Wednesday, May 15, 2024

 वृत्त क्र. 425 

टंचाई निवारणाची कामे लोकसहभागातून हाती घ्यावीत

-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

•  आंदेगाव येथील नाला खोलीकरणाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

 

नांदेड दि. 15 :- नांदेड जिल्ह्यात टंचाई निवारण व मान्सून पूर्व कामे प्राधान्याने सुरु आहेत. टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेवून उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाना देत आहेत. पिण्यासाठी व पिकांना मुबलक पाणी मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात जलसंधारणाची व तलाव, नाल्यातील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकून यातून शेतजमीन सुपीक होण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांनी लोकसभागातून अशी कामे मोठया प्रमाणात हाती घ्यावीत. अशा कामांना शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्थामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

 

हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे लोकसहभागातून आज नाला खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी  उपविभागीय अधिकारी विनोद गड्डमवार, किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी आर.डी. रणवीर, हिमायतनगरच्या तहसिलदार पल्लवी टेमकर, तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव, कृषि अधिकारी निलेश वानखेडे, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व गावातील संरपंच कांताबाई विठ्ठल वाढवे, पोलीस पाटील मारोती निळकंठे तसेच सेवा मंडळाचे पदाधिकारी व समस्त गावकरी आदींची उपस्थिती होती.

 

आंदेगाव या गावाचे भौगोलिक क्षेत्र 973.35 हेक्टर असून पेरणी लायक क्षेत्र 937.4 हेक्टर आहे. या गावशिवारात ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, हळद, ऊस, गहू, हरभरा, मका, केळी व तीळ, भुईमूग इत्यादी पिकांची लागवड होते. लघुपाटबंधारे विभागाने आंदेगाव व दरेसरसम या गावाच्या सीमेवर दरेसरसम पाझर तलावाचा सांडवा आंदेगाव शिवारातील नाल्यामध्ये सोडला आहे. या नाल्यात पाणी सोडल्यामुळे गाळ साचून नाला उथळ झाला आहे.  नाल्यातील पाणी उपजावू व पिकावू जमीनीवर वाहते व पिकाचे दरवर्षी खरिपात नुकसान होत होते. त्यावर लोकसहभागातून गावकरी, शेतकरी, कृषि विभाग यांच्या समन्वयातून गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून गाळ काढण्याचा नियोजन करण्यात येवून या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कामाला सर्व शासकीय यंत्रणेचे व एनजीओचे सहकार्य राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000








वृत्त क्र. 424

शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी

कापुस बियाण्यांची खरेदी करु नये

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे

नांदेड दि. 15 :- अनधिकृत एच.टी.बी.टी कापुस बियाणे खरेदी व लागवड करु नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व बियाणे विक्री परवानाधारकांकडुनच कापुस बी.टी.बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.एस.बऱ्हाटे यांनी केले आहे.

फसवणुक व बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन बियाणे पावतीसह खरेदी करावे. अनधिकृत बी.टी बियाणे खरेदीसाठी बनावट कंपन्या खाजगी एजंट आमिष अथवा प्रलोभन देत असतील तर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे कराव्यात असेही कळविले आहे.

बाजारात बोगस कंपन्या, खाजगी व्यक्तिमार्फत परवाना नसलेली अनधिकृत एच.टी.बी.टी  कापुस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत एच.टी.बी.टी  बियाणांना काही व्यक्ती ( तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी ) व बीटी-बीजी-3 ) या नावाने संबोधतात. ( तणनाशक बीटी ) ( आरआरबीटी ) व बीटी-बीजी-3 ) या अवैध बियाण्यांना शासनाची मान्यता नाही. अशा प्रकारचे बि-बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापुस बियाणे लागवड केलेल्या कापुस पिकाचे पानांचे नमुने व उत्पादीत कापसाचे नमुने घेऊन त्यांची एच.टी.बी.टी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्याचे नमुने तपासणीअंती एच.टी.बी.टी जनुके आढळल्यास संबंधितावर अनुषंगीक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अनधिकृत एच.टी.बी.टी बियाणे आढळल्यास त्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येइल. कृषि व पोलीस विभाग सतर्क असुन एच.टी.बी.टी बियाणे विक्री करण्याऱ्यांवर बारीक लक्ष ठेवुन असल्यामुळे कोणीही हे बियाणे विक्रीचा प्रयत्न करुन नये, असेही कृषि विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी बियाणे लागवडी नंतर ग्लायफोसेट हे तणनाशक फवारण्याची बनावट कंपनी व विक्रेते शिफारस करतील. दरम्यान ग्लायफोसेट हे तणनाशक कार्सिनोजनीक गुणधर्माचे असुन त्याच्या वापरामुळे मानवी आरोग्यास कँन्सरसारखे रोग उदभवण्याची शक्यता आहे. त्याच्या अतिवापरामुळे जमीनीची सुपिकता नष्ट होऊन भविष्यात त्या जमीनीत कोणतेही पिक लागवड करता येणार नाही व जमीन नापीक होईल. सर्व शेतकरी, शेतमजुर यांचे आरोग्य धोक्यात होईल. ग्लायफोसेट या तणनाशकाचा केवळ पिके नसलेल्या जमीनीवर व चहा मळयासाठील वापर करण्याची शिफारस केंद्र शासनाने केली आहे.

या व्यतिरिक्त ग्लायफोसेट हे तणनाशक इतर पिकांवर वापरता येणार नाही. मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी कापसाची लागवड रोखण्यासाठी व कार्सिजोनिक गुणधर्म असलेल्या ग्लायफोसेटच्या वापरामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी व परवानाधारक विक्रेत्याकडूनच कापूस बियाणे खरेदी करावे असेही कृषि विभागाने कळविले आहे.

0000 

वृत्त क्र. 423

मोझांबिक येथे झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांचा सहभाग 

नांदेड दि. 15 :- मोझांबिक या आफ्रिकन देशामध्ये १४ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत भारतातील रोटरी डीस्ट्रीकट 3080 व मोझांबिक मधील रोटरी डीस्ट्रीकट 9210 यांच्या संयुक्त विद्यमाने चीमोयू या शहरामध्ये विविध रोगासंदर्भात शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी भारतातील विविध विषयातील निष्णांत 18 डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून 2 शल्यचिकित्सकांची निवड करण्यात आली होती. या टीममध्ये स्त्रीरोग तज्ञ शल्यचिकित्सक म्हणून नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांची निवड करण्यात आली.

या शिबिरात वरील टीमने नेत्ररोग, कान-नाक-घसा, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्लास्टिक सर्जरी या आजारासंबंधित रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. 12 दिवस चाललेल्या या शस्त्रक्रिया शिबिरात वरील टीमने एकूण 828 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यातील अनेक शस्त्रक्रिया ह्या अत्यंत गुंता-गुंतीच्या होत्या. मोझांबिक सारख्या गरीब देशातील जेथे वैद्यकीय साधन सुविधा अत्यंत कमी आहेत. अशा देशातील अत्यंत गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. नांदेडचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांची या शिबिरासाठी निवड झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळकले आहे. यापूर्वीसुद्धा डॉ. अनिल साखरे यांनी आफ्रिकन देशांमध्ये जाऊन विविध शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. यासंदर्भात डॉ. अनिल साखरे यांचे मनोगत जाणून घेतले असता त्यांनी या शिबिरास जाण्यासाठी संधी मिळाली याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. त्यांनी या शिबिरात समाविष्ट करून घेतल्याबद्दल रोटरीयन डॉ. राजू प्रधान, रणजीत भाटीया, रमन आनेजा, डॉ. करणसिंग, किशोर पावडे, प्रशांत देशमुख, डॉ. देवेंद्र पालेवर, व नांदेड रोटरीक्लबचे सर्व सदस्य यांचे आभार मानले. या शिबिरास जाऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

00000

Tuesday, May 14, 2024

वृत्त क्र. 422

 डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांचे आवाहन

 

नांदेड दि. 14 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची आवश्यकता आहे. 

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन गुरुवार 16 मे 2024 रोजी साजरा होत आहे. 2024 या वर्षीचे  घोषवाक्य  ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा’ असे आहे. नागरिकांमध्ये जागरुकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, निरउपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो.

 

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्ततपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

 

नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2021- (687) 144 (निरंक). सन 2022 – (744) 93 (निरंक). सन  2023 -(1490) 292 (निरंक) तर 30 एप्रिल 2024 अखेर- (336) 76 (निरंक).

 

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 421

 अर्धापूर येथील मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड दि. 14 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अर्धापूर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या इच्छूक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

अर्धापूर तालुक्यातील गावातील विद्यार्थी जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा इच्छूक व पात्र विद्यार्थी व पालकांनी इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज मुलांचे वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय बाजूला, पांगरी रोड, अर्धापूर येथील कार्यालयात विनामुल्य भरुन द्यावेत. विहित कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000  

वृत्त क्र. 420

 कापूस लागवड 1 जूननंतरच करावी

कापूस बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून करावी – कृषि विकास अधिकारी

नांदेड दि. 14 :- येत्या खरीप हंगामात कापूस पिकाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडून पावती घेवूनच करावी. अनाधिकृत विक्रेते व फेरीवाले यांच्याकडून कापूस बियाण्याची खरेदी करु नये. तसेच कापूस लागवड 1 जूननंतरच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात कापूस पिकाचे 20 लाख 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु गतवर्षीची कापूस उत्पादकता विचार करता कापूस पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस पिकाची लागवड नगदी पिक म्हणून केली जाते. कापूस पिकाची उत्पादकता मागील काही वर्षे गुलाबी बोंडअळीमुळे कमी झालेली आहे. परंतु गतवर्षी कापूस पिकाची पेरणी 1 जूननंतर केल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादकता मध्ये 2022 च्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच कापूस पिकाची पेरणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 419

 ईअर टॅगिंग शिवाय 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री बंद

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास कोणत्याही सेवा- सुविधा मिळणार नाहीत

नांदेड दि. 13 :- राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व पशुपालकांनी भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची माहिती अद्ययावत करावी. 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत यांची नोंद पशुपालकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले तसेच वनविभाग, नगरपालिका, महानगरपालिकेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद वगळता 15 तालुक्याच्या ठिकाणी पशुचा बाजार भरतो. बाजाराच्या ठिकाणी पशुधनास आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच त्यांची वाहतुक व खरेदी - विक्री तसेच त्यांना देय सोयी सुविधासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनास प्राधान्याने ईअर टॅगिंग करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले. तसेच जिल्ह्यात पशुधनाची बेकायदेशिर वाहतूक होणार नाही यासाठी पशुसंवर्धन विभाग व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही यांची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्यासाठी शासनाने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. या कायद्यामध्ये कलम 38 (1) नुसार पशुधन बाजाराचे नियमन नियम 2017 जाहिर केलेले आहे. या कायद्यानुसार जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे बाजाराच्या ठिकाणी पशुधनास पुरेसा निवारा, गोठे, खाद्य, चारा, पाणी, प्रकाश, पशुधनास चढणे व उतरण्यासाठी रॅम्प, न घसरणारी जमीन, आजारी व अंपग , वयस्कर पशुधनासाठी स्वतंत्र व्यवस्था, गर्भवती प्राणी व लहान पशुधनास स्वतंत्र व्यसस्था, पशुवैद्यकीय सुविधा, चारा वैरण साठवणूक व पुरवठयासाठी व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता गृहे, मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था इत्यादी विविध सुविधांची खात्री जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते याबाबत माहिती पशुसंवर्धन विभागाने पीपीटी द्वारे सादर केली.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...