Thursday, June 22, 2017

लोकशाही दिनाचे 3 जुलै रोजी आयोजन
नांदेड, दि. 22 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 3 जुलै 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपिलातील सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तसेच तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल, तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
अध्यापक महाविद्यालयात योग दिन साजरा
नांदेड, दि. 22 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात योग दिन  21 जुन रोजी साजरा करण्यात आला. "संतुलीत मन, आत्मविश्वास आणि चांगल्या जीवनासाठी योग" याबाबत प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी संकल्पना मांडली. 
यावेळी ओंकार, प्रार्थना, शिथिलीकरण अभ्यास, विविध आसने आदींचा यात समावेश होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगा अभ्यास केला. शेवटी डॉ. एस. एम. साखरे यांनी आभार मानले.

000000

Wednesday, June 21, 2017

तणाव मुक्त जीवनासाठी योग करावा  
- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम
नांदेड दि. 21 :-  तणाव मुक्त जीवनासाठी योग अत्यंत उपयोगी असून प्रत्येक व्यक्तीने दररोज  किमान 30 मिनिटे योग करावा, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात अंबिका योग कुटीर प्रशिक्षण केंद्रातील तज्ज्ञ  प्रशिक्षकामार्फत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षक संस्थेचे सचिव एस. टी. खरात, सहसचिव जे. एस. जाधव यांनी विविध प्रकारच्या आसनाच्या माध्यमातून योगाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी  डॉ. दीपक हजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झापुरे, डॉ. वाघमारे, डॉ. शिरसिकर, डॉ. एच. के. साखरे यांची उपस्थिती होती. 

000000
वाद तंट्यातील मध्यस्थीची भुमिका 
साधु संतासारखी  - न्या. मांडे
नांदेड दि. 21  :- कोणत्याही प्रकारचे वादविवादात किंवा तंट्यामध्ये व्यक्ती कोणतीही अपेक्षा न करता झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करतो व परिणामी वाद मिटतो त्यावेळी त्याने केलेली मध्यस्थीची भुमिकाही साधु संताएवढी असते , असे प्रतिपादन न्या. व्ही. के. मांडे यांनी केले.   
जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत मध्यस्थीची जागरुकता  निर्माण करण्यासाठी मुख्य मध्यस्थी केंद्र मुंबई यांचे सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सभागृह येथे मध्यस्थी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थावरुन मार्गदर्शन करताना न्या. मांडे बोलत होते. 
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. डी. टी. वसावे म्हणाले की , मध्यस्थीची संकल्पना ही समाजात रुढी, परंपरेने सुरु झाली आहे. मध्यस्थीला ईश्वराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पुढे नागरिक पंचासमक्ष वाद-विवाद, तंटा मिटवू लागले. स्वातंत्र्यानंतर भारतात कायदाचे राज्य आले आणि दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये कलम 89 (डी) मध्ये मध्यस्थीला स्थान देण्यात आले. त्यानुसार न्यायालयात वाद-विवादाने प्रकरणे निकाली निघत आहेत.  यावेळी जेष्ठ विधीज्ञ व्ही. ए. नांदेडकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, अॅड. पाटनुरकर, अॅड. एम. एल. गायकवाड, अॅड. सुकेशनी वासणीक यांच्यासह अनेक ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांनी केले.
00000


यांत्रिकीकरण मागणी अर्जाची
कासराळीत आज सोडत ; शेतकऱ्यांना आवाहन
            नांदेड दि. 21  :- "उन्नत शेती समृद्ध शेतकरी" कार्यक्रमांतर्गत प्राप्त अर्जातील लाभार्थ्यांची सोडतीद्वारे गुरुवार 22 जून 2017 रोजी निवड करण्यात येणार आहे.  ही सोडत सकाळी 10 वा. फळरोप वाटिका कसराळी येथे ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी गोंडेस्वार यांनी केले आहे. 
            कृषि विभागामार्फत "उन्नत शेती समृद्ध शेतकरी" कार्यक्रम सन 2017-18 मध्ये राबविण्यात येत आहे.  यात यांत्रिकीकरण घटकासाठी ट्रॅक्टर व शेती उपयोगी विविध औजारे घेऊ इच्छिणाऱ्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  या योजनेस शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून 177 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

000000
  उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही 
अवैध दारु जप्त , 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
नांदेड दि. 21  :-  राज्य उत्पादन शुल्क नांदेड शहर विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून नुकतेच चिकाळा तांडा, मुदखेड शहर, भोकर तालुक्यातील गारगोटवाडी, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद, देगलूर तालुक्यातील लोणीतांडा व मरखेड याठिकाणी 16 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
यावेळी अवैध देशी दारु 24 लिटर, हातभट्टी दारु 230 लीटर व रसायन 2 हजार 460 लीटर जाप्त करण्यात आले. या मोहिमेत 74 हजार 961 रुपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला असून मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
या मोहिमेत प्रभारी अधीक्षक डी. एन. चिलवंतकर यांच्या समवेत निरीक्षक एस. एस. खंडेराय, पी. ए. मुळे, आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, बी. एस. मुंडलवाड, व्ही. व्ही. फुलारी, पी. बी. गोणारकर, के. के. किरतवाड, के. आर. वाघमारे, कोरनुळे, फाळके, दासरवार, संगेवार, इंगोले, अन्नकाळे, यु. डी. राठोड, अमोल राठोड, नंदगावे, एफ. के. हतीफ, डी. के. जाधव, आशाताई घुगे यांचा सहभाग होता.

000000
जप्त रेतीसाठ्याचा नांदेड तहसिल
कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 21 -  नांदेड तालुक्यातील विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून रहाटी, सोमेश्वर, नाळेश्वर, वाघी येथील अंदाजे 11 हजार 680 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याचा जाहीर लिलावाची दुसरी फेरी व गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागापूर येथील 3 हजार 115 ब्रास रेतीसाठ्याचा जाहीर लिलावाची तीसरी फेरी गुरुवार 22 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाणी रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...