Monday, October 20, 2025
२० ऑक्टोबर 2025
२० ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1117
20 व 21 ऑक्टोबर या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी
नांदेड, दि. २० ऑक्टोबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 20 व 21 ऑक्टोबर 2025 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या गोष्टी करा :
1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
3) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
4) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
5) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
2) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
3) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
4) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
5) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
0000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1116
नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाइनतर्फे अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक बियाणे वाटप
इतर अशासकीय संस्थांनीही मदतीचा हात पुढे करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 19 ऑक्टोबर:- जिल्ह्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशन संस्थेने कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे 600 व ज्वारी पिकाचे 160 क्विंटल बियाणे मोफत उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इतर शासकीय संस्थानीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक कुंपलवार, समन्वयक दत्तात्रय गरजे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गीते (देगलूर), श्री. शिरफुले (नांदेड), तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि नांदेड व अर्धापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 86 टक्के क्षेत्र सोयाबीन व कपाशी पिकाखाली असून ही पिके नैसर्गिक आपत्तीला अधिक बळी पडणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग, ऊस, रेशीमशेती आदी अतिवृष्टीला प्रतिकारक पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी पुढील कालावधीत जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, विहीर पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी आदी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीकाठांवर बांबू लागवड करून पुर नियंत्रणाचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी. तसेच अशासकीय संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांद्वारे मदतीचा हात द्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशनने साधारणतः 95 लाख रुपये किमतीचे हरभरा पिकाचे बियाणे नांदेड जिल्ह्यास पुरवठा केले असून ते गाव पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीने बाधित 6 हजार शेतकऱ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात सांगितले.
शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा यांनी सांगितले की, संस्थेमार्फत निविष्ठा स्वरूपात मदत तर केली जातेच, तसेच मानसिक पाठबळही दिले जाते. नैराश्य वा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनच्या 8955771115 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशन राजाभाऊ शेळके यांनी सांगितले की, संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील 41 नाल्यांवर 30 हजारांहून अधिक बांबू लागवड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच शेतात गाळ टाकण्याची कामे सुरू आहेत.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. नाम फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी या संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सानप, तंत्र अधिकारी राजेश मिरगेवार, तंत्र अधिकारी फलोत्पादन स्वामी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
000000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1115
यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन
दिल्लीत देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
कुसुम सभागृह नांदेड येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम
दि. १9 ऑक्टोबर- सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि श्री किरण कुलकर्णी (भाप्रसे)मा.सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून साकारत आहे.
दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ७:०० वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे रंगणाऱ्या या कार्यक्रमात संज्योती जगदाळे संगीतातील लावण्यवती पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध सिने व पार्श्वगायिका तथा उपविजेती -सुर नवा ध्यास नवा-पर्व 5 तसेच निवेदक बापु दासरी (सुप्रसिद्ध कवी व गझलकार),महेश जैन (गायक/संगीत संयोजक), अंकुश डाखोरे (तबला वादक),रागेश्री जोशी (प्रसिद्ध गायिका), गणेश इंगोले (मृदंग), निवेदिता जोशी (प्रसिद्ध गायिका), राज लामटिळे (की बोर्ड), शिवकुमार मठपती (प्रसिद्ध गायक), किशोर आवटे (ऐक्टोपॅड) हे गायक व वादक कलाकार गाजलेल्या गीतांचा व भावगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर होणार आहेत. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य पाहता व ऐकता येणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहुन आश्वाद घ्यावे, असे आवाहन श्री. विभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
000000
19 ऑक्टोबर 2025
वृत्त क्रमांक 1114
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा - जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
बालविकास प्रकल्प कार्यालय ,नांदेड शहर तर्फे आयोजित आठव्या पोषण माह चा समारोप
नांदेड, दिनांक 19 ऑक्टोबर - बाल विकास प्रकल्प कार्यालय नांदेड शहर तर्फे आठव्या राष्ट्रीय पोषण माह चा समारोप साई लॉन्स येथे आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले होते.त्यांनी यावेळी बालक व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी केंद्राना सक्षम करण्यासाठी खेळणी,इतर साहित्य पुरवले जाईल व शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये वर्ग उपलब्ध असल्यास तिथे अंगणवाडी भरविण्याची परवानगी देण्यात येईल असे सांगितले.
बाल विकास प्रकल्प कार्यालय,नांदेड शहर ने राष्ट्रीय पोषण माह मध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.याप्रसंगी सर्व मदतनीस व सेविका यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून 30 हजार रुपये रक्कम दिली.
कार्यक्रमास लेखाधिकारी नीलकंठ पाचंगे, वैद्यकीय अधिकारी रिठे ,बाल न्याय मंडळ सदस्या श्रीमती सुप्रिया गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पोषण महा दरम्यान राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पोषण माह दरम्यान उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पाककला आयोजित करण्यात आली होती.पोषण व आरोग्य यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी केली.या दरम्यान त्यांनी महिनाभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका श्रीमती गुंडारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व पर्यवेक्षिका गुंडारे,पेंदे ,शिसोदे ,गरुड ,खिराडे ,राहेगावकर , श्री आऊलवार,श्री खूपसे ,यांनी प्रयत्न केले.या प्रसंगी प्रकल्पातील सर्व मदतनीस,सेविका व पालक वर्ग उपस्थित होते.
०००००
Friday, October 17, 2025
वृत्त क्रमांक 1113
दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी,
तीन दिवस सादर होणार्या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण-प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल
नांदेड, दि.१७ ऑक्टोबर:- गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड,नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बंदाघाट येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी देखील दि.२० ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम हे यावर्षीचे दिवाळी पहाटचे आकर्षण असणार आहे.
दि.२० ऑक्टोंबर सकाळी साडेपाच वाजेपासून प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सुश्राव्यगायन होणार आहे. यात भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गिते त्या सादर करणार आहेत.
प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम असून ते स्वतः या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सह गायक म्हणून रविंद्र आहिरे मुंबई हे देखील यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन बापू दासरी यांच्या पुढाकारातून रागरंग हा विविध वाद्य आणि गझल यांचे फ्युजन असलेला आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मिलिंद तुळणकर-पुणे, कल्याणी देशपांडे-पुणे, प्रकाश सोनकांबळे, ऐनोद्दीन वासरी, डॉ.गुंजन शिरभाते, सौ.आसावरी जोशी (रवंदे), बालासाहेब पाटील हे मान्यवर कलावंत सहभागी होतील.
२० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका डॉ.सान्वी जेठवानी यांच्या संचाचा नृत्य झंकार हा कार्यक्रम सादर होणार आहे. शुभंम बिरकुरे व स्थानिक कलावंत यात सहभागी होतील.
दि.२१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांच्या पुढाकारातून पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा अंकिता जोशी यांचा शास्त्रीय संगीतावरील आधारीत स्वर सरिता हा कार्यक्रम होणार आहे. यात अभिनय रवंदे, प्रशांत गाजरे, विश्वजित कोलंबीकर, अनहद वारसी, चिन्मय मठपती, अदिती रवंदे व ईश्वरी जोशी हे सहकारी कलावंत सहभागी होतील.
बुधवार दि.२२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून व पत्रकार विजय जोशी यांच्या निर्मितीतून १९६० ते १९८० या काळातील मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मराठी गितांचा रुपेरी सोनसळा हा कलांगण प्रतिष्ठाण प्रस्तूत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ.कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, गायक सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी आदी मान्यवर गायक सहभागी होणार असून, या कार्यक्रमात वाद्यवृंदाची साथ राज लामटिळे, स्वप्नील धुळे, भगवानराव देशमुख, रविकुमार भद्रे, रतन चित्ते आदी करणार आहेत.
सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांना एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून व सुरेश जोंधळे व मकरंद दिवाकर यांच्या सहकार्यातून काफीला, कोल्हापूर निर्मित जियारत हा मराठी,हिंदी,उर्दू प्रेम साहित्यांची संगीतमय प्रेमयात्रा हा कार्यक्रम सादर होणार आहे. सतीश तांदळे यांचे दिग्दर्शन, संकलन व लेखन असलेला हा कार्यक्रम संगीतकार ऋषिकेश देशमाने यांच्या साह्याने रंगणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण निखिल पुजारी आणि सतीश तांदळे हे करणार आहेत. तर कार्यक्रमात ओंकार पाटील, सुरज कांबळे, कौस्तुभ शिंदे आणि संपदा माने यांचे गायन होणार आहे. सर्व कार्यक्रम वेळेवर सुरु होणार असून, नांदेडच्या रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उपस्थितांना नम्र विनंती व आवाहन
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या मदत पेटीत आपण सढळ हाताने मदत करावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
००००००
वृत्त क्रमांक 1112
मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह गांधीनगर नांदेड येथे पालक मेळावा संपन्न
नांदेड, दि. 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत 125 मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह गांधीनगर नांदेड येथे गुरूवार 16 ऑक्टोबर रोजी पालक मेळावा घेण्यात आला. या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक प्रा. बाळासाहेब लोनवडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. बाळासाहेब लोनवडे यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, करिअर कसे निवडावे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित व उपयोगात्मक करून आपल्या आई-वडिलाचे स्वप्न पूर्ण करावीत यावर प्रकाश टाकला. श्रीमती एल. एस. गायके यांनी मुलीशी सवांद साधावा, त्यांना शेक्षणिक प्रगतीमध्ये प्रोत्साहन द्यावे यासह वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन श्री नागेश व पालक प्रतिनिधी, वसतिगृहाच्या प्रभारी गृहपाल श्रीमती एल. एस. गायके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धुर्पता गायकवाड या विद्यार्थीनीने केले तर आभार कु. सुषमा अस्वलमारे हिने मानले.
0000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...

.jpeg)





.jpeg)




