Wednesday, September 10, 2025

वृत्त क्रमांक 951

रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 10 सप्टेंबर :-  राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य- गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वारी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया- करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत- ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात गहू, हरभरा,ज्वारी, करडई व सुर्यफुल या  या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासुन उपलब्ध आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

 तरी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 950 

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

 

·         जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी   

नांदेड, दि. 10 सप्टेंबर :- श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.   

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, दिल्ली-110029 यांनी त्याचे पत्र दिनांक 17 जून 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक घेणेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. 

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालकाची निवड करावयाची आहे. 

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 27 ऑक्टोंबर 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 29 ऑक्टोंबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 3 ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात येऊन 6 नोव्हेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

7 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दु. 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 11 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. सदर प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशनपत्राची प्रसिध्दी 18 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. तसेच 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची अंतिम यादी 25 नोव्हेंबर 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार असुन मतमोजणी 1 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांचेकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 5 डिसेंबर 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल निवडणूक प्राधिकरणाचे पूर्व परवानगीनंतर घोषीत करण्यात येणार आहे. 

श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताजपाटील जवळ आय.टी.आय. नांदेड तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे बी-5 विष्णु कॉम्पलेक्स हॉटेल ताज पाटील जवळ आयटीआय नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

000000



वृत्त क्रमांक 949  

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी सुवर्ण संधी 

नांदेड, दि. 10 सप्टेंबर :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त असलेल्या व संभाव्य रिक्त होणाऱ्या जागेवर सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त प्रदेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्याांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.  

000000


Tuesday, September 9, 2025

 वृत्त क्रमांक  948

भाषेसह ऐतिहासिक स्थळांची  समृद्धी  जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन विषयावर चर्चासत्र संपन्न

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा विविध भाषा बोलल्या जातात. या विविध भाषेने समृद्ध असलेला नांदेड हा भारतातला एकमेव जिल्हा असून आपण सर्वांनी जिल्ह्यातील भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

आज नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या विषयावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर तसेच वारसा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे बोलत होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय.कुलकर्णी, वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी.कुलकर्णी, नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, सहसचिव धनजंय जोशी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कोटूरवार, माजी कुलगुरु डॉ. कल्याणकर, मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरचे राजेश महाराज देगलूरकर,  किल्लेदार ॲड . ओम गिरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.  

जिल्ह्यात पुरातन स्थळे मोठया प्रमाणात असून या स्थळांच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. लवकरच नांदेड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सज्ज असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन याबाबतची चर्चासत्रे न राहता हे कृतीशिलतेकडे नेता आली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

नांदेड जिल्ह्यातील पुरातत्व संवर्धन अनुषंगाने गडकिल्ल्यासाठी निधी राखीव ठेवला आहे. पुरातन स्थळ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून कंधार किल्ल्यातील तटबंदी मधील गाळ काढण्याची मोहीम नियोजित आहे. होट्टल येथील जमीन संपादनाचे काम संपुष्टात आले असून, माहूर येथील पर्यटन संदर्भाने सोयी सुविधा उभारण्याच्या कामाला गती दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिली.

यावेळी लक्ष्मणराव संगेवार यांनी नांदेड जिल्हृयातील अमुर्त कला वारसा, चंद्रकला पोतदार यांनी नंदगिरी किल्ला, सुरेश जोंधळे यांनी होट्टल, करडखेड, येरगी या विषयावर, प्रमोद देशपांडे यांनी राहेर/सगरोळी, डॉ. अरविंद सोनटक्के यांनी दशरेश्वर मंदिर/बारव मुखेड, प्रा. राजश्री भोपाळे यांनी अर्धापूर केशवराज मंदिर, डॉ. सुभाष रगडे यांनी कंधार, बहादरपूरा, सप्तमातृका, प्रा. डॉ. वसंत कदम यांनी  परमेश्वर मंदिर/शिऊर लेणी, हिमायतनगर, हदगाव याविषयावर तर प्रा. डॉ. दत्ता जाधव यांनी किनवट, माहूर याविषयावर, डॉ. गंगाधर देशमुख यांनी मुक्रमाबाद येथील खडकेश्वर महादेव मंदिर व मुर्ती शिल्प, गजानन सुरकुटवार यांनी तामसा येथील शिवपुरी मंदिर, डॉ. विजयकुमार कुलकर्णी यांनी शिवलिंग बादशहा मठसंस्थान बेटमोगरा या विषयावर सादरीकरण केले.

00000



वृत्त क्रमांक  947

13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन                                                                                                

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनिल गं. वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्यातर्फे शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, धनादेश  अनादरीत झाल्याबाबत प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालयातील तडजोड होण्यायोग्य प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे इ. तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिल, थकीत टेलीफोन बिल, विविध बॅकांचे कर्ज वसुली प्रकरणे, थकीत पाणी बिल इ. प्रकरणे तडजोडीव्दारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाडयाविरूद्ध अपील नाही. प्रलंबित प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते. नातेसंबधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातुन सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश  तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनिल गं. वेदपाठक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  शरद जी. देशपांडे यांनी केले आहे. 

तरी सर्व पक्षकारांनी आपले अधिकृत ओळखपत्र सोबत  घेवून यावे. या  राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक  946

राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धा 

23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबरपर्यत नावनोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांसाठी कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखी आहे. ही स्पर्धा 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन 30 सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्किल कौन्सिल विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.

शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 जिल्हा, विभाग, राज्य, देशपातळीवरून प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआयएस, पॉलिटेक्निक, एमएसएमई टुल्स रूम्स, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्र संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबी व्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, ललित कला महाविद्यालये, फ्लॉवर प्रशिक्षण संस्था, ज्वेलरी मेकिंग संस्था, शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवेदन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी हेाण्यासाठी 50 क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. या क्षेत्राची माहिती https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

 वृत्त क्रमांक  945

किनवट येथे 11 ऐवजी 10 सप्टेंबर रोजी आरटीओ कॅम्पचे आयोजन

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यात किनवट येथे 11 सप्टेंबर रोजी नियोजित एक दिवशीय शिबिर (आरटीओ कॅम्प) हा तांत्रिक अडचणीमुळे 11 ऐवजी 10 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिक, अनुज्ञप्तीधारक अर्जदारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये ज्या अर्जदारानी पक्की अनुज्ञप्तीसाठी ॲपाईन्टमेन्ट घेतल्या आहेत, त्या सर्व अनुज्ञप्तीधारक अर्जदारानी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. बुधवार 10 सप्टेंबर रोजी किनवट येथे एक दिवशीय शिबिर (आरटीओ कॅम्प) आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांनी, अनुज्ञप्तीधारक अर्जदारांनी आपली सर्व कामे 10 सप्टेंबर रोजी आयोजित कॅम्पमध्ये करुन घ्यावीत, असे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...