Wednesday, April 6, 2022

मासेमारीसाठी तलाव / जलाशय

ठेक्याने देण्याची प्रक्रिया सुरू

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीसाठी नांदेड जिल्ह्यातील 38 तलाव / जलाशय शासन निर्णयातील तरतुदीनुसार विनामुल्य / बोली लिलाव / जाहिर लिलाव पद्धतीने ठेक्याने देण्यात येणार आहे. प्रसिद्धी केलेल्या ठेका दयावयाच्या 38 तलाव / जलाशयावरील नोंदणीकृत संस्थेबाबत कोणास आक्षेप असल्यास त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध नांदेड यांच्याकडे 15 दिवसाच्या आत आक्षेप नोंदवावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय (ता) सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी केले आहे.

 

प्राप्त आक्षेपाबाबत त्यांच्या स्तरावर सुनावनी आयोजित करुन संबंधित तलाव / जलाशय शासन निर्णेयातील अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाची अंतिम यादी तयार करण्यात येईल. ही अंतिम यादी तलाव ठेका समितीसमोर सादर झाल्यानंतर विहित शासन नियमावलीनुसार तलाव / जलाशय ठेक्याने देण्याची प्रक्रिया आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई यांच्या निर्देशानुसार 30 एप्रिल 2022 पूर्वी करण्यात येणार आहे. मुदतीत न आलेल्या आक्षेप व तक्रारीबाबत कोणतीही दखल घेतली जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

 

राज्यातील उपलब्ध भूजलाशीय क्षेत्रामध्ये मासेमारीसाठी मोठया प्रमाणावर असलेला वाव लक्षात घेवून रोजगार निर्मितीतून वाढीव मत्स्योत्पादन घेण्यासाठी कृषि व पदुम विभागाद्वारे मत्स्य व्यवसायासाठी जलाशय / तलाव ठेक्याने देण्यासाठी शासन निर्णय 3 जुलै 2019 नुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने निर्मित केलेल्या व मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारीसाठी हस्तांतरीत केलेले तलाव / जलाशय ठेक्याने देण्याची कार्यवाही विहित पध्दतीचा अवलंब करुन मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे करण्यात येते. या कार्यवाहीच्या अनुषंगाने उद्ववणाऱ्या वादाबाबतचा निपटारा करण्याचा शासन परिपत्रक 24 नोव्हेंबर 2021 अन्वये मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ठेक्याने देण्यात येणाऱ्या तलाव, जलाशय आणि त्यावर नोंदणीकृत कार्यक्षेत्र असलेल्या संस्थाचा तपशिल सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था दुग्ध नांदेड यांना सादर केला आहे. तसेच येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलकावरही प्रसिद्धीसाठी दिले आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मत्स्यव्यवसाय (ता) सहाय्यक आयुक्त जे. एस. पटेल यांनी सांगितले आहे.

00000

 तहसिल कार्यालयात जप्त बोटीचा लिलाव

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड तालुक्यात गोदावरी नदी परिसरातील पथकामार्फत धाडी टाकून 4 बोटी जप्त केल्या आहेत. या बोटी तहसिल कार्यालयाच्या परिसरात असून या जप्त  बोटीचा लिलाव बुधवार 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे होणार आहे. सर्व संबंधितांनी तहसिल कार्यालय परिसरातील या 4 बोटी पाहून तपासून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार यांनी केले आहे.  

00000

Monday, April 4, 2022

प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत  

महसूल वसुलीचे 106 टक्के उद्दीष्ट पूर्ण 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2021-22 मध्ये महसूल वसुली व अंमलबजावणी कामकाजात महसूल वसुलीच्या 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. महसूल वसुली कामात उद्दिष्ट 177 कोटी रुपये एवढे होते यात 188 कोटी रुपयाची पूर्तता करून 106 टक्के कामाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. तर अंमलबजावणी कामकाजात 738 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते यात 696 लाख रुपयाची उद्दीष्ट पूर्तता करून 94 टक्के हे काम पूर्ण केले आहे. 

नांदेड विभागाने एकुण 188 कोटी रुपयाची महसूल वसुली केली आहे. वाहन अंमलबजावणी (वाहन तपासणी) कामात 13 हजार 420 दोषी वाहनधारकांकडून 696 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकाद्वारे नांदेड कार्यालयाने 2 हजार 184 वाहनांकडून 168 लाख रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रादेशिक विभागाने मागील तीनही आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून शासनाने दिलेल्या महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, हिंगोली कार्यालानेही त्यांचे काम चांगले पार पाडले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात सुद्धा या विभागाकडून महसूल वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात सोमवार 4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 एप्रिल 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000


 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने

शिकाऊ, पक्के अनुज्ञप्तीसाठी मासिक शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी एप्रिल 2022 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट 5 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

 

तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड तालुक्यासाठी 9 ते 23 एप्रिल 2022, मुखेड तालुक्यासाठी 7 एप्रिल, किनवट तालुक्यासाठी 13 एप्रिल, हदगाव तालुक्यासाठी 20 एप्रिल, धर्माबाद तालुक्यासाठी 22 एप्रिल, हिमायतनगर तालुक्यासाठी 26 एप्रिल तर माहूर तालुक्यासाठी 29 एप्रिल 2022 रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000  

 परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र

नूतनीकरण, पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- केंद्र शासनाने 4 ऑक्टोंबर 2021 च्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात वाढ केली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. ही अधिसूचना केंद्र सरकारच्या morth.gov.in  या संकेतस्थळावर व तसेच कार्यालयीन सुचना फलकावर उपलब्ध आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन 4.0 प्रणालीमध्ये परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 कोविड-19 च्या अनुषंगाने लागू केलेले निर्बंध मागे

 ·  नव्या मार्गदर्शक सूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोविड-19 रुग्णांची कमी झालेली संख्या व आरोग्य सुविधेवरील कमी झालेला ताण तसेच कोविड-19 च्या प्रतिबंधाच्या अनुषंगाने सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत.    

·नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये निर्गमीत केलेल्या आदेशान्वये लागू केलेले सर्व निर्बंध याद्वारे 1 एप्रिल 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आले असून ते पुढे अंमलात राहणार नाहीत.

·कोविड-19 चे व्यवस्थापन व प्रतिबंधाचे अनुषंगाने भारत सरकार कडील 22 मार्च आणि 23 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेले मार्गदर्शक सूचना सर्व संबंधित अधिकारी, स्थानिक प्रशासनाने तंतोतंतपणे पालन करावे.

· जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना व संस्थांनी कोविड अनुरुप वर्तनाचे (ज्यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आदीचा समावेश आहे) पालन करावे, कारण ते व्यक्ती आणि समाजाचे आरोग्य व सुरक्षेसाठी सर्वात मोठी ढाल म्हणून कार्य करते.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साथरोगाच्या उद्रेक याबाबत विविध परिमाणे जसे प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नविन रुग्णांची संख्या, उपचाराधिन रुग्णांची संख्या (ॲक्टीव्ह केसेस), बाधित रुग्णसंख्येचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) तसेच दवाखान्यात उपराधिन रुग्णांसाठी वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे.

· कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात तात्काळ कळविण्यात यावे. जेणेकरुन साथरोगाचा पुन:श्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.

· जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासनाचे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना व जनजागृतीचे कार्यक्रम चालू ठेवावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 मार्च 2022 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...