Monday, April 17, 2017

उष्‍णतेच्या लाटेबाबत नागरिकांना सतर्कता बाळगावी,
आरोग्याची काळजी घ्‍यावी – जिल्‍हा प्रशासन

     नांदेड, दि. 17 :- भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील कुलाबा वेधशाळेने मंगळवार 18 एप्रिल 2017 पासुन उष्‍णतेच्‍या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविल आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना इशारा देतानाच, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे..   
    या जाहीर आवाहनात जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की, उन्हापासून बचावाच्या उपाययोजना करण्याकडे लक्ष देण्यात यावे. उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच, सावलीमध्ये बसणे आणि भरपुर पाणी पिणे असे उपाय करावेत. उष्‍माघाताचा रुग्‍ण आढळल्‍यास तात्‍काळ शासन रुग्‍णवाहीका 108 क्रमांकाशी संपर्क साधुन जवळच्‍या रुग्‍णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे. उष्‍णतेच्‍या लाटेपासुन कोणत्‍याही प्रकारची जीवित‍हानी होऊ नये यासाठी महानगरपालिका आणि शासकीय आरोग्य यंत्रणेशी समन्‍वय साधुन उष्‍णतेच्‍या लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्‍या तसेच यंत्रणा सज्‍ज ठेवावयाच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. उष्‍णतेची तीव्रता आणि तापमानात अचानक होणा-या  वाढीबाबत नागरीकांनी, शेतक-यांनी व विदयार्थ्‍यांनी सतर्कता बाळगावी.
000000
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या
वर्धापन दिनाची पूर्वतयारी बैठक संपन्न 
नांदेड दि. 17 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 वा वर्धापन दिन सोमवार 1 मे 2017 रोजी असून त्यासाठीच्या मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभाची पूर्वतयारी बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या दालनात संपन्न झाली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपा अभियंता श्री. कदम, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, पोलीस निरीक्षक अरमान तडवी, तहसिलदार ज्योती पवार तसेच शिक्षण, क्रीडा, विद्युत विभाग, पोलीस प्रशासन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य शासकीय ध्‍वजवंदन समारंभ सोमवार 1 मे 2017 रोजी सकाळी 8 वा.  पोलीस मुख्‍यालय कवायत मैदान वजिराबाद येथे होणार आहे. या मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभास सर्व नागरिकांना उपस्थित रहाता यावे म्हणून सकाळी 7.15 ते 9 या कालावधीत ध्वजवंदनाचा किंवा इतर शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ करण्‍यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्‍थेला आपला स्‍वतःचा ध्‍वजवंदन समारंभ करावासा वाटल्‍यास त्‍यांनी तो समारंभ सकाळी 7.15 च्‍या पूर्वी किंवा सकाळी 9 च्‍या नंतर करावा, असेही यावेळी सूचित करण्यात आले.  
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पोलीस मुख्‍यालय कवायत मैदान येथील सुविधा, ध्‍वजवंदन समारंभासाठीची सुरक्षा व्यवस्था, पोलीस बँण्ड, कवायत मैदानाची साफ-सफाई,  बैठक व्यवस्था, शामियाना उभारणी, ध्वनीक्षेपण, वाहन व्‍यवस्‍था तसेच अनुषंगीक बाबींचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ध्‍वजवंदन चबुत-याची आणि खांबाची रंगरंगोटी, मुख्‍य शासकीय ध्‍वजवंदन कार्यक्रमाच्‍या मार्गावरील रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती, डागडुजीचे कामे करुन घेण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले. 
या समारंभात शासन निर्णय, परिपत्रकानुसार प्रदान करावयाच्या पुरस्काराबाबत संबंधीतांची नावे रविवार 23  एप्रिल 2017 पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत, असे निर्देशीत करण्यात आले.
प्‍लॉस्‍टीकच्‍या ध्‍वजावर निर्बंध असल्‍यामुळे शालेय विद्यार्थी, नागरीकांकडून प्‍लॉस्‍टीकच्‍या ध्‍वजाचा वापर होणार नाही. असे ध्‍वज इतरत्र रस्‍त्‍यावर दिसून येणार नाहीत याबाबत नागरीकांसह संबंधीत विभागांनी दक्षता घ्‍यावी अशी सूचना देण्यात आली.  बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000000

तोडकर / आरेवार 17.4.2017

Friday, April 14, 2017

डिजीधन.. निजीधन व्हावे.. : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नागपुरातील डिजीधनच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात
नांदेडमध्ये पीओएस, पीडीएमस मशिन्सचे वितरण


नांदेड दि. 14 :- डिजीधन यापुढे निजीधन व्हावे. याद्वारे डिजीटल इंडियासाठी तरूण पुढे येतील, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथे निती आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि त्यानिमित्ताने नांदेड येथे डिजीधन उपक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील होते. यात डिजीधन उपक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. तसेच व्यावसायिकांना पीओएस मशिन्स, रास्तभाव दुकानदारांना ईपीडीएमएस उपकरणांचेही वितरण करण्यात आले.
नियोजन भवनमधील कॅबिनेट हॅालमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, कोषागार अधिकारी मनोज गग्गड, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, राष्ट्रीय विज्ञान सुचना कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील पोटेकर, उद्योजक हर्षद शहा यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
सुरवातीला प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना 126 व्या जयंती दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले. रोकडरहित (कॅशलेस) व्यवहाराबाबतचे निती आयोगाच्या चित्रफितींही प्रदर्शित करण्यात आल्या.  ॲक्सीस बँकेचे गितेश जगताप व रत्नदिप करुमभट्टे, एचडीएफसी उपप्रबंधक विकास सोळंके यांनी विविध बँकीग मधील डिजीटल प्रणालींची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक संदिप अल्लापूरकर यांनी भिम ॲपबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  मान्यवरांच्या हस्ते आशिष मेडिकल, शिवाजीनगर, कृष्णा अव्हेन्यु, कुमार रेडीमेड, तिरुपती ॲटोमोबाईल्स, धनलक्ष्मी कॅासमेटीक्स, बीएसएनल यांना प्वाईंट आँफ सेल (पीओएस) मशिन्सचे तर नांदेड सेवा, को. आँप कंझ्युमर स्टोअर, ज्ञानेश्र्वर, उकरडे, ताहेर खाँन समशेर खाँन, हमदर्द स्टोअर्स ॲड, हातमाग विणकर सह. संघ, यु. बी. कल्याणकर, योगेश कमलाकर, भिमसिंह हजारी, नजिरोद्दीन तडवी, हारूण मलंग, कलिम अहेमद यांनी ईपीडीएमस मशिन्सचे वितरण करण्यात आले.
डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित घोषवाक्य व वक्तृ्त्व स्पर्धेतील विजेते पुरुषोत्तम व्यंकटराव बरडे, ऋषिकेश डांगे, गजानन शिंदे, जाकीर अहेमद अली, उमर जिबरन फारूकी, अश्विनी आप्पाराव जाधव, सरस्वती मकरंद दिवाकर तसेच नांदेड तहसिलस्तरावरील स्पर्धेसाठी विदीशा हनमंते, किशन टोणगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. तसेच डिजीधन मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल ॲक्सीक बँकेचे अविनाश देवरे, एचडीएफसीचे स्वप्नील पाटणी, जनजागृतीसाठी व्हिएलई नायगावचे शेख सलिम, लोहाचे माधव फुलवरे, अर्धापुरचे मिर्झा अबुझर ऊल्लाबेग यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने श्रीमती स्वाती अलोने तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे तसेच उद्योजक श्री. शहा यांची समयोचित भाषणे झाली. नागपूर येथे निती आयोगाच्यावतीने आयोजित भिम ॲप आधारच्या अवतरणानिमित्त (लाँचिग) आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास बँकीग क्षेत्रातील अधिकारी, तसेच विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, व्यावसायीक, नागरिक आदी उपस्थित होते.

0000000
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर 126 वी जयंती
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
अभिवादनासाठी उसळला जनसागर
मिरवणुका, प्रभात फेऱ्या, ज्ञान दिनानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन

नांदेड दि. 14 :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अलोट जनसागराने मिरवणुका, प्रभात फेऱ्या तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन केले. डॅा. आंबेडकर यांच्या अभिवादनासाठीचा कार्यक्रम, उपक्रमांनी शहर-जिल्ह्यात दिवसभर लगबग राहिली. प्रभातफेऱ्या, प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्याने-विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. राज्य सरकारने 14 एप्रिल हा दिवस भारतरत्न डॅा. आंबेडकर यांच्या अद्वितीय विद्वत्तेला अभिवादनासाठी यापुढे "ज्ञान दिन" म्हणून साजरा करण्याचेही निश्चित केले आहे. या ज्ञान दिनानिमित्तही डॅा. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शन, पुस्तकांचे, चरित्राची ओळख करून देणाऱ्या पुस्तिकांचे वाटप असे उपक्रमही आयोजित करण्यात आले.
जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच शहरासह, जिल्ह्यातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारासह शहरातील डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात नागरिक एकत्र आले. पुतळ्यास अभिवादन करतानाच, शहर आणि परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
डॅा. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सामजिक न्याय व समता सप्ताहाचा आज जंयती दिनी अभिवादनाने समारोप करण्यात आला. त्यासाठी सकाळी विविध संघटना, संस्था यांच्यावतीने डॅा. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांनाचे प्रमुख आदींनीही अभिवादन केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी डॅा. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी उपस्थितांना डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले, तसेच जयंती दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तहसिलदार किरण अंबेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.
दिवसभरही नांदेड शहरात मिरवणुका, रॅली यांचा जल्लोष राहिला. आयटीआय चौक येथील महात्मा ज्योतिबा पुतळा चौकातून अनेक पदफेऱ्या, दौड काढण्यात आल्या. यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांनाही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुका, पदफेऱ्या यांच्यात सहभागींसाठी शहरातील विविध मार्गा-मार्गावर ठिक-ठिकाणी संस्था, संघटना, उत्सव मंडळांनी उत्स्फुर्तपणे पिण्याचे पाणी, फराळ, फळे वाटप केले. मिरवणुकांसाठी शहरातील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला पर्यायी मार्ग देऊन , उत्कृष्ट नियोजन केले. तसेच गर्दीच्या ठिकाणी आणि मिरवणुकीतील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला.

0000000

Thursday, April 13, 2017

कला प्राविण्यासाठीच्या वाढीव गुणाबाबत
दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड, दि. 13  :-  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्च 2018 च्या परीक्षेपासून शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य व लोककला प्रकारात सहभागासाठी वाढीव गुण देण्यात येणार आहेत. त्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर प्रगटनाद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, पालक आदींना गुण देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सुचित केले आहे. त्यानुसार संबंधीत मुख्याध्याकांनी मार्च 2017 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव गुरुवार 20 एप्रिल 2017 पर्यंत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावेत. तर संबंधीत मुख्याध्यापकांनी रविवार 30 एप्रिल 2017 पर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करावेत. एखादा विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये कलाविषयक व क्रीडा विषयक शिक्षण घेत असल्यास व एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत असल्यास त्याला सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कमाल मर्यादा 25 गुणांची आहे. याची नोंद घेवून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळांनी याबाबतचा 1 मार्च 2017 च्या शासन निर्णयाची नोंद घेऊन व त्यातील वाढीव गुण देण्याच्या कार्यपद्धतीची नोंद घेवून वेळेत कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी गुणाच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्यावतीने लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

0000000
जि. प. शिक्षकांना भविष्य निर्वाहबाबत आवाहन
नांदेड, दि. 13  :- जिल्हा परिषद नांदेडकडील शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र तसेच या निधीवरील अग्रीम याबाबत गटविकास अधिकारी स्तरावरच कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे लोहा पंचायत समिती वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शिक्षकांनी अग्रीमाचे धनादेश प्राप्त करुन घेण्यासाठी तसेच विवरणपत्रासाठी जिल्हा परिषद नांदेडकडे येण्याची आवश्यक नसल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कळविले आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत शिक्षकांचे ( पंचायत समिती लोहा वगळून ) भविष्य निर्वाह निधी वार्षीक विवरणपत्र गट शिक्षणाधिकारी स्तरावर ( तालुकास्तर ) ईमेलद्वारे पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आपले भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक विवरणपत्र गटस्तरावर उपलब्ध करुन घ्यावेत. भविष्य निर्वाह निधी वार्षीक विवरणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. पंचायत समिती लोहा अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी वार्षिक विवरणपत्र लवकरच गट शिक्षणाधिकारी लोहा यांच्याकडे पुरविण्यात येतील.
भविष्य निर्वाह निधी अंतर्गत उचल करण्यात येणारी अग्रीम, रक्कमा धनाकर्षाद्वारे अदा करण्यात येतात. हे धनाकर्ष गटविकास अधिकारी स्तरावर (पंचायत समितीस्तर ) पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे हे धनादेश प्राप्त करुन घेण्यासाठी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयात येण्याची आवश्यक नाही, याची नोंद घ्यावी, असेही आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे. 

0000000
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 13  :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा क्रीडा पुरस्कार 2016-17 वितरणासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, गुणवंत खेळाडू पुरस्कार-दोन ( महिला-1 व पुरुष-1 ) यांच्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन करुन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रस्ताव मागविणे व परीपूर्ण पस्ताव सादर करण्यासाठी अर्ज शनिवार 15 एप्रिल ते सोमवार 24 एप्रिल 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, स्टेडीयम परीसर नांदेड येथे प्राप्त होतील. प्रस्ताव कार्यालयीन वेळेत सादर करावे.
पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे. संबंधीत जिल्ह्यामध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असले पाहिजे व त्यांने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल. क्रीडा संघटक, कार्यक्रत्याने सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा विकासासाठी भरीव योगदान दिले असले पाहिजे व त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण  केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता नांदेड जिल्ह्यातील खेळाडुंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल.
खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगतपूर्ण 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे. या पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 1 ऑक्टोंबर 2012 शासन निर्णय उपलब्ध असून अधिकच्या माहितीसाठी नांदेडचे क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...