Tuesday, September 5, 2017

जिल्ह्यातील हातमाग विणकराची माग तपासणी   
नांदेड, दि. 5 :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत हातमाग विणकरांना अर्थसहाय्य दिले आहे. या सहकारी संस्था चालू अथवा बंद आहेत याबाबत आढावा घेण्याच्या अनुषंगाने सन 2017-18 साठी जिल्ह्यातील हातमाग विणकरांची माग तपासणी 4 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर या कालावधीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी कळविले आहे.
 हातमाग विणकाराची माग तपासणी करण्यासंबंधी संचालक, (वस्त्रोद्योग), नागपुर यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार या संस्थांची माग तपासणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी नियुक्त केलेल्या पथकामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हयातील सबंधित सर्व हातमाग सहकारी संस्थांनी याची नोंद घेऊन तपासणी पथकास सहकार्य करावे. तसेच अधीक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02462-284886 वर अथवा प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड  यांनी केले आहे.

000000

Monday, September 4, 2017

नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक
पातळीवरच निराकरण करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 4 :- नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये यावे लागू नये यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवरच संबंधीत अधिकाऱ्यांने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, कृषि उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे दिलीप शिरपुरकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये नागरिकांना सातत्याने यावे लागू नये यासाठी तालुका किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे तक्रारीचे निराकरण झाले पाहिजे. "आपले सरकार" वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या लोकशाही दिनी दाखल नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत अधिकाऱ्यांना अनुषंगीक कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
000000


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 4 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आयोजित बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेतला.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तसेच क्रीडा, शिक्षण, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात येणार आहे. सर्व विभागांना नेमुन देण्यात आलेली कामे यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
000000  
सोयाबीन, कपाशीवरील
किड संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 4 :- जिल्हयात  सोयाबीन / कापुस पिकासाठी कि ड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे.
सोयाबीनवरील चक्री भुंगा, उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी स्पानोटोरोम 11.7 एस.सी. 9 मिली  किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी  बोंडअळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. यासाठी फेरोमनट्रप्स (पेक्टीनो लुर्स) एकरी 5 लावावेत. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फलोनीकमाइड 50 डब्लु. जी  2 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
गणेश मंडळ, नागरीकांनी गोदावरी नदीसह
जलसाठ्यांच्या ठिकाणी दक्षता घ्यावी
नांदेड, दि. 4 :- श्री गणेश मुर्तीं विसर्जन दरम्‍यान जिल्ह्यातील गणेश मंडळ व नागरीकांनी गोदावरी नदीसह सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी सावधगिरीची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
      मंगळवार 5 सप्‍टेंबर 2017 रोजी नांदेड शहर व जिल्‍हयातील श्रीमुर्तींचे विसर्जन होत आहे. या दरम्‍यान सर्व गणेश मंडळ व सहभागी भाविकांनी विसर्जन स्‍थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी कुठल्‍याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगावी.  
सध्‍या हवामान खात्‍याने राज्‍यासह मराठवाड्यात पर्जन्‍यमानाचा इशारा वर्तविला आहे. जिल्‍हयातील गोदावरी नदीची पाणी पातळी उंचावलेली आहे. जायकवाडी प्रकल्‍प 78  टक्‍के व शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प जवळपास शंभर टक्‍के भरला आहे. पाण्‍याचा येवा सुरु झाल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा या प्रकल्‍पांद्वारे केंव्‍हाही विसर्जित करण्‍यात येऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व गणेश भक्‍तांनी श्री मुर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावे. याबाबत भाविक, गणेश मंडळ व स्‍थानीक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.   
000000


गणेश मंडळ, नागरीकांनी गोदावरी नदीसह
जलसाठ्यांच्या ठिकाणी दक्षता घ्यावी
नांदेड, दि. 4 :- श्री गणेश मुर्तीं विसर्जन दरम्‍यान जिल्ह्यातील गणेश मंडळ व नागरीकांनी गोदावरी नदीसह सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी सावधगिरीची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
      मंगळवार 5 सप्‍टेंबर 2017 रोजी नांदेड शहर व जिल्‍हयातील श्रीमुर्तींचे विसर्जन होत आहे. या दरम्‍यान सर्व गणेश मंडळ व सहभागी भाविकांनी विसर्जन स्‍थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी कुठल्‍याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगावी.  
सध्‍या हवामान खात्‍याने राज्‍यासह मराठवाड्यात पर्जन्‍यमानाचा इशारा वर्तविला आहे. जिल्‍हयातील गोदावरी नदीची पाणी पातळी उंचावलेली आहे. जायकवाडी प्रकल्‍प 78  टक्‍के व शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प जवळपास शंभर टक्‍के भरला आहे. पाण्‍याचा येवा सुरु झाल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा या प्रकल्‍पांद्वारे केंव्‍हाही विसर्जित करण्‍यात येऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व गणेश भक्‍तांनी श्री मुर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावे. याबाबत भाविक, गणेश मंडळ व स्‍थानीक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.   
000000


Saturday, September 2, 2017

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर  
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यात नोव्‍हेंबर व डिसेंबर 2017 या महिन्यात मुदत संपणाऱ्या 171 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  या निवडणुकीचे मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा  परिषद पंचायत समिती  निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.  
जिल्ह्यात निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. माहुर- 26, किनवट- 48, हिमायतनगर- 1,  हदगाव- 6 अर्धापूर- 2, नांदेड- 7, मुदखेड- निरंक, भोकर- 3 उमरी- 1, धर्माबाद- 3, बिलोली- 9, नायगाव खै.- 7, लोहा- 28, कंधार- 15, मुखेड- 15, देगलूर- निरंक याप्रमाणे एकुण 171 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.  
निवडणुक कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. तहसिलदार निवडणुकीची नोटीस गुरुवार 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करतील. नामनिर्देशन पत्रे मागविण्‍याचा व सादर करण्‍याचा कालावधी (‍ नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) शुक्रवार 15 ते 22 सप्टेंबर 2017 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत राहील. सार्वजनिक सुट्टीचा 17 व 21 सप्टेंबर हा दिवस वगळून राहील. नामनिर्देशनपत्र छाननी (नमुना अ अ.मध्‍ये नमूद केलेल्‍या ठिकाणी) सोमवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 पासून ते छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्‍यासाठी (नमुना अ अ मध्‍ये नमुद केलेल्‍या ठिकाणी) बुधवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द बुधवार 27  सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर. आवश्‍यक असल्‍यास मतदान शनिवार 7 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होईल. मतमोजणी सोमवार 9 ऑक्टोंबर 2017 रोजी. (मतमोजणीचे ठिकाण, वेळ जिल्‍हधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्‍यानुसार राहील) निवडणुकांचा निकाल बुधवार 11 ऑक्टोंबर 2017 रोजी प्रसिध्‍द करण्यात येईल.
कार्यक्रम पत्रातील परिच्छेद क्र. 2 मध्‍ये नमुद केल्‍यानुसार पहिल्‍या टप्‍प्‍यात फक्‍त ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 13 जिल्‍हयातील 114 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्‍याप्रमाणे किनवट तालुक्‍यातील 4 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम कार्यान्‍वीत आहे. या निवडणूकीमध्‍ये प्रथमतः सरपंच पद थेट पध्‍दतीने निवडून द्यावयाचे असल्‍याने निवडणूक आचारसंहितेच्‍या अंमलबजावाणीबाबत विशेष उपाययोजना करण्‍यात येणार आहे.  तसेच प्रत्‍यक्ष मतमोजणीच्‍यावेळी संवेदनशील मतमोजनी केंद्राच्‍या परिसरात विशेष पोलीस बंदोबस्‍त पुरविण्‍यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे जिल्‍हयात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.
आचारसंहिता : सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये शुक्रवार 1 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्‍वात राहील. निवडणुका निर्भय, मुक्‍त व पारदर्शक वातावरणामध्‍ये होणे आवश्‍यक असल्याने राज्‍य निवडणूक  आयोगाने 14 ऑक्टोंबर 2016 रोजी निर्गमित केलेल्‍या आचारसंहिता विषयक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत  सर्व तहसिलदार यांना सुचित करण्‍यात आले आहे.
आचारसंहिता पुढील ग्रामीण क्षेत्रामध्‍ये लागू राहील : ज्‍या जिल्‍हयामध्‍ये 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूका आहेत त्‍या संपूर्ण जिल्‍हयामध्‍ये आचारसंहिता लागू राहील.  ज्‍या तालुक्यात 50 टक्‍के किंवा त्‍यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका आहेत त्‍या संपूर्ण तालुक्‍यात आचारसंहिता लागू राहील. निवडणुका असलेल्‍या ग्रामपंचायतीच्‍या सीमेलगत गावामध्‍ये सुध्‍दा आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्‍हा, तालुका, लगतच्‍या गावामध्‍ये लागू असेल तरी जेथे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुका नसतील त्‍याठिकाणी विकासाच्‍या विविध कामावर कसलाही निर्बंध राहणार नाही. मात्र या क्षेत्रात अशी कोणतीही कृती कोणालाही करता येणार नाही. ज्‍यामुळे निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीच्‍या मतदारांवर विपरीत प्रभाव पडेल, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...