Saturday, October 29, 2016

महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने
रावळकर कुटुंबियांना 3 लाख रुपयांची आर्थीक मदत
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते वितरीत
        नांदेड, दि. 29 :- अवयवदानामुळे अजरामर झालेल्या सुधीर रावळकर यांच्या पत्नी तिलोत्तमा रावळकर व मुलगी श्रृती यांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांची आर्थीक मदत आज देण्यात आली. श्री. काकाणी यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन सांत्वन केले. महसूल अधिकारी, कर्मचारी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगीतले.
      
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ही आर्थिक मदत सुधीरची मुलगी श्रृतीच्या नावे मुदत ठेवीमध्ये देण्यात आली. यावेळी सुधीरची आई रुक्मीणी प्रल्हादराव रावळकर, बहीण चंदा रावळकर, शोभा रावळकर, लता कल्याणकर, भाच्ची जान्हवी डांगे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरुणा संगेवार, अरविंद नरसीकर, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कुणाल जगताप, राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण नरमवार, तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष एन. जी. कानगुले, राज्य उपाध्यक्ष एम. एम. काकडे, महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
           रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मोठा प्रतिसाद  देवून रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत स्वत: स्वयंस्फुर्तीने दिली आहे. यावेळी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबिरपणे आम्ही उभे आहोत असा विश्वास दिल्याने त्यांना एक मायेचा आधार मिळाला आहे.

000000

Friday, October 28, 2016

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीचे
नामनिर्देशनपत्रे 1 नोव्हेंबर रोजी स्वीकारले जाणार
        नांदेड, दि. 28 :  महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2016 साठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर 2016 आहे. अधिनियमातील तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर 2016 रोजीची सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने मंगळवार 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु ठेवणे आवश्यक आहे. अशा सूचना उपसचिव व सह. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत.  म्हणून नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2016 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील असे नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
         शासन राजपत्र 24 नोव्हेंबर 2015 अन्वये शासनाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी शासकीय, निमशासकीय, कार्यालयांना भाऊबीज निमित्त सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी पराक्रम्य संलेख अधिनियम 1981 खाली जाहीर केले नाही.  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1991 मधील नियम 33 मध्ये नामनिर्देशन पत्र सादर करणे आणि विधीग्राह्य नामनिर्देशन याबाबत तरतूद दिली असून त्याखालील दिलेल्या परंतुकामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्र जो दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, त्या दिवशी सादर करता येणार नाहीत अशी तरतूद आहे. अधिनियमातील व्याख्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी याची व्याख्या दिली असून त्यात सार्वजनिक सुट्टी म्हणजे पराक्राम्य संलेख अधिनियम, 1981 मधील कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी अशी आहे.  या तरतुदी विचारात घेता 1 नोव्हेंबर रोजी सुट्टी ही सार्वजनिक सुट्टी या व्याख्येत मोडत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरु राहणार आहे.  

00000000
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी
4 नोव्हेंबर पासून सुरु होणार
नांदेड, दि. 28 :- बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर 2016 रोजी पासून विद्यार्थ्यांना शिकवणी सुरु होणार आहे, अशी माहिती प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी दिली आहे.  
शाळेतील संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व नातेवाईकांनी आपल्या पाल्यास 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. शाळेत येताना सोबत सुट्टीपुर्वी दिलेले पालक बॉयोडाटा व पालकांचे ओळखपत्र पूर्ण करुन घेवून यावे, असे आवाहनही केले आहे.

00000000
कापूस, तुर पिकावरील किड नियंत्रणासाठी
कृषि विभागाचा संदेश
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यात कापूस व तूर पिकासाठी किड, रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किडीच्या संरक्षणासाठी उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी संदेश दिला आहे.
कापसावरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के @ 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरीता डायफेनथुरिऑन 50 डब्लु. पी. 1.2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरामधील तुरीसाठी लिंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
आरोग्य शिबीरात 118 रुग्णांची तपासणी 
नांदेड, दि. 28 :-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यातीने आज हनुमानगड नांदेड येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 118 रुग्णांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, मौखिक आरोग्य व नेत्र इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.
तपासणीत मधुमेहाचे 10, उच्चरक्तदाब 8, मौखिक आरोग्याची 25 व मोतीबिंदुचे 55 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 50 रुग्णांत दृष्टीदोष असल्याचे आढळून आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. जी. सी.घोडके, डॉ. ए. आय. शेख, एनसीडी अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

0000000

Thursday, October 27, 2016

मुंबईकडे यकृत पाठविण्यासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॅारिडॅार 
महिन्यात दुसऱ्यांदा अवयवदान, ग्रीन कॅारिडॅारसाठी नांदेडचे योगदान
नांदेड, दि. 27 :- अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॅारिडॅार म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नांदेड यशस्वी झाले आहे. दात्याचे यकृत नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबईकडे, तर मुत्रपिंड औरंगाबादकडे पाठविण्यात आले. नांदेडने अवयव प्रत्यारोपणासाठी दात्याचे अवयव  यशस्वीपणे रवाना करण्यात दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. यातील अवयवदाता हे कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे हे आहेत. त्यांच्या अवयवामुळे काही गरजुंचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे आयुष्य सावरले जाणार आहे. मोरे कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने दिलेल्या संमतीमुळे डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा प्रशासनाने ते पाठविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न केले.  
अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतीमान केले. ग्रीन कॉरिडॉरमुळे विष्णुपुरी ते विमानतळ हे अंतर अवघ्या 11 मिनिटात पार करण्यात आले. यापुर्वीच्या ग्रीन कॅारिडॅारच्यावेळी हे अंतर पार करण्यासाठी 13 मिनीटाचा कालावधी लागला होता. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महापालिकेच्या समन्वयामुळे तसेच जनतेच्या सहकार्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण न होता 2 मिनीटाचा कालावधी कमी झाला.   
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे (वय 26) हा नायगाव येथून गोपाळचावडी येथे जात असतांना मारताळा जवळ रस्त्यावर अपघात झाला. उपचारासाठी नांदेड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर उपचारासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मोरे यांची प्रकृती नाजूक होती, मेंदु मृत झाला होता. यश मिळत नसल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर मोरे यांच्या अवयवदान करण्याचे प्रयत्न सुरु केले.  अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना अवदानाचे महत्व पटवून दिले. संतोष यांच्या पत्नी भाग्यश्री मोरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर अनुषंगीक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर यकृत घेऊन जाण्यासाठी मुंबईतील ग्लोबल हॉस्पीटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबळ तर मुत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत दरक व डॉ. भुषण डोडीया आणि धुत हॉस्पीटलचे डॉ. सोमवंची नांदेड येथे दाखल झाले. नेत्र नांदेड येथेच प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत.  
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, डॅा. पी. टी. जमदाडे, डॉ. आर. जी. पाठक, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. अनिल देवगावकर, डॉ. मंदार टिळक, डॉ. बोडखे यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयाकडून अवयव पाठविण्यासाठीच्या शस्त्रक्रियासाठी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली. आज सकाळी 10.45 मिनिटांनी यकृत घेऊन डॅा. चौबळ आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 11 मिनिटात हा ताफा विमानतळावर पोहचला आणि यकृत घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. यानंतर मुत्रपिंड  घेऊन औरंगाबादचे पथक मोटारीने रवाना झाले. 
ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नारनवर, पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पांडे, नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. डी. रोडे  यांनी प्रयत्न केले. तसेच मोरे यांच्या उपचारासाठी डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. प्रमोद धोंडे, व डॉ. राजेश अग्रवाल यांनीही प्रथम प्रयत्न केले. 
विष्णुपुरी ते  विमानतळ हा 40-45 मिनिटाचा कालावधी लागणारा प्रवास 11 मिनिटात पार करता आला. हे जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणांना, महानगरपालिका यांच्या प्रयत्नामुळे  रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. जनतेनेही उत्सर्फुतपणे  सहकार्य केले व कमी कालावधीत अंतर पार करणे शक्य झाले. त्यामुळे याबद्दल अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सर्वांचे विमानतळावर आभार मानले. 
भाग्यश्री मोरे या 9 महिन्याच्या गर्भवती होत्या. आज संतोष मोरे यांचे अवयव काढण्याच्या अगोदर सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पत्नी भाग्यश्री यांनी मुलीला जन्म दिला. हे कन्यारत्न जणू अवयव प्रत्यारोपित होणाऱ्यासाठी संजीवनीच्या स्वरुपात मोरे कुटुंबियांत प्राप्त झाले आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.  
0000000

Wednesday, October 26, 2016

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26  :- जिल्ह्यात मंगळवार 8 नोव्हेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 25 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर  2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.                        
     00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...