Thursday, February 23, 2023

वृत्त क्रमांक 82

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग

मंत्री नितीन गडकरी यांचा नांदेड दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.45 वा. असर्जन नांदेड येथे आगमन. सकाळी 10.50 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाकडे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिक्षांत समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वा. विद्यापीठ परिसरातून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गोकुळनगरकडे प्रयाण. दुपारी 4 वा. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. गुरुद्वारा बोर्ड मैदान येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कोनशिला कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.50 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण व सायं 7 ते 7.30 वाजेपर्यंत राखीव. सायं. 7.45 वाजता कमल किशोर कदम यांच्या निवासस्थानी भेट. रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा व विश्रांती.  

 

शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी 3.45 वा. हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.50 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 माजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत

क्षेत्रीय कार्यालयात आठ सेवा उपलब्ध


औरंगाबाद, दि.21, (विमाका) :- जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात असून अशा एकूण आठ सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेवा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत पुरवल्या जात आहेत, अशी माहिती प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांच्या अधिनस्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण औरंगाबाद,जालना,बीड व परभणी यांच्या अंतर्गत शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळा या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते.

 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, औरंगाबाद,जालना,बीड व परभणी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली दिव्यांगांसाठी दिव्यांग ओळखपत्र, शासनमान्य शाळेत प्रवेश , दिव्यांगाच्या अनुदानीत विशेष शाळा. मतिमंद बालगृहे कर्म शाळा तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण अनुदानीत दिव्यांग शाळा, कर्म शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे इत्यादी योजनांची अंमलबजावणी केली जाते.

 

दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसन विषयक कार्य करण्यासाठी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणे. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते अशा एकूण आठ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेवा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद या कार्यालयामार्फत पुरवल्या जातात, अशी माहिती प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनकवडे यांनी दिली आहे.

 

*****

 वृत्त क्रमांक 81   

 

नांदेड जिल्ह्यात पाचशे आपदा मित्रांना प्रशिक्षण 

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली पुरस्कृत, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांचे मार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात 12 दिवसांच्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचची सुरुवात 26 डिसेंबर 2022 पासून झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्‍ह्यातील 500 स्वयंसेवकांना 12 दिवसांची एक बॅच याप्रमाणे सात बॅचमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

या योजनेअंतर्गत आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 7 दिवसाची थेअरी व 5 दिवसाचे प्रात्यक्षिक या गोष्टींचा समावेश होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी हा आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षित 500 आपदा मित्रांना  ओळखपत्र,  गणवेश, आपत्कालीन प्रतिसाद किट व शासनाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी नांदेड व जिल्हा प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड कार्यालय, नांदेड या ठिकाणी घेण्यात आला.

 

कोणतीही आपत्ती आल्यावर पहिल्या एका तासात जर मदत कार्यास सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याचा धोका टळतो. हीच गोल्डन अवरची गरज व आपत्ती व्यवस्थापनात जनतेचा सहभाग लक्षात घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016 मध्ये देशातील 25 राज्यातील 30 जिल्ह्यांमधून प्रायोगिक तत्वावर “आपदा मित्र” या योजनेची सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यामधून 200 याप्रमाणे एकूण 6 हजार आपदा मित्र प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेची सफलता लक्षात घेऊन 28 सप्टेंबर 2021 रोजी देशातील 350 जिल्ह्यांमधून ही योजना राबवून त्यातून 1 लाख आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट होते.

 

यामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. यामध्ये काही जिल्ह्यांना 200 तर काही जिल्ह्यांना 300 व काही जिल्ह्यांना 500 आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. यामध्ये 500 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याने पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण वेळेवर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उप विभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे तसेच महसूल सहाय्यक पिंटू सपकाळ, बालाजी चौहाण यांनी काम पाहिले.

0000    

 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 करिता

प्रवेशिकांना 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 च्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि, प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

००००

Wednesday, February 22, 2023

 वृत्त क्रमांक 80

 

बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे

न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

 

·         नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचेही होणार भूमीपूजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन व नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते शनिवार 25 फेब्रुवारी रोजी होत आहे.  बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीचे उद्घाटन सकाळी  11 वा. न्यायालय संकुल, बिलोली येथे संपन्न होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. बिलोली अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार नागनाथराव पाटील, बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश-1 दिनेश ए. कोठलीकर यांची उपस्थिती राहील. बिलोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या नूतन इमारत बांधकामाचे क्षेत्रफळ 1912.91 स्के. मी. आहे.

 

याचबरोबर नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ शनिवार 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.30 वा. मामा चौक, कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश वि. न्हावकर राहणार आहेत. जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए बांगर व अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश मारुतीराव पुंड यांची यावेळी उपस्थिती राहील. जिल्हा व सत्र न्यायालयाची ही नूतन इमारत तळमजला व त्यावर सहा मजले याप्रमाणे आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 26515.56 चौ.मी असे आहे.

00000



वृत्त क्रमांक 79

 जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवाचे

1 ते 5 मार्च या कालावधीत आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 चे औचित्‍य साधून कृषि विभाग व आत्‍मा यांच्या संयुक्‍त विद्यमाने “नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे’’ आयोजन 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्‍सवास नागरिकांनी भेट देऊन जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करुन  शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

 

हा महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्‍यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र / कृषि विद्यापीठाचे स्‍टॉल, विविध कृषि निगडीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषिसंलग्‍न शासकीय विभागाचे स्‍टॉल असे एकुण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत. त्‍याचबरोबर विविध विषयांचे चर्चासत्र, खरेदी विक्री संमेलनाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 म्‍हणून साजरे करण्‍यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्‍यामध्‍ये ज्‍वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा यासारख्‍या पिकांचा समावेश आहे. पिकाचे आहारामध्‍ये महत्‍व कळावे यासाठी चर्चासत्र पाककृती स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येणार आहे. याचबरोबर याचा आहारामध्‍ये समावेश व्‍हावा यासाठी त्यापासुन तयार होणारे विविध पदार्थांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.

 

यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गट, शेतकरी उत्‍पादक कंपनी व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. महोत्‍सवांच्‍या ठिकाणी आपल्‍या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु,  ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी) टरबुज, खरबुज इत्यादी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. तसेच सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फुलभाज्‍या व रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेले लाकडी घाण्‍याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासुन तयार करण्‍यात आलेले वस्‍तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्‍चा माल व काळा गहू उपलब्‍ध राहणार आहे.

0000

Tuesday, February 21, 2023

वृत्त क्रमांक 78

 वैद्यकिय महाविद्यालय परिसरातील

एसटीपी प्लांटच्या मशीनला आग

 

कोणतीही जीवितहानी नाही  

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी परिसरात एसटीपी प्लांट (मलशुद्धीकरण केंद्र) च्या यंत्रसामुग्री बसवण्याची प्रक्रिया खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे सुरू होती. त्याला वेल्डिंग करत असतांना मंगळवार 21 रोजी दुपारी 2.30 वा. अचानक आग लागली. त्या टाकीमध्ये असणाऱ्या प्लास्टिकच्या मटेरियलने आग धरली. तात्काळ अग्निशामन दलास पाचारण करण्यात आले व आग अटोक्यात आणण्यात आली. त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी किंवा इजा झाली नसल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी दिली.  

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...