Sunday, April 14, 2019


कामगार मतदारांसाठी
नियंत्रण कक्षाची स्थापना 

नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यातील कामगार मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी भरपगारी सुट्टी अथवा अपवादात्मक परिस्थितीत दोन तासाची सवलत देण्याचे निर्देश असून नांदेड, देगलूर, कंधार येथे कामगार मतदारांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 
लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या  शॉपिग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनामध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावाण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश आहेत.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथे एस. के. भंडारवार (सुविधाकार) (मो.9823212434) यांची नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय देगलूर येथे ए. डी. कांबळे (सुविधाकार) (9423439165) तर दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय कंधार येथे डी. बी. फुले (माथाडी निरीक्षक) (9767048031) यांना नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सर्व कारखाने व आस्थापनांनी मतदारांना मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत देणे आवश्यक आहे. सुट्टी न मिळाल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास मालक, आस्थापनाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी रजा दयावी व आपणही मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
मतदानाची शपथ
लोकशाही बळकटीसाठी मतदारांना अधिक साक्षर व जागृत करण्याच्या उद्देशाने स्वीप-3 हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून कामगार कार्यालयाच्यावतीने मतदारात जनजागृती करण्यात येत आहे. विविध आस्थापना व कारखान्यात कामगारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात येत आहे.
एमआयडीसी धनेगाव, कृष्णूर, धर्माबाद येथील पायोनियर, सिट्रस, फ्लीमीगो, साईसिम्रनसह  अनेक कारखान्यातील अडीच ते 3 हजार कामगारांना मतदान प्रतिज्ञा देऊन जनजागृती करण्यात येत आहे. मतदरांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता सर्वांनी मतदान करावे, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
000000



लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन
नांदेड, दि. 12 :- निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या तसेच मतदार व उमेदवारांसोबतच अभ्यासक, विश्लेषकांना मार्गदर्शक ठरणा-या लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी यांचे कक्षात करण्यात आले.  
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मीडिया कक्ष प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. दीपक शिंदे, श्री मिलिंद व्यवहारे, विधी अधिकारी  आनंद माळाकोळीकर, नायब तहसीलदार नितेश कुमार बोलेलु, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे आदी उपस्थित होते.
मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी 'स्वीप'मोहीम राबवली गेली. त्याद्वारे आखण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.
याशिवाय महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग,  मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.
नाविन्यूपर्ण उपक्रम
निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगातर्फे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. मतदार जनजागृती, व्हीव्हीपॅट यंत्र, सी-व्हिजिल ॲप हे त्याचाच एक भाग आहे. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदाराला आपण केलेल्या मतदानाची खात्री पटणार आहे. या यंत्राची रचना व कार्य याबाबत माहिती देण्यात आली आहे. निवडणूक काळात तिसरा डोळा म्हणून भूमिका बजाणाऱ्या ‘सी-व्हिजिल’ ॲपचा वापर कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे कसे होईल याबाबातदेखील निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पीडब्लूडी ॲप व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याबाबत आढावा या अंकात घेण्यात आला आहे.
मतदारांना ऑनलाईन ओळखपत्र, मतदार यादीतील बदल आदींबाबत अर्ज कसा करता येईल, रंगीत ओळखपत्र, मतदानासाठी कुठले ओळखपत्र ग्राह्य धरता येईल, आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे आदींबाबत माहिती देण्यात आली आहे.      
सुलभ संदर्भ
अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी 2009, 2017 च्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रे, एकूण मतदार नोंदणी, पुरुष व महिला मतदारांची संख्या, एकूण मतदार व एकूण झालेले मतदान, पहिल्या पाच उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आदी माहितीचा यात समावेश करण्यात आला आहे.
आदर्श आचार संहिता
आदर्श आचार संहितेबाबात नेहमी विचारल्या जाणा-या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या अंकात देण्यात आली आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांसाठी ही प्रश्नोत्तरे मार्गदर्शक ठरणारी आहेत. याची सविस्तर माहिती अंकात समाविष्ट करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेबांचे विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मतदार आणि एक मूल्य’ हे तत्त्व स्वीकारून भारतीयांना प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवून दिला. याबाबाच्या लेखाचाही अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
0000


“मी मतदान करणारच.... या सेल्फी पॉइंट” चे उद्घाटन
नांदेड, दि. 12 :- मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी “मी मतदान करणारच.... यासेल्फी पॉइंट”चे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग यांच्या  हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उद्घाटन करण्यात आले आहे. 
नांदेड  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानाविषयी जनजागृती व्हावी. स्वीपकक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्याकडून या सेल्फी पॉइंटचे  आयोजन करण्यात आले आहे. शहरात बसस्थानक व रेल्वे स्थानक याठिकाणी सुद्धा सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहे. या ठिकाणी भेट देऊन सर्व नागरिकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घ्यावा. सोशल मीडियावर प्रसारित करुन मतदार जनजागृती अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा  व जास्तीत जास्त  मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी, निवासी जिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अनुराधा ढालकरी, गीता ठाकरे, संतोष कंदेवार, किरण अंबेकर, प्रशांत डिग्रसकर, दिलीप बनसोडे,  मिलिंद व्यवहारे तसेच कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सेल्फी पॉइंट हा उपक्रम  यशस्वी करण्यासाठी स्वीप कक्षाचे सदस्य प्रलोभ कुलकर्णी, शेख रुस्तूम, रवी ढगे,कविता जोशी, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर,  धिरेन आठवले,अभिजीत हिवरे  यांनी परिश्रम घेतले.
00000

Wednesday, April 10, 2019


दारु दुकाने शनिवारी बंद
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात श्री रामनवमी उत्सव शनिवार 13 एप्रिल 2019 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहे.
या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी शनिवार 13 एप्रिल 2019 रोजी श्री रामनवमी उत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बिआर-2, ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

Tuesday, April 9, 2019


मी मतदान करणार - सेल्फी मोहीम अभिनव उपक्रम
नांदेड, दि. 8 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी स्वीप कक्ष, 87- नांदेड मतदार संघ व पीपल्स महाविद्यालय नांदेड  यांच्या संयुक्त विद्यमाने  मी मतदान करणार – सेल्फी मोहीम अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकी मध्ये शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून “मी मतदान करणार” असा उपक्रम राबविला.  ELC क्लब कडून यातील तीन उत्कृष्ट सेल्फींना पारितोषिके देण्यात आली. यासाठी प्रा. वडवळे स्वीप कक्ष प्रमुख नयना पवार स्वीप कक्ष सदस्या सारिका आचमे, मुसने, बस्वदे, वानखेडे,  वाकोडे व झरीवाड यांनी पुढाकार घेतला.
000000



शांतता समितीची बुधवारी बैठक
नांदेड, दि. 8 :- श्रीराम नवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निमित्ताने नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक बुधवार 10 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वा. बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित केली आहे, असे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य सचिव अक्षय शिंदे यांनी कळविले आहे.
000000


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती   
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 8 :- बौद्ध बांधवांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती रविवार 14 एप्रिल 2019 रोजी मोठया उत्साहात नांदेड जिल्हयात साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर 15ते 30 एप्रिल 2019 या कालावधीत ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका, कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी केली जाते. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दरम्यान सर्व कार्यक्रम, मिरवणुका शांततेत पार पडावेत, कसल्याही प्रकारची बाधा येवू नये व जिल्हयात शांतता टिकुन राहावी यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 अन्वये आदेश निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार जिल्हयात सर्व पोलीस स्टेशनचे स्वाधीन अधिकारी असलेले अंमलदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. हा आदेश दिनांक 12 एप्रिल 2019 ते 30 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्री पर्यत लागु राहील.
आदेशात म्हटले आहे, रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी . अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजे अर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नांनाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियत्रंण ठेवण्याबाबत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकुमापेक्षा कमी दर्जाचे व त्यापुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनीक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबधी.
            कोणीही हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येऊ शकतो अशा घोषणा देऊ नयेत.
            हा आदेश लग्नांच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...