Monday, June 29, 2020

सुधारीत वृत्त क्र. 582


कृषि संजीवनी सप्ताहात गुणवत्ता, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ यावर होणार जागर
▪ 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त विशेष उपक्रम
नांदेड (जिमाका) दि. 29 :-  महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्‍त दरवर्षी 1 जुलै हा दिवस ‘‍कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्‍यात येतो. यानिमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृद्ध व्हावा यासाठी दिनांक 1 ते 7 जुलै या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी शासनाच्या मार्गदर्शनाखाली कृषि संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यावर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा कृषि विभागामार्फत जागर करण्यात येणार असल्याची  माहिती  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.  
 या  जागरात खरीप हंगाम यशस्‍वी करण्‍यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत पोहचविण्‍यासाठी राज्‍यातील कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्‍हा परीषद, कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे, आत्‍मा, पोक्रा, मधील कार्य करणारे कृषितज्ज्ञ, कृषिमित्र हे शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील.  
या सप्ताहात गावांमध्‍ये सुक्ष्‍म नियोजन, गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. विविध गावात कृषि विषयक राबविलेल्‍या नाविन्‍यपुर्ण उपक्रमांना कृषितज्ज्ञांच्या निवडक शेतकऱ्यांसह भेटी दिल्या जाणार आहेत. तालुक्‍यातील कृषि पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी तसेच नाविन्‍यपुर्ण, प्रयोगशील व उल्‍लेखनीय काम करणा-या शेतक-यांच्‍या सत्‍काराचे व त्‍यांच्‍या मार्गदर्शनपर व्‍यख्‍यानाचे आयोजन, कृषिविषयक मोफत सल्ला, एम किसान पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविण्‍याची मोहिम, विविध पीक स्‍पर्धा आणि पुरस्‍कारांबाबत प्रचार- प्रसिध्‍दी, जलयुक्‍त शिवार अभियान, एकात्‍मीक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, मागेल त्‍याला शेततळे याबाबतच्या यशोगाथा आदिंबाबत  या सप्ताहात भर राहिल, असे कृषि विभागाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
याचबरोबर पीक उत्‍पादन खर्च कमी करण्‍याबाबत, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत जनजागृती, प्रसिध्‍दी व मार्गदर्शन केले जाईल. जमीन आरोग्‍य पत्रिका वितरण, परंपररागत कृषि विकास योजना, केंद्र व राज्‍य शासनाच्‍या कृषि व कृषि संलग्‍न विभागांच्‍या शेतक-यांसाठी असलेल्‍या योजना, कापसावरील शेंदरी बोंड आळी, मकावरील लष्‍करी अळी, ऊसामधील हुमणी आणि सोयाबीनवरील मोझॉक व पिवळा मोझॅक व्‍यवस्‍थापनाबाबत कृषितज्ज्ञ बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील. रुंद सरी वरंबा यंत्र वापराची व पेरणीची प्रात्‍याक्षिके, बिजप्रक्रिया, कडधान्‍य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहुपीक पध्‍दतीचा प्रसार, एकात्‍मीक शेती पध्‍दती संकल्‍पनेबाबत, हायड्रोफोनिक्‍स, हिरावा चारा निर्मिती, श्री/चारसुत्री, बी- बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्‍यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मुलस्‍थानी जलसंधारणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन व आत्‍पकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
0000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...