Thursday, September 17, 2026

वृत्त क्रमांक 

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

•‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमेचा शुभारंभ; आगामी सण-उत्सव स्वच्छ वातावरणात साजरे करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 17: नांदेड शहर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून, शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि सुंदर शहर बनविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर व्हीआयपी रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता करत व भिंतीवर पेंटींग करत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, किशोर स्वामी, विविध प्रभागांतील नगरसेवक, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी सण-उत्सवांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करूया, असे आवाहन केले. स्वच्छतेची ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नांदेड शहर स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. शहर संपूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. प्रमुख रस्ते आणि दुभाजकांची विशेष स्वच्छता, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी, दुभाजकांवरील झाडांची छाटणी आणि परिसराचे सुशोभीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

आगामी श्री गणेशोत्सव आणि दुर्गादेवी उत्सवाच्या काळात नांदेड शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

***










वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी 

नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्‍यात आली. प्रबोधनकारांच्‍या प्रतिमेस पुष्‍पमाला अर्पण करून अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी रावसाहेब पोहरे,गजानन ऐनवाड,भास्‍कर गुंगे ,सुरेश पेदेवाड, संतोष गज्‍जेवार, बालासाहेब भराडे, अनिल पाटील अजय दुधकवडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

***



 वृत्त क्रमांक 

पशुधन विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

• विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा शासनाकडून भार; पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका), दि. 17 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, या योजनेसाठी शेतकरी-पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुधनाला आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूपासून आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी पशुसंवर्धन विभागाने ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.’ सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्यभर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे एआयसीची निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या प्रमाणात उचलणार आहे. लाभार्थी पशुपालकाला केवळ 15 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. विमा प्रीमियमचा दर एक वर्षासाठी 4.30 टक्के, दोन वर्षांसाठी 7.50 टक्के आणि तीन वर्षांसाठी 10.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

70 हजार रुपये किमतीच्या संकरित गाईसाठी एक वर्षाचा एकूण विमा हप्ता 3 हजार 10 रुपये असून, त्यापैकी पशुपालकाचा 15 टक्के हिस्सा 451 रुपये 50 पैसे आहे. दोन वर्षांसाठी हा हिस्सा 787 रुपये 50 पैसे, तर तीन वर्षांसाठी 1 हजार 102 रुपये 50 पैसे राहील.

10 पशुधनापर्यंत अनुदानाचा लाभ

एका कुटुंबातील कमाल 10 पशुधनासाठी विमा योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. दुभत्या गाईसाठी कमाल 70 हजार रुपये, दुभत्या म्हशीसाठी 80 हजार रुपये, बैलासाठी 70 हजार रुपये, रेड्यासाठी 80 हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर कमाल 7 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

‘नो टॅग, नो क्लेम’ नियम

विम्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM) वर 12 अंकी कानातील बिल्ला (Ear Tag/UID) सह नोंदणी असणे बंधनकारक आहे. विमा कंपनीकडून UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो. योजनेत ‘नो टॅग, नो क्लेम’ या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

मृत्यूनंतर 15 दिवसांत थेट बँक खात्यात भरपाई

विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमातून माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर पात्र विमा दाव्याची रक्कम 15 दिवसांच्या आत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. मुदतीत पात्र विमा दाव्याची भरपाई न केल्यास विमा कंपनीला 12 टक्के दराने व्याज देणे बंधनकारक राहील.

राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर यांच्यामार्फत करण्यात येणार असून, राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्तांकडून योजनेचे सनियंत्रण केले जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेमुळे राज्यातील पशुपालकांना पशुधनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’वर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

**




 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका), दि. 17: अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी आता बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी HMAS संकेतस्थळावर आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जोडणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्या त्रुटींची पूर्तता करावी. अर्जाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर वेळोवेळी तपासावी. मुदत संपल्यानंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करावा. अर्जासंदर्भातील सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. 

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठीही तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभाग, नांदेडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आवश्यक माहिती आणि सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी Instagram व Facebook वरील samajkalyannanded हे अधिकृत पेज फॉलो करून योजनांबाबतची माहिती आणि अडचणींचे निराकरण करून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी इतर अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क न साधता समाज कल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. काही अडचण किंवा समस्या असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा – नरेंद्र चव्हाण

• बारड येथे ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड(जिमाका), दि. 17: हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग हा केवळ इतिहासाचा भाग नसून, नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा आहे. मराठवाड्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी नरेंद्र चव्हाण यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुदखेड तालुक्यातील बारड येथे केंद्रीय संचार ब्यूरो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. बारड येथील हुतात्मा स्मारक परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, सुनील देशमुख, प्रदीप भोसिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात तरुणांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी इतिहासातील शौर्य आणि त्यागापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य तरुणांनी दाखविले पाहिजे, असे नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हणाले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. येथील भूमिपुत्रांनी निजामाच्या रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा देत स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. या लढ्यात बारड गावाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, बारड येथील 33 स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले.

या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग यांची माहिती देणारे विशेष ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या शौर्याची आणि धाडसाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आली.

बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला.

यावेळी शाहीर वाघमारे, शाहीर विनोद गोडबोले आणि शाहीर रमेश गिरी यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे सुमित दोडल यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी जोंधळे यांनी पार पाडली.

**






सुधारित वृत्त क्रमांक 

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री अतुल सावे

• पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा व वीजपुरवठ्याचा घेतला आढावा

• आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

नांदेड(जिमाका), दि. 17: दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, महावितरणचे अधीक्षक अभियंता अजितकुमार खंदारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, विष्णुपुरीचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. बनसोड, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि नियमित वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. पावसाचा खंड तसेच पावसातील अनियमिततेचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांच्या संभाव्य नुकसानीची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीत संभाव्य उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना आतापासूनच कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा, पाणी आराखडा आणि नियमित वीजपुरवठा याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर आवश्यक उपाययोजनांचा आढावाही सादर केला.

जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित उपाययोजना आणि सद्यस्थितीची माहिती बैठकीत सादर केली. 

**







वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 17 : राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे दि. 18 व 19 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 4.55 वाजता पुणे विमानतळ येथून नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.15 वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. 6.20 वाजता नांदेड विमानतळावरुन प्रयाण व सायंकाळी 6.45 वाजता नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.

शनिवार, दि. 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीबाबत पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत पिक परिस्थितीचा आढावा घेतील. 11.30 वाजता पुयणी ता. नांदेड येथे पीक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर ते बोराला ता. वसमत, जि. हिंगोली येथील पिक परिस्थिती पाहणीसाठी प्रयाण करतील.

**

वृत्त क्रमांक 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

नांदेड (जिमाका), दि. 17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.

या ध्वज वंदन कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, तहसीलदार शंकर लाड, विपीन पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

***






 वृत्त क्रमांक 

शाश्वत स्वच्छतेसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

• ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानाचा नांदेडमध्ये जिल्हास्तरीय शुभारंभ

नांदेड(जिमाका), दि. 17: स्वच्छ भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेचा सहभाग पुरेसा नसून, स्वच्छतेची चळवळ लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत’ या यंदाच्या संकल्पनेवर आधारित हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण, महापौर कविताताई मुळे, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

गावागावांत तसेच शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेली अस्वच्छ ठिकाणे शोधून त्यांची स्वच्छता करण्यात यावी. शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. स्वच्छतेची सवय केवळ अभियानाच्या कालावधीपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी स्वयंप्रेरणा निर्माण करून सामूहिक कृतीला बळ देण्याच्या उद्देशाने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येते. यंदाच्या अभियानातून स्वच्छतेच्या कार्यात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासोबतच स्वच्छतेविषयी जबाबदारी आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, सफाई मित्रांचा सन्मान आणि स्वच्छता जनजागृती यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.

‘एक दिवस, एक तास, एक साथ’मधून महाश्रमदान

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमातून स्वच्छतेसाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहरातील प्रभाग तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये एक तास श्रमदान करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

***




कृपया सोबत वृत्त चित्रफित व व्हिडिओ…

 






विशेष वृत्त क्रमांक 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न     

 पीक नुकसानीची शासन दखल घेणार, शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही : पालकमंत्री अतुल सावे 

 ·         शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिलात सवलत

·         ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम

·         आरोग्य सुविधांचे बळकटीकरण

·         रोजगार महाकुंभमध्ये युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

·         सीताखंडी घाटातील अपघाताबद्दल शोक व्यक्त 

नांदेड (जिमाका), दि. 17 सप्टेंबर : जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकरी बांधवांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शासनाच्यावतीने ग्वाही देतो, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.  

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. पालकमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

यावेळी राज्यसभेचे सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नागरिक व पत्रकार आदी उपस्थित होते. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ४८७ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदविण्यात आली असून, त्यापैकी ६४ हजार २७९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत ४८८ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी कृषी क्षेत्रातील ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीचे ना-देय प्रमाणपत्र देण्यात येत असून, बँकांनी त्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच वीजबिलात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जाचा भार कमी करणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वीज खर्चात दिलासा देणे, हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे आहे. या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे अभिनंदन करून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्र्यांनी आभार मानले. 

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ९६६ कोटी रुपयांचे, तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्यापोटी ७६ कोटी ५३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले. 

शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला शासनाने विशेष प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्य शासनामार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सेवा सेतू शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे, इनोव्हेशन चॅलेंज, विकसित भारत संकल्प यात्रा, नमो सेवागाथा, जल-जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

“युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती” या संकल्पनेतून युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एकाच दिवशी राज्यभरात ५०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून, नांदेड जिल्ह्यात २२ ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील युवकांनी या रोजगार मेळाव्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरून ५०० खाटांपर्यंत वाढविण्यात येत आहे. तसेच कंधार, बिलोली आणि हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करण्यात येत असून, जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही नवीन आरोग्य सुविधांची उभारणी सुरू आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ३७ अत्याधुनिक डायलिसिस यंत्रे, तीन सीटी स्कॅन यंत्रे, एमआरआय सेवा आणि सोनोग्राफी यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गरजू व पात्र रुग्णांसाठी आधार ठरत असून, जिल्ह्यातील १ हजार ९७४ रुग्णांना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २ हजार ६३१ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी बँकांमार्फत २०६ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांना सुमारे २२ कोटी ८४ लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ५१६ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी मुखेड व कंधार तालुक्यात संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खून झालेल्या प्रकरणांतील २० मृत व्यक्तींच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील रस्ते आणि शासकीय इमारतींची विविध विकासकामे वेगाने सुरू असून, ती पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५३२ गावांपैकी १ हजार ४५४ गावे हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच १ हजार ३६९ गावांमध्ये सांडपाणी निचरा आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना आदी योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना निर्धारित उद्दिष्टानुसार लाभ देण्यात येत असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात झालेल्या भीषण अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी दुःख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून त्यांनी जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, दिवंगत माजी आमदार प्रदीप (नाईक) जाधव यांच्या शोक प्रस्तावाचा कार्यवृत्तांत व स्मृतीपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांच्या नातेवाईकांना प्रदान करण्यात आले. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना बॅंक कर्ज मंजुरीचे पत्र पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे व श्रीमती अंजली नातू यांनी केले. 

00000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...