Monday, September 4, 2017

नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक
पातळीवरच निराकरण करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 4 :- नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये यावे लागू नये यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवरच संबंधीत अधिकाऱ्यांने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, कृषि उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे दिलीप शिरपुरकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये नागरिकांना सातत्याने यावे लागू नये यासाठी तालुका किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे तक्रारीचे निराकरण झाले पाहिजे. "आपले सरकार" वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या लोकशाही दिनी दाखल नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत अधिकाऱ्यांना अनुषंगीक कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...