Monday, June 29, 2020



वृत्त क्र. 584
व्यवसायकर दात्यांना विवरणपत्रके
भरण्यास 31 जुलैची मुदत 
नांदेड (जिमाका) दि. 29 :- व्यवसायकर अधिनियम 1975 अंतर्गत नोंदीत व्यवसायकर दात्यांनदेय असलेली सर्व विवरणपत्रके 31 जुलै 2020 च्या आत भरण्याची मुदत दिली आहे. राज्य व्यवसायकर विभागाने 22 जून रोजी निर्गमीत केलेल्या अधिसुचनेनुसार 30 जून पर्यंत प्रलंबीत असलेले सर्व मासीक, वार्षीक विवरणपत्र भरताना लागणारा विलंब शुल्क माफ केला आहे.
व्यवसायकर दात्यांनी या संधीचा लाभ घेऊन विवरणपत्रके भरण्यास अडचण असल्यास व्यवसायकर अधिकारी, जीएसटी भवन रेल्वेस्टशन समोर, नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर क्षेत्र नागपूरचे राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर) व्ही. डी. कामठेवाड यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 583   
कोरोनातून 2 व्यक्ती बरे तर 4 नवीन बाधित व्यक्तींची वाढ   
नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोना आजारातून पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील  2  बाधित व्यक्ती आज बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 371 बाधितांपैकी एकुण 281  व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. यातील 74 बाधित व्यक्ती हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 16 व्यक्तींचा इतर आजारासह कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवार 29 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 86 अहवालापैकी 79 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर त्यात 4 नवीन बाधित व्यक्ती आढळले. नवीन बाधितांमध्ये देगलूर नाका येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड नवीन कौठा येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, बाफना परिसरातील 60 वर्षाची 1 महिला, मुखेड येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
उपचार घेत असलेल्या 74 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50  55 वर्षाच्या दोन महिला व वय  38,42,67 व 75  वर्षाचे चार  बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 74  बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 44 तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 7 बाधित  औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले. सोमवार 29 जून रोजी 117  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 681,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 335,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 469,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 04,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 371,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 03,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 16,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 281,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 74,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 117 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

सुधारीत वृत्त क्र. 582


कृषि संजीवनी सप्ताहात गुणवत्ता, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ यावर होणार जागर
▪ 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त विशेष उपक्रम
नांदेड (जिमाका) दि. 29 :-  महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्‍त दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘‍कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्‍यात येतो. यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृद्ध व्हावा यासाठी दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यावर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा कृषि विभागामार्फत जागर करण्यात येणार असल्याची  माहिती  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.  
 या  जागरात खरीप हंगाम यशस्‍वी करण्‍यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत पोहचविण्‍यासाठी राज्‍यातील कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्‍हा परीषद, कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे, आत्‍मा, पोक्रा, मधील कार्य करणारे कृषितज्ज्ञ, कृषिमित्र हे शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील.  
या सप्ताहात गावांमध्‍ये सुक्ष्‍म नियोजन, गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. विविध गावात कृषि विषयक राबविलेल्‍या नाविन्‍यपुर्ण उपक्रमांना कृषितज्ज्ञांच्या निवडक शेतकऱ्यांसह भेटी दिल्या जाणार आहेत. तालुक्‍यातील कृषि पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी तसेच नाविन्‍यपुर्ण, प्रयोगशील व उल्‍लेखनीय काम करणा-या शेतक-यांच्‍या सत्‍काराचे व त्‍यांच्‍या मार्गदर्शनपर व्‍यख्‍यानाचे आयोजन, कृषिविषयक मोफत सल्ला, एम किसान पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविण्‍याची मोहिम, विविध पीक स्‍पर्धा आणि पुरस्‍कारांबाबत प्रचार- प्रसिध्‍दी, जलयुक्‍त शिवार अभियान, एकात्‍मीक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, मागेल त्‍याला शेततळे याबाबतच्या यशोगाथा आदिंबाबत  या सप्ताहात भर राहिल, असे कृषि विभागाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
याचबरोबर पीक उत्‍पादन खर्च कमी करण्‍याबाबत, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत जनजागृती, प्रसिध्‍दी व मार्गदर्शन केले जाईल. जमीन आरोग्‍य पत्रिका वितरण, परंपररागत कृषि विकास योजना, केंद्र व राज्‍य शासनाच्‍या कृषि व कृषि संलग्‍न विभागांच्‍या शेतक-यांसाठी असलेल्‍या योजना, कापसावरील शेंदरी बोंड आळी, मकावरील लष्‍करी अळी, ऊसामधील हुमणी आणि सोयाबीनवरील मोझॉक व पिवळा मोझॅक व्‍यवस्‍थापनाबाबत कृषितज्ज्ञ बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील. रुंद सरी वरंबा यंत्र वापराची व पेरणीची प्रात्‍याक्षिके, बिजप्रक्रिया, कडधान्‍य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहुपीक पध्‍दतीचा प्रसार, एकात्‍मीक शेती पध्‍दती संकल्‍पनेबाबत, हायड्रोफोनिक्‍स, हिरावा चारा निर्मिती, श्री/चारसुत्री, बी- बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्‍यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मुलस्‍थानी जलसंधारणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन व आत्‍पकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
0000000

Saturday, June 27, 2020


वृत्त क्र. 581   
कोरोनातून 5 व्यक्ती बरे
नवीन 18 व्यक्ती बाधित  
नांदेड (जिमाका) दि. 27 :- कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 349 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले. शनिवार 27 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 80 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर 18 नवीन बाधित व्यक्ती आढळले.   
नवीन बाधितांमध्ये विष्णुपुरी येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, शिवाजीनगर येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, बोरबन परिसरातील 55 वर्षाची 1 महिला, गोकुळनगर येथील 58 वर्षाची 1 महिला, बिलालनगर येथील 6 वर्षाची 1 मुलगी, नाथनगर येथील 22 वर्षाची 1 महिला, भगतसिंघ रोड येथील 52 वर्षाची 1 महिला, पिरबुऱ्हानगर येथील 19 व 20 वर्षाच्या 2 महिला व 3 वर्षाचा 1 बालक, उमरकॉलनी येथील 28 व 60 वर्षाच्या 2 महिला, लेबरकॉलनी येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, देगलूरनाका शिवनगर नांदेड येथील 64 वर्षाची 1 महिला, नायगाव ताकबीड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, गॅस गोडाऊन लोहा येथील 52 वर्षाची 1 महिला व 55 वर्षाचा 1 पुरुष आणि चंद्रभागानगर कंधार येथील 44 वर्षाच्या 1 महिलेचा यात समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
58 बाधितांवर औषधोपचार चालू असून यातील 6 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50  55 वर्षाच्या दोन महिला बाधित व 38, 42, 67 व 75  वय वर्षाचे 4 बाधित पुरुषांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 58  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 39, एक बाधित नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1  बाधित व्यक्ती उपचार घेत असून 3 बाधित औरंगाबाद आणि 1 बाधित व्यक्ती सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 27 जून रोजी 115  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 536,
घेतलेले स्वॅब- 6 हजार 133,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 311,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 18,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 349,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 16,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 275,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 58,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 115 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



वृत्त क्र. 580   
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 74 शेतकऱ्यांच्या तक्रारीवर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतली सुनावणी
नांदेड (जिमाका) दि. 27 :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंतर्गत पोर्टलवर प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समिती कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून तक्रार निवारणाची प्रक्रिया 26 जून पासून सुरु झाली. जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठका झाल्या असून जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालया व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत 74 शेतकऱ्यांच्या पोर्टलद्वारे प्राप्त तक्रारी, आक्षेपावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुनावणी घेतली. या ऑनलाईन कॉन्फरन्स सुविधेमुळे नांदेड येथे जाण्या-येण्याचा प्रवास करावा लागत नसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही दि. 27 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे.  1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच अल्पमुदत पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाख रुपयापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी स्थगित होती. त्यानंतर 18 जून पासून आधार प्रमाणिकरण सुरु करुन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.
नांदेड जिल्ह्यात एकूण 1 लाख 85 हजार 983 शेतकऱ्याची कर्ज खाती या योजनेंतर्गत प्राप्त झाले असून आधार प्रमाणिकरणसाठी 1 लाख 63 हजार 894 शेतकऱ्यांची संकेतस्थळावर यादी प्राप्त झाली आहे. त्यापैकी 1 लाख 12 हजार 867 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. तर 51 हजार 27 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण करतेवेळी शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती रक्कम किंवा आधार क्रमांक याबाबत आक्षेप घेतल्यामुळे पोर्टलद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे आजपर्यत प्राप्त तक्रारीची संख्या 716 आहे. या 716 तक्रारीपैकी र नमूद केल्याप्रमाणे 74 आक्षेपकर्त्याच्या तक्रारीची सुनावणी घेण्यात आलेली आक्षेपाबाबत कार्यवाही चालू आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.  
00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...