Thursday, October 27, 2016

मुंबईकडे यकृत पाठविण्यासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॅारिडॅार 
महिन्यात दुसऱ्यांदा अवयवदान, ग्रीन कॅारिडॅारसाठी नांदेडचे योगदान
नांदेड, दि. 27 :- अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॅारिडॅार म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नांदेड यशस्वी झाले आहे. दात्याचे यकृत नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबईकडे, तर मुत्रपिंड औरंगाबादकडे पाठविण्यात आले. नांदेडने अवयव प्रत्यारोपणासाठी दात्याचे अवयव  यशस्वीपणे रवाना करण्यात दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. यातील अवयवदाता हे कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे हे आहेत. त्यांच्या अवयवामुळे काही गरजुंचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे आयुष्य सावरले जाणार आहे. मोरे कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने दिलेल्या संमतीमुळे डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा प्रशासनाने ते पाठविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न केले.  
अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतीमान केले. ग्रीन कॉरिडॉरमुळे विष्णुपरी ते विमानतळ हे अंतर अवघ्या 11 मिनिटात पार करण्यात आले. यापुर्वीच्या ग्रीन कॅारिडॅारच्यावेळी हे अंतर पार करण्यासाठी 13 मिनीटाचा कालावधी लागला होता. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व महापालिकेच्या समन्वयामुळे तसेच जनतेच्या सहकार्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण न होता 2 मिनीटाचा कालावधी कमी झाला.   
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील संतोष उद्धव मोरे (वय 26) हा नायगाव येथून गोपाळचावडी येथे जात असतांना मारताळा जवळ रस्त्यावर अपघात झाला. उपचारासाठी नांदेड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर उपचारासाठी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मोरे यांची प्रकृती नाजूक होती, मेंदु मृत झाला होता. यश मिळत नसल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर मोरे यांच्या अवयवदान करण्याचे प्रयत्न सुरु केले.  अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना अवदानाचे महत्व पटवून दिले. संतोष यांच्या पत्नी भाग्यश्री मोरे यांनी व त्यांच्या कुटूंबियांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर अनुषंगीक सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर यकृत घेऊन जाण्यासाठी मुंबईतील ग्लोबल हॉस्पीटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गौरव चौबळ तर मुत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत दरक व डॉ. भुषण डोडीया आणि धुत हॉस्पीटलचे डॉ. सोमवंची नांदेड येथे दाखल झाले. नेत्र नांदेड येथेच प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत.  
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, डॅा. पी. टी. जमदाडे, डॉ. आर. जी. पाठक, डॉ. नितीन नंदनवनकर, डॉ. अनिल देवगावकर, डॉ. मंदार टिळक, डॉ. बोडखे यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयाकडून अवयव पाठविण्यासाठीच्या शस्त्रक्रियासाठी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली. आज सकाळी 10.45 मिनिटांनी यकृत घेऊन डॅा. चौबळ आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या 11 मिनिटात हा ताफा विमानतळावर पोहचला आणि यकृत घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. यानंतर मुत्रपिंड  घेऊन औरंगाबादचे पथक मोटारीने रवाना झाले. 
ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास नारनवर, पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पांडे, नांदेड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. डी. रोडे  यांनी प्रयत्न केले. तसेच मोरे यांच्या उपचारासाठी डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. प्रमोद धोंडे, व डॉ. राजेश अग्रवाल यांनीही प्रथम प्रयत्न केले. 
विष्णुपुरी ते  विमानतळ हा 40-45 मिनिटाचा कालावधी लागणारा प्रवास 11 मिनिटात पार करता आला. हे जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणांना, महानगरपालिका यांच्या प्रयत्नामुळे  रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. जनतेनेही उत्सर्फुतपणे  सहकार्य केले व कमी कालावधीत अंतर पार करणे शक्य झाले. त्यामुळे याबद्दल अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी सर्वांचे विमानतळावर आभार मानले. 
भाग्यश्री मोरे या 9 महिन्याच्या गर्भवती होत्या. आज संतोष मोरे यांचे अवयव काढण्याच्या अगोदर सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पत्नी भाग्यश्री यांनी मुलला जन्म दिला. हे कन्यारत्न जणू अवयव प्रत्यारोपित होणाऱ्यासाठी संजीवनीच्या स्वरुपात मोरे कुटुंबियांत प्राप्त झाले आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.  
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...