Friday, February 9, 2024

 वृत्त क्रमांक 119 

नांदेड रेल्वेस्थानक परिसरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- नांदेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 फेब्रुवारी रोजी रेल्वे स्थानक परिसरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, सहायक सुनिल तोटेवाड वाहनचालक गौरव येवले, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय समन्वयक मंगेश गायकवाड तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रदिप खानसोळे व पो.कॉ. प्रदिप कांबळे उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 118

 

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत अर्जाची नोंदणी

महाडिबीटी प्रणालीद्वारे 15 फेब्रुवारी पर्यंत करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना चालू शैक्षणिक वर्षात सन 2023-24 पासून महाडिबीटी https://Prematric.mahait.org/Login/Login प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुला-मुलींसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणी करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी केले आहे.

 

या योजनेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यत शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा फी या योजनांचा समावेश आहे.  

00000

वृत्त क्र. 117

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

थेट कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 9 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादिगा या समाजातील दारिद्र रेषेखालील महिला, पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावासाठी महामंडळामार्फत वेबसाईट प्रणाली विकसित केली आहे. तरी मातंग समाजातील गरजु लाभार्थ्यांनी या “https://beta.slasdc.org” संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत सुविधा कर्ज योजना 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना 1 लाख 40 हजार रुपये, महिला समृध्दी योजना 1 लाख 40 हजार रुपये, शैक्षणिक कर्ज योजना देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 30 लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी 40 लाख रुपयापर्यतचे कर्ज प्रस्ताव सादर करता येतील. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या संकेतस्थळ (Portal) वर ऑनलाईन पध्दतीने जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. महामंडळाचे संकेतस्थळ 5 मार्च 2024 रोजी बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील कार्यालयात येऊन संपर्क साधावा, असेही महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0000

वृत्त क्रमांक 116

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 22 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 डीप क्लिन मोहिम- संपूर्ण स्वच्छतेचा ध्यास

स्वच्छता हा घटक आपल्या निरोगी जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. गेल्या काही महिन्यात मुंबईतील प्रदुषणाने धुळ, धूर यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून पर्यटक, विविध देशांचे उच्चपदस्थ येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी ‘डिप क्लिन ड्राईव्ह’ मोहीम सुरू केली आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. आम्हीही त्यांच्या पावलांवर पाऊलं ठेवत या मोहिमेचा शुभारंभ केला. ही चळवळ फक्त शासनाची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे.

यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला. महाराष्ट्राच्या यशाचा हा आलेख असाच चढता राहण्यासाठी आणि स्वच्छतेच्या गुणवत्ता यादीत राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा सहभाग वाढावा, यासाठी ही मोहिम एक बुस्टर ठरणार आहे, हे लक्षात घेऊन थेट लोकांमध्ये जाऊन मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

मुंबईकरांचा श्वास कोंडला जात असतांना शासन म्हणून सर्वसामान्यांची यातून सुटका करण्यासाठी आम्ही तातडीने पाऊले उचलली. मुंबईतील प्रत्येक रस्ता, नाले यांच्यातील कचरा स्वच्छ व्हावा, सोबतच वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक गल्लीतील रस्ता धुवून काढण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या. संपूर्ण मुंबईला स्वच्छ सुंदर करणाऱ्या या मोहिमेला दुहेरी यश मिळाले. यामुळे मुंबईतील प्रदुषणाची पातळी खाली आली. सोबतच मुंबईकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होऊन त्यांचा परिसर स्वच्छतेते सहभाग देखील वाढला. मोहिमेच्या यशाबद्दल सांगतांना याचे खरे हिरो स्वच्छता कर्मचारी आहेत, हे देखील नमूद करावे लागेल. त्यांच्या दिवस-रात्र सुरु असलेल्या कामांमुळेच हे अभियान मुंबईत यशस्‍वी होऊ शकले आहे.

संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे हे यश लक्षात घेऊन टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात या मोहिमेचा विस्तार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात एका भव्‍य दिव्य सोहळ्यात या राज्यस्तरीय मोहिमेचे उद्घाटन देखील पार पडले. या मोहीमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे. मोहिमेच्या दरम्यान 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. या मंगल सोहळ्याचे निमित्त साधून देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन प्रधानमंत्री महोदयांनी केले होते. या आवाहनाला संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या माध्यमातून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत केवळ कचरा उचलणे, रस्ते स्वच्छ करणे एवढाच विचार न करता प्रदूषण कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरीत पट्टे तयार करणे, जेणेकरुन ऑक्सिजन पार्क तयार होतील, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. तसेच  मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करुन शहरात जंगले (Urban forest) तयार करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी ग्रीन पॅच तयार करुन तो परिसर हिरवागार करणे. चौक, भिंतीचे सुशोभिकरण करणे ही कामे सुद्धा पुढच्या टप्प्यात करण्यात येत आहेत.

संपूर्ण स्वच्छता मोहिमेतून सर्व शहरे स्वच्छ होत आहेत. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी सुद्धा कायमस्वरुपी योजना राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

स्वच्छतेसोबतच नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम आपण राबविणार आहोत. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारायला हवी. आपल्या या प्रयत्नातूनच स्वच्छता अभियानात देशात अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र आपला हा बहूमान टिकवू शकणार आहे. चला तर मग आपण सर्व स्वच्छ, महाराष्ट्र आणि सुंदर महाराष्ट्रासाठीच्या प्रयत्नात सहभागी होऊया !

0000

 मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा लेख

कामाप्रती समर्पित असणारा नेता

हसन मुश्रीफ

(मंत्री, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य) 

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मेहनती, समर्पित आणि निष्ठावान आहेत.  ते अत्यंत शिस्तप्रिय आणि जे काही काम निवडतात त्यात ते प्राविण्य कमवितात. त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात.  त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाही.  वरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र ते मृदु आणि मधुर आहेत. ते प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घणा-या या नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा.. त्यांच्याविषयी दोन शब्द...

मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे नगर विकास आणि मी ग्रामविकास मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये  काम केले आहे. श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे २० वे मुख्यमंत्री आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४,२००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत.

  श्री.एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने त्यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्यातील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवे विस्तारित ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली.

सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेने राज्यातील भाजपप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) ते पदसिद्ध अध्यक्ष झाले आणि एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम त्यांनी केले.

श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार, वांद्रे-वर्सोवा सी लिंक,ठाणे खाडीवरील वाशी येथे तिसरा पुल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, शीळ-कल्याण रुंदीकरण, ठाणे-घोडबंदर उन्नत रस्ता अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न त्यानी केला.

आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

खेडेगावापासून आजच्या विकसित शहरापर्यंत ठाण्याची वाटचाल झाली आहे. नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं हे शहर स्वाभाविकपणे नवी मुंबई किंवा चंडिगढ प्रमाणे मुद्दामहून वसवलेल्या विकसित शहरांप्रमाणे नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री या नात्याने श्री.शिंदे यांनी ठाण्याला २१ व्या शतकातील आधुनिक आणि उत्तमरित्या नियोजनबद्ध असे विकसित शहर करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची योजना आखली आहे.

मी आरोग्याला प्राधान्य देणारा असल्याने मला वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. आभ्यासू नेतृत्व असल्याने त्यांनी माझ्याकडे असलेले कौशल्य गुणानुसार खाते दिली आहेत.मुख्यमंत्री मा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध निर्णय घेण्यात आले.त्यातील काही महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे..

*प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर. नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या 9 जिल्ह्यांत (पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि वर्धा) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू करण्यात येणार.

* राज्यातील शासकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याकरिता आशियाई विकास बँक संस्थेकडून सुमारे 4,000 कोटी व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी या संस्थेकडून सुमारे 5,500 कोटी रुपयांचे कर्ज घेणार.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत रक्तदान मोहीम, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान, स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान, स्वच्छ मुख अभियान, थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान आणि अवयव दान जनजागृती अभियाने सुरू करण्यात आली असून सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5,182 पदे भरण्याबाबतची जाहिरात 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध. ही भरती प्रक्रिया टी.सी.एस. या नामांकित कंपनीकडून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

* वैद्यकीय महाविद्यालयास जोडून वाढीव 157 नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याबाबत सन 2023-2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

* जळगाव येथे मेडिकल हब निर्माण करण्यात आले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू झाले आहे, तर राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जळगाव येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून सुरू.

* भारतीय वैद्यकीय आयोगाच्या मानकांनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक निवासी वैद्यकीय अधिकारी यांची 1,432 पदे निर्माण करण्यात आली.

* विविध संवर्गातील एकूण 5182 पदांसाठी  भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यात आली.

 

पुन्हा एकदा वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

शब्दांकन: राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

०००००००

विशेष लेख

 शुभसंदेश

 सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री

 श्री.संजय राठोड

मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य

राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल, असा राजकारणी सापडणे दुरापास्त. या पार्श्वभूमीवर सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, असं वाटतं, हे खरं मुख्यमंत्र्यांचं मोठेपण आहे. मुख्यमंत्री म्हणून दीड वर्षातच त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी मोठ्या धाडसाने घेतले. त्यामुळे सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यातील दुर्गम दरे तर्फे तांब येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खडतर प्रवास सुरू झाला. ठाण्यात रिक्षाचालक ते राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दीडवर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. विशेषतः सामान्य जनता व गोरगरिबांना दिलासा मिळेल, अशा योजना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राबविल्या आहेत. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारात जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून, राज्यभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटीचा प्रवास, महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत अशा निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत.  राज्यातील एकही सर्वसामान्य- गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री जातीने घेत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. 

    सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे शेती व शेतकऱ्यांवर विशेष लक्ष आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. "जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी, तर जग सुखी " या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी सुखी कसा राहील , यावर महाराष्ट्र शासनाचा भर राहिला आहे .यानुसार राज्य शासनाची पावले पडत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  सरकारने गेल्या  दीड वर्षात शेतकऱ्यांना तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे.दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत  सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे.

  शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना वेग दिला आहे. त्यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला  दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा  पाच हजार गावांत सुरू केला आहे.

आमच्या यवतमाळ जिल्ह्यांसाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतेच ८८१कोटी रुपये निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले आहे.औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान कालावधीत १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रुपयांच्या निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्याच्या विविध विकास कामांना पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे.

संवेदनशील मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषतः सामान्य लोकांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल ते स्वतः लक्ष घालून सगळी कामे करून घेतात. जनतेला भावलेले एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय मदत मागायला त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. एखाद्याची समस्या जाणून घेऊन सभोवतालच्या माणसांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्याची, इतकेच नव्हे तर त्याची कार्यवाही झाली, की नाही, याचा पाठपुरावा करण्याची पद्धत मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्माण केली. मुख्यमंत्री सामान्य नागरिक ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी ते सौम्य भाषेत संवाद साधताना दिसतात.

    श्री. शिंदे साहेबांचे संघर्षमय जीवन सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शक आहे.मागील दीड वर्षांत मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी केले काम हे कायम लक्षात राहील असे आहे.अशा या आमच्या मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि   मन:पूर्वक शुभेच्छा...!

 

शब्दांकन: दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...