Thursday, December 15, 2016

ध्वजदिन निधी संकलनातून सैन्यदलाप्रती
कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी – जिल्हाधिकारी काकाणी
निधी संकलनास सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. त्यामुळे या निधीस विविध घटकांनी सढळ हाताने मदत करावी , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2016-17 च्या संकलनाचा प्रारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. नांदेड जिल्ह्यासाठीचे गतवर्षीचे निधी संकलनाचे उद्दीष्ट 108 टक्क्यांनी पुर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी निधी संकलनात योगदान देणाऱ्या विविध कार्यालय प्रमुखांनाही यावेळी गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी, मेजर बी. जे. थापा, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रा. देवदत्त तुंगार यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, सैनिकांचे नातेवाईक, नागरीक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी सैनिकांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा आजचा हा दिवस म्हणजे सैन्यदलाबाबत समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. नांदेड जिल्ह्यातून सैन्य भरतीत तरूणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी नुकताच मोठ्या स्वरुपात नांदेड येथे सैन्य भरती मेळावा झाला. त्यासाठी विविध घटकांनी उत्कृष्ट योगदान दिल्याचेही श्री. काकाणी यांनी नमूद केले. तसेच सैन्य दलातील भरतीसाठी प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्ह्यात विविध घटकांच्या सहभागाद्वारे विशिष्ट असा कल्याण निधी उभारण्याचाही प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. येनपुरे म्हणाले की, महाराष्ट्राला थोर विरांची आणि शौर्याची परंपरा आहे. सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी महाराष्ट्रातील विरांनी अलौकीक असे बलिदान केले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला सदैव कृतज्ज्ञता रहावे लागेल.
सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले, तसेच अमर जवान प्रतिमेस पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच बिगूलच्या धुन वादनाद्वारे मानवंदनाही देण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर पटवारी यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता तसेच वीर पत्नींचा, कुटुंबियांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना शैक्षणीक शिष्यवृत्त्यांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांचाही यावेळी पारितोषीक, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात ध्वजदिन निधीच्या संकलनाचे उद्दीष्ठ पुर्ण करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी श्री. काकाणी आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधींच्या ध्वजांचे वितरण करून, निधी संकलनासही प्रारंभ करण्यात आला. निधी संकलनाचे उद्दीष्ट पुर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्यासाठीचे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह कॅप्टन पटवारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांना सुपूर्द करण्यात आले. नायब तहसिलदार मकरंद दिवाकर यांनी सुत्रसंचालन केले. डी. पी. झगडे यांनी आभार मानले. जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे व श्री. देशपांडे आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले. याप्रसंगी विविध कार्यालयांचे प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती.

000000

Wednesday, December 14, 2016

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा  
लघुपट सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

 नांदेड , दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर 'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे. या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास दि.31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 31 डिसेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) ८६०५३१२५५५ यांचेशी  संपर्क साधावा.
********


निवडणूक निरीक्षक पाटील यांना  
अर्धापूर, मुदखेड, उमरी येथे भेटता येणार
नांदेड, दि. 14 :- राज्य निवडणूक आयोगाने अर्धापूर नगरपंचायत, मुदखेड व उमरी नगरपलिका निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती केली आहे. श्री. पाटील यांना गुरुवार 15 ते शनिवार 17 डिसेंबर 2016 या कालावधीत संबंधित तहसिल कार्यालयात निवडणूक संदर्भातील तक्रारी, सूचना यांच्या अनुषंगाने भेटता येणार आहे.
निवडणूक निरीक्षक श्री. पाटील हे गुरुवार 15 डिसेंबर रोजी अर्धापूर येथे, शुक्रवार 16 डिसेंबर रोजी मुदखेड येथे व शनिवार 17 डिसेंबर रोजी उमरी येथे संबंधीत तहसिल कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत निवडणुकीसंबंधाने जनतेच्या तक्रारी, समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहतील.

000000
मोटार सायकल नोंदणीसाठी नवीन मालिका
नांदेड, दि. 14 :- मोटार सायकल नोंदणीसाठी एमएच 26-बीए ही नवीन मालिका शुक्रवार 16 डिसेंबर पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांची अर्ज शुक्रवार पासून स्विकारण्यात येतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
जिल्हा उद्योग केंद्राच्या
विविध सभाचे शनिवारी आयोजन
नांदेड, दि. 14 :- जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या जिल्हा उद्योग मित्र समिती सभा, जिल्हा सल्लागार समिती सभा, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य जिल्हास्तरीय समिती सभा व आजारी उद्योग पुनरुज्जीवन जिल्हास्तरीय समिती सभा शनिवारी 17 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या सभांना उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

000000
श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त
27 डिसेंबरला स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 14 :- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन 2016 साठी नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टया निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंगळवार 27 डिसेंबर 2016  रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा ( पालखी सोहळा ) यानिमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  
श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा ( पालखी सोहळा ) निमित्त मंगळवार 27 डिसेंबर 2016 रोजी या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार, उपकोषागार कार्यालये व शैक्षणिक संस्थांना या सुट्टया लागू राहतील. सुट्टयांचा हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाही.

00000000

Tuesday, December 13, 2016

रविवारी अल्पसंख्यांक हक्क दिन   
नांदेड, दि. 13 :-  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून रविवार 18 डिसेंबर 2016 हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य, मोहल्ला समित्या, सर्व पोलीस स्टेशन, आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करावेत. कार्यक्रमामध्ये अल्पसंख्यांकाचे हक्क, घटनेद्वारे अल्पसंख्यांकांना असलेले अधिकार देशाच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी असलेली सामाजिक सद्भावनेची गरज आणि अल्पसंख्यांकांची राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहातील समावेशाची आवश्यकता या बाबीवर समाजाच्या सर्व घटकामध्ये जागृती करावी. विशेषत: जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर कार्यालयांच्या सहकार्याने कार्यक्रम आयोजित करावा, असे जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

0000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...