Monday, June 5, 2023

 माझी वसुंधरा अभियानात

विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या

जिल्ह्यात नांदेडला बहुमान   

 

·   कुंडलवाडी नगरपरिषदेला विभाग स्तरावर 1 कोटी रुपयांचे बक्षिस  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची गुणाक्रमानुसार निवड आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने या निवडीबाबत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या अभियानात कुंडलवाडी नगरपरिषदेला 15 हजार पेक्षा लोकसंख्येच्या गटातील विभागीय स्तरावरचे 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांना विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याचा बहुमान मिळाला आहे.

 

माझी  वसुंधरा अभियान 3.0 हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात आले. यात राज्यातील 411 नागरी स्थानिक संस्था व 16 हजार 413 ग्रामपंचायती अशा एकुण 16 हजार 824 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला. या निवडीसाठी तीन गट ठेवण्यात आले होते. यात अमृतगट, नागरी स्थानिक संस्था, ग्रामपंचायत असे गट करण्यात आले. त्या-त्या संस्थांनी केलेल्या कार्याच्या मूल्यमापनासाठी त्रयस्त यंत्रणेवर जबाबदारी देण्यात आली होती. या त्रयस्त यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रावरील कामाचे मूल्यमापन व डेस्कटॉप कामाचे मूल्यमापन करण्यात आले. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आनंद व्यक्त केला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे डेहराडून येथे भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी काही दिवसांसाठी गेले आहेत.  

00000 

 शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांची

नाशिक येथे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांची शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथे नुकतीच बदली झाली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे आज त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी  प्राचार्य आर. एम. सकळकळे होते. 

 

डॉ. गोरक्ष गर्जे यांनी प्राचार्य पदाच्या कार्यकाळात शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आमुलाग्र बदल घडवून आणले. स्कूल कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत मागील तीन वर्षांमध्ये शंभर टक्के प्रवेश झाले. संस्थेतील तीन शाखांचे एनबीए त्यांच्या काळात करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रवेशित मुलांचा शहरामध्ये राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी मागेल त्याला वसतीगृहाची सोय उपलब्ध करून दिली. संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यात एकजूट निर्माण करून संस्थेच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभागी करून घेतले. संस्थेतील विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला.

 

डॉ. गर्जे यांनी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे झालेल्या सर्व नाविन्यपूर्ण बदला बद्दल व विकासाबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व सगळ्यांच्या एकजुटीमुळेच आपण हे करू शकलो असेही त्यांनी सांगितले. डॉ. गर्जे यांच्या निरोप समारंभात माजी उपप्राचार्य पी. डी. पोपळे, निवृत्त माजी  विभाग प्रमुख डी.एम. लोकमनवार यांची उपस्थिती होती. पी. बी. उश्केवार, एस एम कंधारे, एस. पी. कुलकर्णी, डॉ. अवचट, प्रबंधक श्रीमती कदम, एस. आर. मुधोळकर, डॉ. अनघा जोशी, श्रीमती मुंडे, साबणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरोदे यांनी केले तर आभार डॉ. एस एम डुमणे यांनी मानले. यावेळी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी आदीं उपस्थित होते.

0000




डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्‍छुक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

इच्‍छुक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 5 :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्‍यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्‍या मानधनासाठी सहाय्यक अनुदान सन 2023-24 योजना राबविण्यात येत आहे.

इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 30 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयात प्राप्‍त होणारे प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत.

राज्यातील नोंदणीकृत मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्‍यांसाठी ज्‍या मदरसांना आधुनिक शिक्षणासाठी शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहे, अशा मदरसांकडून अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग अर्ज मागवित आहे. मदरसे धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय 11 ऑक्‍टोबर 2013 च्‍या तरतूदीनुसार विहित नमुन्‍यात अर्ज करावेत.

विज्ञान, गणित, समाजशास्‍त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांसाठी मानधन, पायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदान, शासन निर्णयातील तरतूदीनुसार मदरसामध्‍ये नियुक्‍त केलेल्‍या जास्‍तीतजास्‍त तीन डीएड, बीएड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षकांचे  प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करुन त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.

ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी जास्‍तीतजास्‍त 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.

या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्‍या पायाभूत सुविधा मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, पेय जलाची व्‍यवस्‍था करणे, प्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणे, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणे, मदरसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, संगणक, हार्डवेअर, सॉफटवेअर, प्रिंटर्स इत्यादी, प्रयोगशाळा साहित्‍य सायन्‍स कीट, मॅथेमॅटीक्‍स कीट व इतर अध्‍ययन साहित्‍यांचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्‍या तसेच अल्‍पसंख्‍यांक बहुल क्षेत्रातील मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 व अर्जाचा नमुना, आवश्‍यक कागदपत्रांची  यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा उच्‍चस्‍तरीय निवड समितीचे अध्यक्ष पी.एस.बोरगांवकर यांनी केले आहे.

000000

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थासाठी पायाभूत सोयी सुविधाबाबत अर्ज करण्याचे आवाहन

 धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थासाठी

पायाभूत सोयी सुविधाबाबत अर्ज करण्याचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सन 2023-24 साठी या योजनेतर्गंत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभासाठी अर्जाचा नमूना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी अर्ज जिल्‍हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालयात 30 जून 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष पी.एस. बोरगांवकर यांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी व ज्यु मिळून) किमान  70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मान्यताप्राप्त अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.

या योजनेतर्गंत अनुज्ञेय असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा या प्रमाणे आहेत. शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे,  विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने (लर्निग मटेरियल) एल.सी.डी.प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे,  प्रयोगशाळा उभारणे, अद्ययावत करणे,  प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे, डागडुजी करणे,   झेरॉक्स मशीन,  संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर इ. या योजनेतर्गंत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्या शाळा/संस्था यावर्षी अनुदानास पात्र असणार नाहीत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज, प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, प्रत्येक शैक्षणिक संस्थेने, डायस कोड (DIES CODE), औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी इन्स्टिट्यूट कोड तसेच अपंग शाळांनी लायसन्स नंबर देणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर आलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Friday, June 2, 2023

 महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अर्धापूर तालुक्यातील 

चार धाबाचालक व आठ मद्यपींवर कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका परिसरात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट-ब विभाग यांनी 29 मे 2023 रोजी रात्री केलेल्या कारवाईत 4 धाबाचालक / मालक व 8 मद्यपींवर कारवाई करण्यात आली.

 

अर्धापूर तालुक्यातील राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट, पिंपळगाव (शि), खालसा ढाबा, पिंपळगाव (शि),  सुप्रीया धाबा चोरंबा फाटा,  विजय धाबा दाभड शिवारचे मालक गजानन पंढरीनाथ देशमुख, बळिराम प्रकाश क्षिरसागर, बदुकर राजाराम राठोड, मोहन संभाजी बोचरे हे आपल्या धाब्यामध्ये विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या धाब्यांवर दारुबंदी गुन्हे कामी छापा घातला असता चार धाबेचालक यांनी अवैधरित्या व कसलाही दारुचा परवाना नसताना विनापरवाना आपल्या मालकीच्या धाब्यांमध्ये प्रत्येकी 2 असे एकूण 8 ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी दिल्याचे आढळून आल्याने याठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ, ब व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.

 

राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरट, पिंपळगाव (शि) ता. अर्धापूर येथील धाबा चालक गजानन पंढरीनाथ देशमुख व मद्यपिणारे ग्राहक  शिरीषकुमार संदरसिंग तेहरा रा. लेबर कॉलनी नांदेड, बळीराम बापुराव पटेवाडे रा. शिवरायनगर या आरोपींना नांदेड न्यायालयात हजर केले असता धाबाचालक / मालक यांना रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपीना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयेचा दंड ठोठावला.

 

खालसा ढाबा, पिंपळगाव (शि) ता.अर्धापूर येथील धाबाचालक बळिराम प्रकाश क्षिरसागर व इतर मद्य पिणारे ग्राहक गोविंदराव लिंबाजीराव चितेवार रा. वसंतनगर नांदेड, व्यंकटेश विलास वेणीकर रा. हनुमानगड नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक / मालक यास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपये दंड ठोठावला.

 

सुप्रीया धाबा, चोरंबा फाटा ता. अर्धापुर येथील धाबा चालक बदुकर राजाराम राठोड, इतर मद्यपिणारे ग्राहक जनार्धन सुभाषराव लांडगे रा.चोरंबा ता. अर्धापुर आकाश गोरखनाथ राठोड रा.निमगाव ता.अर्धापुर या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालक यास रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 

विजय धाबा, दाभड शिवार येथील धाबाचालक मोहन संभाजी बोचरे व मद्यपिणारे ग्राहक  दिनेश मदन सुर्यवंशी रा.दाभड ता अर्धापूर, शिवराज चंपतराव मदने रा-माळझरा ता.हदगाव जि.नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालकयास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2आरोपी इसमांना प्रत्येकी  500 रुपये असा एकूण रुपये 26 हजार रुपयोचा दंड ठोठावला.

 

वरील चारही कारवाईमध्ये धाबामालक आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे एकुण 1 लाख रुपये व 8 मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना प्रत्येकी 500 रुपये एकुण 4 हजार रुपये असे सर्व एकुण 1 लाख 4 हजार रुपये इतका दंड न्यायालयाने ठोठावला आहे.

 

ही कारवाई अधीक्षक अतुल अ. कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भरारी पथक नांदेड, शहर निरीक्षक ए.एम.पठाण / राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. शेख, दुय्यम निरीक्षक किनवट-ब चे अनिल पिकले, शिवदास कुबडे, दुय्यम निरीक्षक बळिराम इथर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान आणि जवान-नि-वाहनचालक यांनी कार्यवाहीत पार पाडली.

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. चालक मालक यांनी अवैध हॉटेल/ धाबा/ क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाचवर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होवू शकते.

 

तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक / व्यक्तीने अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 5 हजार रुपये पर्यंत दंड होवू शकतो. कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकसह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अ.अ.कानडे यांनी केले आहे.

00000

“शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                                                   “शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत

नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  “शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती करुन योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्‍यात . नागरिकांनी शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

 

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्‍यांची अंमलबजावणी गतिमान करण्‍यासाठी “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्‍याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानांतर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्‍तऐवज उपलब्‍ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

 

जिल्‍हा परिषदेच्या आरोग्‍य विभागामार्फत ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 379 उपकेंद्रातून बालकाच्‍या जन्‍मापासून ते वयोवृध्‍दांपर्यंत आरोग्‍य सेवा पुरविल्या जातात. याशिवाय विविध मोहिमांव्‍दारे सेवा सर्व लाभार्थ्‍यांपर्यंत पोहों‍चविली जाते. तसेच प्रसुती पुर्व व प्रसूती पश्‍चात सेवाही दिल्‍या जातात. ग्रामीण भागातून कोविड कालावधीत आरोग्‍य विभागाने दिलेली उत्‍कृष्‍ट सेवा सर्वांना ज्ञातच आहे.

 

“शासन आपल्या दारी” हा उपक्रमा अंतर्गत विविध आरोग्‍य विषयक योजनांचा लाभ देण्‍यात येणार आहे. जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्‍व वंदना योजना, मानव विकास – बुडीत मजुरी, नवसंजीवनी -मातृत्‍व अनुदान, आभा आय.डी, माहेर घर योजना, राष्ट्रीय बालस्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम, अनेमिया मुक्‍त भारत, आपत्‍कालीन वैद्यकिय सेवा (ई.एम.एस.), सुमन, असंसर्गजन्‍य रोग (एन.सी.डी.), कुटूंब कल्‍याण, माता बाल आरोग्‍य व नियमित लसीकरण, प्रेरणा प्रकल्‍प, मोबाईल मेडीकल युनिट, आशा, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरुक पालक सुरक्षित बालक, थोडेसे मायबापासाठी, सुनो नेहा, बालिका जन्‍मोत्सव / लक्ष्‍मीची चाहूल, बाळांत विडा  आरोग्‍य विभागाअंतर्गत विविध लोकाभिमुख या आहेत. 15 एप्रिल ते  15 जून 2023 या कालावधीत “शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत विविध योजनांची ग्रामीण भागात व्‍यापक जनजागृती, प्रसिध्‍दी व प्रचार करुन योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली.

0000

 

दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  

 

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970,8308755241,9834951752,8421150528,9404682716,9373546299,8999923229,9321315928,7387647102,8767753069 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...