी.
मंगळवारी 24 जुलै 2018 रोजी सकाळी 10 वा. खाजगी वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.25 वा. नांदेड विमानतळ येथे आगनम व राखीव. सकाळी 10.50 वा. टुजेट विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड , दि. 22 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 
सोमवार 23 जुलै 2018 रोजी  जालना येथून सायं 5 वा. नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या आषाढी महोत्सव या कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. मंगळवार 24 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. नांदेड येथून जालनाकडे प्रयाण करतील.
0000


लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे
प्र. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड , दि. 22 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्य या मासिकाच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्रीमती ढालकरी यांनी लोकराज्य ‘आषाढी वारी’ विशेषांक वाचकांसाठी वाचनीय असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोल्लू, जिल्हाधिकारी कार्यालयातील बालाजी पांचाळ, प्रसाद शिरपूरकर, भगवान देवसरकर, शिवानंद स्वामी, के. के. मेहकरकर, आर. टी. पोहरे, बालाजी चौहान तसेच छायाचित्रकार महेश होकर्णे, मोहम्मद हाजी, जिल्हा माहिती कार्यालयाचे काशिनाथ आरेवार, महमंद युसूफ आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
हा लोकराज्य विशेषांक जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून लोकराज्य (मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. ही वर्गणी जिल्हा माहिती कार्यालय सिद्धी विनायक मंदिराजवळ विसावानगर नांदेड येथे भरता येईल. जास्तीतजास्त नागरिकांनी हा विशेषांक संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...