Sunday, February 18, 2018


 देगलूर तालुक्यातील होट्टल येथे आयोजित  होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिलीत गायन करताना पं. शौनक अभिषेकी आणि संचाने रसिकजनांची मने जिंकली. ( छाया - विजय होकर्णे नांदेड ) 






होट्टलच्या शिल्पवैभवाच्या साक्षीने
सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव सुरु
नांदेड, दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील होट्टल ता. देगलूर येथील चालुक्यकालिन शिल्पकलेचा नमुना असलेल्या पुरातन मंदिराचा व स्थापत्य कलेचा मौल्यवान ठेवा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने आयोजित होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ एका दिमखदार कार्यक्रमात शनिवारी झाला.
आमदार सर्वश्री अमर राजूरकर, सुभाष साबणे, प्रताप पाटील चिखलीकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून होट्टल ता. देगलूर येथे आयोजित केलेल्या होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार अमर राजूरकर, आमदार सुभाष साबणे, आमदार डी. पी. सावंत,  आमदार वसंत चव्हाण, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, दत्तात्रय रेड्डी, पंचायत समिती सभापती शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, लक्ष्मण ठक्करवाड, रामराव नाईक आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात खा. चव्हाण यांनी मेगा सर्किट टूरिझम या योजनेखाली जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे विकसित केल्याचे सांगून होट्टल हे पर्यटन स्थळाचे महत्व लक्षात घेता ते जागतिक पातळीवर पोहोचवावे, असे आवाहन केले. यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून होट्टल व परिसरातील ऐतिहासिक व पुरातन स्थळांचे महत्व छायाचित्रांसह प्रक्षेपित करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी यासारखे प्राचीन वैभव जोपासण्याची गरज प्रतिपादन केली.
आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या भाषणात होट्टल परिसरातील पुरातन ठेवा जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून लिंगनकेरुर येथील तलाव जलपर्यटनासाठी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्य शासनाकडून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून पर्यटन विकासाला चालना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी दिलेल्या आमदारांचेही जाहिर आभार मानले. यावेळी आमदार राजूरकर यांनीही मनोगत मांडले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी सांगितली. चालुक्यकालिन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले होट्टल हे पर्यटनस्थळ अधिक नावारुपास यावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नृत्यगणेशाच्या पूजनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. देगलूर महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक गौतम भालेकर यांनी स्वागतगीत गायले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, तहसिलदार महादेव किरवले, सरपंच शेषराव सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी गायक संगीतकार बाबुराव उप्पलवार व शिल्पकार व्यंकट पाटील यांचा तसेच सिनेतारका आदिती भागवत, हर्षदा जांभेकर, माहितीपट निर्माते यांचा सत्कार करण्यात आला. "चालुक्यन आर्ट हेरिटेज" या ग्रंथाचे विमोचनही यावेळी करण्यात आले.
या महोत्सवास मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संदिप गिल, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, गुरुनाथ कुरुडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी-अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांची मेजवाणी
होट्टलच्या शिल्पकलेच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या रंगमंचावर सकाळपासून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी होट्टल येथील कलावंत भार्गव देशमुख यांच्या तबलावादनाने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. दुपारच्या सत्रात "चालुक्यकालिन स्थापत्य कला" या विषयावरील चर्चासत्र झाले. यावेळी डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा. एम. जी. महाके आणि गुरुनाथ कुरुडे यांनी होट्टलच्या शिल्पवैभवाविषयी माहिती देत या परिसरातील चालुक्यकालिन स्थापत्य कलेबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. औरंगाबादच्या प्रसाद माडेकर आणि संचाने सुगम संगीताची मैफल रंगविली. उद्घाटन समारंभानंतर सिनेतारका आदिती भागवत व हर्षदा जांभेकर यांच्या कथ्थक नृत्य आणि लावणीच्या जूगलबंदीने रसिकजनांची मने जिंकली. मोठ्या संख्येने रसिकांनी सर्व कार्यक्रमांना दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला.
000000

Saturday, February 17, 2018


माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस
गर्भलिंग निदान चाचणी तसेच अवैध पद्धतीने गर्भपात
करणाऱ्यांची माहिती द्यावी - अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील    

  नांदेड, दि. 17 :- सोनोग्राफी केंद्रात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान अथवा अनोंदणीकृत गर्भपात केंद्रात अवैध पद्धतीने गर्भपात होत असल्यास त्याची माहिती तक्रार टोल फ्री क्र. 18004334475 किंवा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
गर्भधारणापूर्व व प्रसव पूर्व गर्भलिंग निदान निवडीस प्रतिबंध कायदा 2003 ची परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता पथकाची स्थापना केली आहे. त्यानुसार दक्षता पथकाची बैठक अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली 16 फेब्रुवारी रोजी  घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी सोनोग्राफी केंद्रात अवैध पद्धतीने गर्भपात होत असल्यास किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असल्यास अशी माहिती देणाऱ्यास शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी .पी कदम यांनी दिली.
या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रात तपासणी करण्यात आलेल्या गरोदर मातांच्या सोनोग्राफीचा आढावा घेण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणाची माहिती देण्यात आली.  जास्तीतजास्त नागरिकांनी गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची व अवैध पद्धतीने गर्भपात करणाऱ्या केंद्रांची तक्रार टोल फ्री. क्रमांकावर नोंदवावी, असेही आवाहन केले आहे.
बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुमती ठाकरे, पी. जी. देशपांडे, पोलीस निरीक्षक,डॉ. एस. व्ही. फुलवरे, सामाजिक कार्यकर्ती डॉ. शोभा वाघमारे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अन्सारी, विधी समुपदेशक-पीसीपीएनडीटी कक्षाचे अॅड. पुजा राठोर यांची उपस्थिती होती.
000000


भाड्याचे घर, दुकान, जागा
देणाऱ्या मालकांना नोंदणीचे आवाहन  
नांदेड, दि. 17 :- भाड्याचे इमारती, दुकाने, घर, ब्लॉक अथवा जागा देणाऱ्या मालकांनी महाराष्ट्र रेंट कट्रोल ॲक्ट 1999 चे कलम 55 नुसार भाडे करार, लिव्ह लायसन्स करार भारतीय नोंदणी कायद्यानुसार नोंदविणे बंधनकारक आहे, असे आवाहन नांदेडचे मुद्रांक जिल्हाधिकारी एस. के. बोधगिरे यांनी केले आहे.
भाडे करारनामे, लिव्ह लायसन्स करारनामे नोंदविणे नोंदणी कायदा 1908 अन्वये ही घरमालक, जागामालक, दुकानमालक यांची जबाबदारी आहे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास घरमालकांना तीन महिन्याची कैद अथवा पाच हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. सर्व घरमालकांनी, दुकानमालकांनी जागा मालकांनी भाडे करारनामे, लिव्हलायसन्स करारानामे तात्काळ नोंदणीकृत करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
श्री गुरुगोविंद सिंघजी जयंती उत्साहात साजरी
नांदेड, दि. 17 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे श्री गुरुगोविंद ससिंघजी यांची 351 मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विजेंद्रसिंघजी कपुर व  गुरमितसिंघजी पुजारी गुरुद्वारा यांनी मुलांना श्री गुरु गोविंदससिंघजी यांच्या त्यागाची व मानवधर्माच्या शिकवणीची जाणीव करुन दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे उपस्थित होते. तर एनएसबी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख परविंदर कौर कोल्हापूरे, तेजासिंघजी मुख्यग्रंथी मातासाब गुरुद्वारा यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            विजेंद्रसिंघजी कपुर यांनी श्री गुरु गोविंदससिंघजी यांच्या कार्याचे महत्व विशद करताना सद्गुण व विवेक गुण जीवनात  किती उपयोगी आहे, हे सांगितले. श्री गुरुगोविंदससिंघजी यांनी सर्व धर्मातील लोकांना समानतेचे ज्ञान दिले. शस्त्राचा वापर हिंसेसाठी नसून, अहिंसेसाठी शांततेच्या मार्गाने करावयास सांगितला. शिस्त या शब्दाचा अर्थ शिकणे होय असे सांगितले. गुरमितसिंघजी पुजारी गुरुद्वारा यांनी खालसा पंथाने सर्वच धर्माचा आदर करत केवळ अनिष्ठ बाबींना विरोध केला, साधू संतांचे रक्षण करण्यासाठी दूष्ठांचा समूळ नाश करण्यासाठी कार्य केले असे सांगितले.  डॉ. परविंदर कौर यांनी आपल्या भाषाणात श्रीगुरुनानक हे सर्व मानव जातीधर्मासाठी संत होते असे सांगतानाच श्री गुरुगोविंद सिंघजीच्या त्याग व बलीदानामुळे भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाल्याचे सांगितले. प्राचार्य श्री गुरुबचन सिंघजी शिलेदार यांनी संपुर्ण मानवतावादी विचारवंत असलेल्या श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या विचारांची आजही संपुर्ण जगाला आवश्यकता असल्याचे सांगितले.
 प्रसाद जाधव या विद्यार्थ्याने श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्यावर केलेली स्वत:ची रचना विद्यार्थ्यांसमोर सादर केली. तसेच यावेळी शिख संप्रदायाच्या गुरुच्या जीवनावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे  प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे यांनी गुरुनानकजींच्या शिकवणीचा अवलंब विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करावा आणि समाजहितासाठी काम करण्याचे सांगितले.
श्री गुरुगोविंदससिंघजी यांच्या 351 व्या जयंती कार्यक्रमासाठी श्री रणजितसिंघजी कामठेकर, गुरुबचनसिंघजी शिलेदार हरनामसिंघजी मनोत्रार, सुजानसिंघजी कामठेकर, आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स. सरताज सिंघ,  स. गुरुसिमरन सिंघ, स. उदयपालसिंघ, स. हंसराज सिंघ, स. गगनदिप सिंघ, सरबजोत सिंघ, तेंजिदर कौर, पुनम कौर, कोमल कौर हर्षदीप कौर  यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरणज्योत कौर संघ, तरण ज्योत कौर, कुंजीवाले या विद्यार्थीनींनी केले तर यावेळी संस्थेचे उपप्राचार्य  ए. डब्ल्यू. पावडे, प्रा. सकळकळे, प्रा. लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, श्री. आर. एम.दुलेवाड यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...