Friday, January 17, 2025

  वृत्त क्र. 68

नांदेड जिल्ह्यातील 67 रेती घाटांची जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष पर्यावरणीय जन सुनावणी 

स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याचा सूर 

नांदेड दि. १7 जानेवारी : जिल्ह्यातील 67 रेती घाटांच्या पर्यावरणीय जन सुनावणीचा कार्यक्रम शुक्रवारला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या जनसुदावनीत स्थानिक रोजगाराला, रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याबाबत नागरिकांनी आपली मते मांडली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक झाली. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अधिकारी मनीष होळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी आणि समितीचे सदस्य सचिव परमेश्वर कांबळे उपस्थित होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी शंकर लाड यांच्यासह जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, हिमायतनगर, हदगाव, माहूर तालुक्यातील अधिकारी, अनेक गावांचे नागरिक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्ह्यातील रेतीच्या मागणीला पुरविण्याची घाटांची आवश्यक क्षमता आहे. शासनाने वाळू धोरणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.तथापि, सुनावणी दरम्यान मांडलेल्या नागरिकांच्या सूचनांना शासन गांभीर्याने विचारात घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर 

या सुनावणीत उपस्थित नागरिकांनी स्थानिक ट्रॅक्टर-ट्रकचा वापर तसेच मजुरांचा स्थानिक पातळीवरच वापर व्हावा, अशी मागणी केली. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा सूर व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील पैनगंगा, कयाधू, मांजरा, लेंडी आदी नद्यांवरील रेती घाटांसाठी पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल निर्णय घेताना स्थानिकांचे हित जपले जावे, अशी नागरिकांची भूमिका होती.

पर्यावरणीय संतुलनासोबत विकासाचा विचार

सुनावणीदरम्यान पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टीनेही अनेक महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. स्थानिकांच्या मागण्या व सूचनांचा अहवाल शासनाकडे पाठवून निर्णय प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

0000






 वृत्त क्र. 67 

समाज कल्याण विभागाच्या नांदेड येथील

विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 

नांदेड दि. 17 जानेवारी :- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले.

 

समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरी, विद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्याच्या मातीत खेळाचे गुण उपजत असल्याचे शशिकांत ढवळे यांनी सांगितले. बी. एस. दासरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. या स्पर्धचे सुत्रसंचलन गजानन पंपटवार व डॉ. दिलीप माने यांनी केले. या विभागीय क्रीडा स्पर्धेत धावणे, थालीफेक, खोखो, रिले अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  

 

विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेड जिल्ह्यात घेण्यात येत असून त्या उत्साहात सुरू झाल्या. या स्पर्धेत नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली येथील अनु.जाती मुला-मुलींचे शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेळाडूंचे जिल्हानिहाय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. विविध जिल्ह्यातून जवळपास 500 विद्यार्थ्यांनी या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.  

000







Thursday, January 16, 2025

 बेसबॉल छायाचित्र







 

  वृत्त क्र. 66

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत

दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व 

नांदेड दि. 16 जानेवारी : राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. शहरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड व सायंन्स कॉलेज नांदेड येथे सुरु आहे. 

या स्पर्धेत दि.16 जानेवारी,2025 रोजी झालेल्या सामन्याचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे. 19 वर्षे मुले- आंध्रप्रदेश- विद्याभारती (06-05 गुण), तामीलनाडू- पंजाब  (00-13 गुण), आंध्रप्रदेश- सीबीएसईडब्लूएस (05-07 गुण), दिल्ली- हरीयाणा (04-01 गुण), चंदीगड- जम्मू कश्मिर (11-01), मध्यप्रदेश- आसाम (11-01), केरला- गुजरात (12-01), आसाम- केरला (00-10), दिल्ली-पंजाब (05-06),  आसाम- गुजरात (05-06), मध्यप्रदेश- केरला (01-06), महाराष्ट्र- सीबीएसईडब्लूएस (01-01 गुण)  तर  19 वर्षे मुली- छत्तीसगड- मध्यप्रदेश (10-00), आंध्रप्रदेश- जम्मु कश्मिर (12-02), आंध्रप्रदेश- हरियाणा (01-10), आसाम-पंजाब (00-12), चंदीगड- केरला (03-02), महाराष्ट्र- जम्मु कश्मिर (10-00), केरला- पंजाब (04-05), दिल्ली- गुजरात (13-02), चंदीगड- आसाम (16-01), चंदीगड-पंजाब (05-06) असा आहे. 

या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य इंद्रजित नितनवार (अमरावती),शंकर शहाणे (परभणी), संतोष खेंडे (सोलापूर) हे आहेत तर पंच म्हणुन गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर), आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदी काम करीत आहेत. 

सदर राष्ट्रीय स्पर्धा पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 65 

व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला  

कृषिक्षेत्रातील विविध योजनेचा आढावा

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- सामुहिक शेततळे, हरितगृह, शेडनेटगृह, पॅहहाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चींग बाबींची शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना कृषि क्षेत्रातील विविध योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, अशी सूचना कृषि विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी दिली.

 

13, 14 जानेवारी रोजी दोन दिवसीय नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, देगलूर उपविभागीय कृषि अधिकारी विठ्ठल गीते, किनवट उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, शेतकरी प्रतिनिधी प्रसाद देव, जिल्‍ह्याती तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

 

फळे, भाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीत्तोर व्यवस्थापन घटकातून रोजगार निर्मिती होईल. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या विविध बाबींचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी केली. जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनेच्या खर्चाचा व नविन कृति आराखड्याचाही आढावा त्यांनी घेतला.

  

व्यवस्थापकीय संचालक श्री. महिंद्रकर यांनी 14 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. त्यात नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील शेतकरी बापुराव पुयड यांच्या शेतातील हरितगृहाची व त्यातील जर्बेरा लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतातील शेडनेट हाऊस, शेडनेट हाऊस मधील रोपे उत्पादन व जिल्ह्यातील प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्याचे त्यांनी पहाणी केली. त्यानंतर अर्धापुर तालुक्यातील धामदरी येथील श्रीमती गंगाबाई रामदास कदम यांच्या शेतातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटीका व त्यातील भाजीपाला रोपे उत्पादन याची पहाणी केली.

 

या दौरा कार्यक्रमात नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नांदेडचे तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, अर्धापूरचे तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे हे उपस्थित होते.

00000

 वृत्त क्र. 64 

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन

 

नांदेड दि. 16 जानेवारी :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...