Wednesday, December 27, 2017

वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 27 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2018 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 9 जानेवारी 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 10 ते शुक्रवार 12 जानेवारी 2018 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील. ज्या कर्मचाऱ्यांचे दि. 1 जानेवारी 2006 रोजीची वेतन पडताळणी अद्याप झालेली नाही त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.

0000000
आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 27 :- मासिक वेतन डिसेंबर 2017 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे डिसेंबर 2017 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र बुधवार 31 जानेवारी 2018 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.

000000

Tuesday, December 26, 2017

सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा
नांदेड, दि. 26 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 27 डिसेंबर 2017 रोजी मुंबई विमानतळ येथुन टु जेट एअर लाईन्सच्या विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30  वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने अर्धापूर-कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील. जवळा बुद्रुक ता. सेनगाव जि. हिंगोली येथून वाहनाने रात्री 11.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30   वा. नांदेड विमानतळ येथून टु जेट एअर लाईन्सच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000
होमगार्डच्या 268 पदांसाठी
4 जानेवारी पासून नाव नोंदणी
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड व देगलूर पथकातील 87 पुरुष व 181 महिला होमगार्ड पदांच्या एकुण 268 रिक्त जागांसाठी 4 ते 6 जानेवारी या कालावधीत पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड येथे नाव नोंदणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त नागरीकांनी या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.  
नांदेड पथकात- 23 पुरुष व 56 महिला, बिलोली- 12 पुरुष व 27 महिला, हदगाव- 28 पुरुष 25 महिला, मुखेड- 7 पुरुष 11 महिला, देगलूर-17 पुरुष 7 महिला, कंधार- 23 महिला, किनवट-21 महिला, भोकर- 11 महिला होमगार्डच्या रिक्त पदांसाठी ही नाव नोंदणी करण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे असून किमान दहावी उत्तीर्ण असावा. पुरुष उमेदवारासांठी उंची 162 सें.मी किमान, छाती न फुगवता 76 सेंमी, आणि फुगवून 81 सेमी असवी. 1 हजार 600 मीटर धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी अनिवार्य आहे.
  महिला उमेदवारांसाठी उंची किमान 150 सेमी असावी. आठशे मीटर धावणे व गोळाफेक ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारास या चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक प्रकारात कमीतकमी 40 टक्के गुण आवश्यक राहतील. या व्यतीरिक्त आटीआय प्रमाणपत्र, खेळाचे कमीत कमी जिल्हास्तरीय प्रमाणपत्र, माजी सैनिक प्रमाणपत्र, एनसीसीचे बी. किंवा सी प्रमाणपत्र नागरी स्वरक्षण सेवेत असल्याचे प्रमाणपत्र जडवाहन चालविण्याचा परवाना या प्रमाणपत्रधारकांना तांत्रीक अर्हता गुण दिल्या जातील.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे 4 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येईल. सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत कागदपत्रांची तपासणी व शारिरीक चाचणी घेण्यात येईल. नाव नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असल्याचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे तीन कलर फोटो, रहिवाशी असल्याचा सक्षम पुरावा, इतर शैक्षणिक कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सोबत आणावीत. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी 5 जानेवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जन नाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल. शारिरीक चाचणीत पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची मैदानी चाचणी 6 जोनवारी रोजी सकाळी 6 वा. शहीद भगतसिंघ चौक असर्जननाका विष्णुपुरी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
होमगार्ड ही निष्काम सेवा असलेले संघटन आहे. होमगार्ड स्वयंसेवकांना कुठलाही नियमीत पगार किंवा मानधन दिल्या जात नाही. कर्तव्य बजावल्यानंतरच कर्तव्य भत्ता दिला जातो. नाव नोंदणीसाठी आलेल्या कोणत्याही उमेदवाराला कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. शारिरीक किंवा मैदानी चाचणीच्यावेळी कोणताही अपघात घडल्यास किंवा शारिरीक दुखापत घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधीत उमेदवारांची राहील. या नाव नोंदणी प्रक्रियेच्या अधीक माहितीसाठी होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र भाग्यनगर जवळ नांदेड येथे प्रत्यक्ष किंवा 02462-254261 या क्रमांकावर संपर्क साधावा.
काही तांत्रिक अथवा अपरिहार्य कारणास्तव नाव नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक यांना राहील. नाव नोंदणीसाठी पैशाची मागणी केल्यास लाचलूचपत प्रतिबंधक शाखा नांदेड यांचेकडे 02462-253312 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा‍ किंवा 02462-232961 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी केले आहे.

000000
यशवंतराव चव्हाण वाड:मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठवण्‍याचे आवाहन
नांदेड, दि. 26 - मराठी भाषेतील उत्‍कृष्‍ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2017 करिता राज्‍य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्‍या प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या कार्यालयात 1 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत सादर कराव्‍यात, असे आवाहन राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या सचिव मिनाक्षी पाटील यांनी केले आहे.  
दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित झालेली  प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.  या स्‍पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी  रोड, प्रभादेवी, मुंबई - 400025 यांच्या कार्यालयात तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. 
लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2017 नियमावली व प्रवेशिका” या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 31 जानेवारी 2018 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य 1 ते 31 जानेवारी 2018 पर्यंत पाठवावे. मंडळाकडे प्रवेशिक व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर / पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2017 साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करावा, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असेही मंडळाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

00000000

Sunday, December 24, 2017

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा
नांदेड,दि.24 :- येथील जिल्‍हा पुरवठा कार्यालय व नांदेड तहसिल कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालयात उत्साहात आज साजरा करण्‍यात आला. याप्रसंगी ग्राहक पंचायतचे जिल्‍हाध्‍यक्ष पुरुषोत्तम अमिलकंठवार, श्रीमती जोशी, श्रीमती दयाळ, डॉ. भोसकर, बी. आर. लांडगे, पुरुषोत्तम जकाते, लक्ष्‍मीकांत मुळे, श्री. पांचाळ, काशीनाथ येजगे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी  अ.भा.ग्राहक पंचायत विभागाचे विभागीय संघटक आर. एस. कमटलवार यांनी ग्राहकांचे प्रबोधन केले. प्रांत उपाक्ष बा. दा. जोशी, डॉ. बालाजी कोमपलवार, विभागीय संघटक आर. एस. कमटलीवार यांनी मनोगत व्यक्त केले. अन्‍न व औषधी प्रशासन, प्रा‍देशिक परीवहन अधिकारी, वजने व मापे विभाग, निवडणूक, पुरवठा विभाग आणि गॅस व पेट्रोलपंप आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन ग्राहक कल्‍याण सल्‍लागार समिती व राज्‍य अन्‍न आयोगाचे सदस्य संपत झळके यांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक तहसिलदार किरण आंबेकर यांनी केली. सुत्रसंचालन श्रीमती एस. के. शाहाणे केले तर आभार नायब तहसिलदार विजय चव्‍हाण यांनी मानले. सुरुवातीला स्‍वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती एम. डी. वागीकर, लाठकर प्रेमानंद, सावते रामेश्‍वर, अंकुश हिवाळे, रविंद्र दोंतेवार आदींने केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार व ग्राहक बहुसंख्‍येने उपस्थित होते. 
000000


दुर्गम भागातील नागरिकांसाठी
आरोग्य शिबीर वरदान
- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे
नांदेड,दि.24: राज्यातील दुर्गम भागातील जनसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सर्व सेवा पोहचविण्यासाठी आरोग्य शिबीरामुळे मदत होत असून याप्रकारचे आरोग्य शिबीर हे नागरिकांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केले.    
            राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किनवट येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण महाआरोग्य शिबिरात श्री. बागडे बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री गिरिश महाजन, शरदरावजी ठोले, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, राम पाटील रातोळीकर, डॉ. अशोक पाटील सुर्यवंशी, धरमसिंग राठोड, संध्याताई राठोड आणि डॉ. संतुक हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            श्री. बागडे म्हणाले की, अतीदुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध होत नसलेल्या नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्व आरोग्य सेवा त्यांच्या पर्यंत पोहचविण्यास मदत होत आहे. आज याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विनामुल्य भव्य ग्रामीण महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या पाहून या आरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुकात होण्यासारखी आहे. अशा प्रकारच्या आरोग्य शिबीरामुळे नागरिकांना जीवनदान मिळत असल्याचेही ते म्हणाले.
या आरोग्य शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक स्वरुपाच्या आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यातील विविध भागातून आलेले नामांकित डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करत आहेत. तसेच सदर रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे घेऊन जाऊन त्यांच्यावर नामांकित रुग्णालयात विनामुल्य उपचार करण्यात येणार असल्याचेही श्री. बागडे यावेळी म्हणाले.  
           
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दूर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत अशा सामान्य गरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबीर एक प्रकारचा आरोग्य महाकुंभ असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टिने आज येथे ग्रामीण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या आरोग्य शिबिरात माहूर, किनवट, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर या भागातील गरजू दोन लाखाहून अधीक नागरिक लाभ घेण्यासाठी आले आहेत.  या नागरिकांसाठी अशा प्रकारचे आरोग्य शिबीर वरदान ठरत आहे. या आरोग्य शिबिरात येणाऱ्या नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करुन त्यावर उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी ही शासन उचलणार आहे. शिबीरात येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत औषधी आणि जेवणांची सोय करण्यात आली आहेत. या सामाजिक कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती, संघटना, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था, शासनाचे विविध विभाग, धार्मिक संस्था आदींचे सहकार्य शिबीरासाठी मिळाले आहे. स्थानिक डॉक्टरांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने आयोजन शक्य झाले आहे. या कार्यातून समाजसेवकांची नवी पिढी तयार होत असून, शिबीरात येणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी कितीही खर्च आला तरी प्रत्येक गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही श्री महाजन यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य दुतचे विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांनी ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. यावेळी वैद्यकीय शिक्षण, विशेष कार्यकारी अधिकारी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, महाआरोग्य शिबीर समन्वयक डॉ. यशवंत पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विशेष कार्यकारी अधिकारी (आरोग्य दूत) रामेश्वर नाईक यांनी मानले.  

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...