वृत्त क्र. 65
व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला
कृषिक्षेत्रातील विविध योजनेचा आढावा
नांदेड दि. 16 जानेवारी :- सामुहिक शेततळे, हरितगृह, शेडनेटगृह, पॅहहाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चींग बाबींची शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना कृषि क्षेत्रातील विविध योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, अशी सूचना कृषि विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी दिली.
13, 14 जानेवारी रोजी दोन दिवसीय नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, देगलूर उपविभागीय कृषि अधिकारी विठ्ठल गीते, किनवट उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, शेतकरी प्रतिनिधी प्रसाद देव, जिल्ह्याती तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
फळे, भाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीत्तोर व्यवस्थापन घटकातून रोजगार निर्मिती होईल. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या विविध बाबींचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी केली. जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनेच्या खर्चाचा व नविन कृति आराखड्याचाही आढावा त्यांनी घेतला.
व्यवस्थापकीय संचालक श्री. महिंद्रकर यांनी 14 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. त्यात नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील शेतकरी बापुराव पुयड यांच्या शेतातील हरितगृहाची व त्यातील जर्बेरा लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतातील शेडनेट हाऊस, शेडनेट हाऊस मधील रोपे उत्पादन व जिल्ह्यातील प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्याचे त्यांनी पहाणी केली. त्यानंतर अर्धापुर तालुक्यातील धामदरी येथील श्रीमती गंगाबाई रामदास कदम यांच्या शेतातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटीका व त्यातील भाजीपाला रोपे उत्पादन याची पहाणी केली.
या दौरा कार्यक्रमात नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नांदेडचे तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, अर्धापूरचे तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे हे उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment