वृत्त क्र. 1106
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024
वृत्त क्र. 1106
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024
वृत्त क्र. 1105
लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान जनजागृतीमध्ये दिव्यांगांचा पुढाकार
नांदेड, 16 नोव्हेंबर- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकशाही बळकट करणे तसे मतदारांचा सहभाग वाढविणे हा आहे. विशेषतः दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
महापालिकेच्या स्पीप टीमच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना गृहभेटी देऊन त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, आज राजेश हाडोळे या बहुविकलांग नवयुवा मतदारास त्यांच्या घरी भेट देण्यात आली. दिव्यांग मतदारांच्या सहभागातून समाजात सकारात्मक संदेश व मतदानाचे पटवून देण्याचा उद्देश होता.
या गृहभेटीत स्पीप टीमचे कर्मचारी संजय ढवळे व संदीप लबडे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनीही दिव्यांग मतदारांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
0000
वृत्त क्र. 1104
निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर
87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम
नांदेड , दि. १६ नोव्हेंबर- निर्मिती नर्सिंग कॉलेज तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षातर्फे मतदानाचा जागर उपक्रम आज राबविण्यात आला.
नांदेड दक्षिण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी स्विप कक्षामार्फत आज गुरुकुल इंग्लिश स्कूल वजीराबाद येथे मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचा आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस यांना लाभ झाला. निर्मिती नर्सिंग स्कुल ,नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था नांदेड, तसेच गुरूकुल ईंग्लीश मिडियम स्कूल ,वजिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी स्वीप कक्षाच्या कविता जोशी यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी निर्मिती नर्सिंग स्कूलच्या सौ. उज्वला भावसार, नितिका बेंद्रे, अरुणा लामतुरे, उमा मद्दे, गुरूकुलच्या संचालिका वैशाली कुलकर्णी, सचिव प्रकाश कुलकर्णी,सारिका आचमे यांचे बहुमोल योगदान लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार संजय भालके यांनी मानले.
०००००
वृत्त क्र. 1103
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी न्यायमुर्ती भूषण गवई
नांदेड दि. 16 नोव्हेंबर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमुर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम. जज यांनी दिली.
मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमुर्ती भूषण गवई यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले आहे, तसे राजपत्र देखील प्रसिध्द करण्यात आले आहे. विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 चे कलम 3 च्या 1 उपकलम (2) खंड (बी) द्वारे असलेल्या अधिकारानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पुर्वीचे कार्यकारी अध्यक्ष, संजीव खन्ना यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या ज्येष्ठ न्यायमुर्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. सर्वाना विशेषत: उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना सुलभ आणि मोफत कायदेशीर मदत देण्याचे महत्वाचे काम या प्राधिकरणाला करावे लागते. देशातील कोणताही नागरिक आर्थिक किंवा सामाजिक कारणावरुन न्यायापासून वंचित राहणार नाही याची दक्षता या आयोगाकडून घेतली जाते.
00000
वृत्त क्र. 1102
रविवारी लोकसभा पोट निवडणूक उमेदवारांच्या खर्चाची तृतीय तपासणी
नांदेड, दि. 16 नोव्हेंबर :- लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची निवडणूक खर्चाची तृतीय तपासणी कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, नांदेड येथे रविवार 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे कक्ष प्रमुख डॉ. जनार्दन पक्वान्ने यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 1101
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड दि. 16 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 2 डिसेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 18 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 2 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000
वृत्त क्र. 1100
राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी उद्याची शेवटची मुदत
मंगळवार, बुधवारच्या जाहिरातींसाठी दोन दिवस आधी अर्ज करा
शेवटच्या 48 तासात फक्त प्रिंट माध्यमात जाहिरात देता येईल
शेवटच्या 48 तासात इलेक्ट्रॉनिक्स ,सोशल मीडियावर प्रसिद्धी नाही
नांदेड, दि. १६ नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवार (दि.19) व मतदानाच्या दिवशी बुधवार (दि. 20) रोजी मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातीसाठी शनिवार (दि.16) व रविवार (दि.17) रोजी राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करुन घेणे आवश्यक असल्याचे आवाहान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. जाहिरातीमध्ये कोणते महापुरुषांचा किंवा आक्षेपार्ह चिन्हांचा, भाषेचा वापर करू नये. जाहिरात संहितेचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी)कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
तसेच सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे.
जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणिकरणाचे अर्ज मिडिया कक्षात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सोशल मीडिया व यू-ट्यूबर्सना शेवटच्या 48 तासात प्रचार प्रसारास बंदी आहे. 48 तासापूर्वी दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक आहे.
उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांप्रमाणेच प्रिंट माध्यमांमध्ये जाहिरात देताना जाहिरात संहितेचे पालन करण्यात यावे. कोणते महापुरुषांचे फोटो जाहिरातींमध्ये वापरू नये, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेवटच्या ४८ तासात अन्य कोणत्याही माध्यमांना जाहिराती देता येणार नाही. केवळ प्रिंट माध्यमांना ही परवानगी आहे, याचीही नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
००००००
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...