Saturday, June 7, 2025

 वृत्त क्रमांक 590 

तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी

शेतकरी गट, कंपनी, संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7 जून :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी पुढील सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर मंगळवार 10 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर- 420 हेक्टर, मुग -590 हेक्टर, उडीद-700 हेक्टर, आंतरपिक तुर+सोयाबीन 900 हेक्टर व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन -2850 हेक्टर इतका जिल्हास्तरावर लक्षांक मंजुर आहे. पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादी व्दारे राबविण्यात येणार आहे.

 

शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत असावा. पिक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी MahaDBT पोर्टलद्वारे नोदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्था निवड ही प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर निवड करण्यात येणार आहे. एका गावातून फक्त एकाच शेतकरी गटाची निवड करण्यात येणार असून गटातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यास त्यापैकी फक्त 25 शेतकयांची या लाभासाठी निवड करावयाची आहे. तथापि शेतकरी गटातील एका कुटुंबातील एकच शेतकऱ्यास लाभ देण्यात येणार आहे.

 

शेतकरी गट, कंपनी, संस्था यामधील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना Agristack वर नोंदणी असणे व Farmer Id असणे बंधनकारक आहे. गटामध्ये जे शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकऱ्यांची निवड लाभार्थी म्हणून करावी. लाभार्थी गटाची निवड ही MahaDBT पोर्टलद्वारे होणार असल्याने कृषि विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावे. प्रात्यक्षिकाच्या लाभार्थीसाठी मृदा आरोग्य कार्ड (Solil Health Card) मृदा चाचणी केलेली असावी. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. (जसे की, आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोक्ती अभियान (MSRLM), राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NFILM), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इ.) आवश्यक आहे.

0000

  वृत्त क्रमांक 589

शिकाऊ-पक्के अनुज्ञप्ती शिबीराचे तालुकानिहाय आयोजन 

नांदेड दि. 7 जून :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर 2025 या महिन्यात तालुका शिबीर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट महिना सुरु होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. 

शिबिराचे ठिकाण  

कंधार तालुक्यात 3 जुलै, 4 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर, 3 डिसेंबर. 

धर्माबाद तालुक्यात 7 जुलै, 6 ऑगस्ट, 4 सप्टेंबर, 6 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर, 5 डिसेंबर. 

किनवट तालुक्यात 9 जुलै, 11 ऑगस्ट, 11 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 10 नोव्हेंबर, 10 डिसेंबर. 

मुदखेड तालुक्यात 14 जुलै, 14 ऑगस्ट, 15 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर, 15 डिसेंबर. 

माहूर तालुक्यात 17 जुलै, 18 ऑगस्ट, 18 सप्टेंबर, 17 ऑक्टोबर, 17 नोव्हेंबर, 17 डिसेंबर. 

हदगाव तालुक्यात 21 जुलै, 20 ऑगस्ट, 22 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर, 19 डिसेंबर. 

धर्माबाद  तालुक्यात 23 जुलै, 22 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, 27 ऑक्टोबर, 24 नोव्हेंबर, 23 डिसेंबर. 

हिमायतनगर तालुक्यात 28 जुलै, 26 ऑगस्ट, 26 सप्टेंबर, 29 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 29 डिसेंबर. 

किनवट तालुक्यात 30 जुलै, 29 ऑगस्ट, 29 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर, 28 नोव्हेंबर, 31 डिसेंबर याप्रमाणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याची नोंद घ्यावी व शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे. दिलेल्या दिनांकामध्ये स्थानिक सुटी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. याची सर्व संबंधित नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 588

दहावी परीक्षेच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध 

नांदेड दि. 7 जून :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंगळवार 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका 2025 डिजीलॉकर  Digilocker मध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध आहेत व मंडळाकडे अचुक नोंदविलेले आहेत त्यांच्या गुणपत्रिका APPAR-ID सोबत Link Digilocker Account मध्ये push करण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे APPAR-ID उपलब्ध नाहीत अथवा मंडळाकडे नोंदविलेले नाहीत त्यांच्या परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक टाकून गुणपत्रिका Digilocker app मध्ये उपलब्ध करुन घेता येतील. यासंदर्भात विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात आल्या होत्या. 

00000

Friday, June 6, 2025

 वृत्त क्रमांक 587 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा  

 

नांदेड दि. 6 जून :- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकासशाळा अंतर्गत राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक (आत्मा) स्मार्ट प्रकल्पाच्यावतीने स्मार्ट प्रकल्पचे नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या राज्याबाहेरील दौऱ्यास 31 मे रोजी श्री. शिरफुले यांनी हिरवा झेंडा दाखवुन दौऱ्यास मान्यता दिली. यावेळी समुदाय आधारीत संस्थेचे संचालक व प्रशिक्षणार्थी, इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

या अभ्यास दौरा हा कृषि विज्ञान केंद्र भरमपूर, IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश, कृषि विज्ञान केंद्र उज्जैन मध्यप्रदेश राज्य येथे रवाना करण्यात आला आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजुर उपप्रकल्प समुदाय आधारित संस्था बिलोली तालुक्यातील चंद्रगुप्त मौर्य फार्मर प्रो. कं. लि. गागलेगाव व शिवलिंग बादशाह फा. प्रो. कं. लि. डोणगाव (बु.) या कंपनी मधील प्रत्येकी 5 प्रशिक्षणार्थींना या अभ्यास दौऱ्यामध्ये पाठविण्यात आले. सदरचे प्रशिक्षणार्थी IIPR (Under ICAR) Research Center Phanda, sihore भोपाळ मध्यप्रदेश येथील हरभरा संशोधन केंद्र येथे भेट देवुन तेथील उपक्रम व प्रक्रिया केंद्र पाहून प्रशिक्षत होणार आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 586 

विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पूर्तता करून घ्यावी

 

·   शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

नांदेड दि. 6 जून :- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असल्याने सन 2024-25 मधील स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केलेल्या व अर्जात त्रुटी असल्याने Revert back केले आहेत. बराच प्रदीर्घ कालावधी होऊनही अनेक विद्यार्थ्यांनी Revert back केलेले अर्ज अजून फेरसादर केली नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वाधार अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी मंगळवार 10 जून 2025 ही अंतीम मुदत देण्यात आली आहे.तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनेचा  लाभ घेवू इच्छिणाऱ्या गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून सन 2025-26 करिता नांदेड जिल्ह्यातील एकूण-16 वसतिगृहांकरिता बुधवार 11 जून2025 पासून अर्ज मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह योजना राबविली जाते. सन 2024-25 मधील इयत्ता 7 वी, 10 वी 12 वीचे निकाल जाहिर झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता ऑनलाईन करून घ्यावी. 10 जून 2025 पर्यंत त्रुटी पुर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद ठरतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत विद्यार्थ्याची राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 

 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, अकरावी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.

 

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज URL:https://hmasscrutinyworkflow.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाईन भरावे व त्याची प्रींट आऊट घेवून सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जाडून अर्जाची एक प्रत संबंधित जिल्ह्याचे ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करावेत.

 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योगजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी देखील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठीचा अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत सर्व कागदपत्रे सोबत जोडून संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज न भरल्यास त्यांना स्वाधार योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

 

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येते. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पध्दतीने शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे  यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 585 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 6 जून :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 10 जून 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 584 

​संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

 

·         जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक निर्णय अधिकारी  

नांदेड दि. 6 जून :- संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स नवीन मोंढा नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.  

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-​ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 14 मे 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे.  

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 9 संचालक निवडुन द्यावयाचे असुन त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 6, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून 1 आणि महिला राखीव मतदारसंघातून 2 संचालकाची निवड करावयाची आहे. 

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 9 जून 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 10 ते 15 जून 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 16 ते 19 जून 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 19 जून 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

20 ते 24 जून 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 24 जून 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 1 जुलै 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी 1 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. दिनांक 7 जुलै 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी 7 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 13 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 13 जुलै 2025 रोजी मतदान संपल्यानंतर लगेच करण्यात येणार आहे.​ को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 16 जुलै 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. 

संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख, कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन संगम अर्बन मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे देशमुख, कॉम्पलेक्स, नविन मोंढा, नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000 




 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...