Sunday, February 18, 2018


होट्टलच्या शिल्पवैभवाच्या साक्षीने
सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव सुरु
नांदेड, दि. 18 :- नांदेड जिल्ह्यातील होट्टल ता. देगलूर येथील चालुक्यकालिन शिल्पकलेचा नमुना असलेल्या पुरातन मंदिराचा व स्थापत्य कलेचा मौल्यवान ठेवा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने आयोजित होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ एका दिमखदार कार्यक्रमात शनिवारी झाला.
आमदार सर्वश्री अमर राजूरकर, सुभाष साबणे, प्रताप पाटील चिखलीकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक विकास निधीतून होट्टल ता. देगलूर येथे आयोजित केलेल्या होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आमदार अमर राजूरकर, आमदार सुभाष साबणे, आमदार डी. पी. सावंत,  आमदार वसंत चव्हाण, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, दत्तात्रय रेड्डी, पंचायत समिती सभापती शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, लक्ष्मण ठक्करवाड, रामराव नाईक आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात खा. चव्हाण यांनी मेगा सर्किट टूरिझम या योजनेखाली जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे विकसित केल्याचे सांगून होट्टल हे पर्यटन स्थळाचे महत्व लक्षात घेता ते जागतिक पातळीवर पोहोचवावे, असे आवाहन केले. यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून होट्टल व परिसरातील ऐतिहासिक व पुरातन स्थळांचे महत्व छायाचित्रांसह प्रक्षेपित करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी यासारखे प्राचीन वैभव जोपासण्याची गरज प्रतिपादन केली.
आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या भाषणात होट्टल परिसरातील पुरातन ठेवा जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून लिंगनकेरुर येथील तलाव जलपर्यटनासाठी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्य शासनाकडून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून पर्यटन विकासाला चालना देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी निधी दिलेल्या आमदारांचेही जाहिर आभार मानले. यावेळी आमदार राजूरकर यांनीही मनोगत मांडले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील पार्श्वभूमी सांगितली. चालुक्यकालिन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेले होट्टल हे पर्यटनस्थळ अधिक नावारुपास यावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नृत्यगणेशाच्या पूजनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला. देगलूर महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक गौतम भालेकर यांनी स्वागतगीत गायले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी व्यंकट कोळी, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, तहसिलदार महादेव किरवले, सरपंच शेषराव सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी गायक संगीतकार बाबुराव उप्पलवार व शिल्पकार व्यंकट पाटील यांचा तसेच सिनेतारका आदिती भागवत, हर्षदा जांभेकर, माहितीपट निर्माते यांचा सत्कार करण्यात आला. "चालुक्यन आर्ट हेरिटेज" या ग्रंथाचे विमोचनही यावेळी करण्यात आले.
या महोत्सवास मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षक संदिप गिल, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, गुरुनाथ कुरुडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी-अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांची मेजवाणी
होट्टलच्या शिल्पकलेच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या रंगमंचावर सकाळपासून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी होट्टल येथील कलावंत भार्गव देशमुख यांच्या तबलावादनाने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. दुपारच्या सत्रात "चालुक्यकालिन स्थापत्य कला" या विषयावरील चर्चासत्र झाले. यावेळी डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा. एम. जी. महाके आणि गुरुनाथ कुरुडे यांनी होट्टलच्या शिल्पवैभवाविषयी माहिती देत या परिसरातील चालुक्यकालिन स्थापत्य कलेबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. औरंगाबादच्या प्रसाद माडेकर आणि संचाने सुगम संगीताची मैफल रंगविली. उद्घाटन समारंभानंतर सिनेतारका आदिती भागवत व हर्षदा जांभेकर यांच्या कथ्थक नृत्य आणि लावणीच्या जूगलबंदीने रसिकजनांची मने जिंकली. मोठ्या संख्येने रसिकांनी सर्व कार्यक्रमांना दाद देत टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...