Wednesday, June 14, 2017

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 14  :- जिल्ह्यात सोमवार 26 जुन 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील रमजान ईद, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 12 जून  ते 26 जुन 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
 एकूण 104.92 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 14 - जिल्ह्यात बुधवार 14 जून 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकुण 104.92 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 6.56  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 74.06 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 14 जून रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 7.25 (66.38), मुदखेड- 33.33 (91.33), अर्धापूर- 2.00 (73.33) , भोकर- 5.00  (104.50) , उमरी- 0.33 (31.33), कंधार-2.50 (82.00), लोहा-7.00 (85.33), किनवट- निरंक (90.43), माहूर- निरंक (79.00), हदगाव- 35.14 (141.18), हिमायतनगर- निरंक (57.82), देगलूर- 2.17  (29.67), बिलोली- निरंक (54.60), धर्माबाद- 4.00 (59.67), नायगाव- 6.20  (61.46), मुखेड- निरंक (77.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 74.06 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1185.03) मिलीमीटर आहे.
00000000


Tuesday, June 13, 2017

नांदेडसह मराठवाड्यात आज
मध्यरात्रीपासून अतिवृष्टीचा इशारा
नांदेड दि. 13 :- मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात बुधवार 14 जून रोजी मध्यरात्रीपासून पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई कुलाबा येथील भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थाप कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.  
भारतीय हवामान खात्याच्या या इशाऱ्यात 15 जून पासून पुढे 48 तासात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 70 ते 110 मिमीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. पशुधनासह विविध बाबींबाबत काळजी घ्यावी. जीवत व वित्तहानी होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनाही सतर्क रहावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

00000
माहिती अधिकारी तोडकर यांना भावपूर्ण निरोप
नांदेड दि. 13 :- जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथील माहिती अधिकारी निशिकांत तोडकर यांची मुंबई मुख्यालयात बदली झाल्याने आज जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने कौटुंबिक सोहळ्यात श्री. तोडकर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 
याप्रसंगी श्री. तोडकर यांचा जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्री. गवळी म्हणाले की, शासकीय सेवेत बदली होत असते. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या बदलीमुळे त्याभागातील चांगल्या गोष्टी शिकण्याबरोबर नवनवीन अनुभव मिळतात. त्यामुळे आपल्यामध्ये अधिक प्रगल्भता येते. कार्यालयीन कामकाजात श्री. तोडकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगुन त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. 
माहिती अधिकारी श्री. तोडकर म्हणाले की, सर्वांचे सहकार्यातून नांदेड येथे चांगले काम करता आले. याकाळात नांदेड जिल्ह्यातील विविध घडामोडींशी समरस होऊन काम करता आले. येथील अनेकविध घटकांकडून खूप काही शिकता आले, ही खूप मोठी शिदोरी आहे. 
यावेळी लिपीक सौ. अलका पाटील, के. आर. आरेवार, वाहन चालक म. युसूफ मौलाना, अंधार कोठडी सहाय्यक अंगली बालनरसय्या यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

00000
वडेपुरीत आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड दि. 13 :- राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आज लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील माता अन्नपुर्णादेवी मंदिरच्या द्वितीय  वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 50 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून त्यात 4 पुरुष व 6 स्त्रियांना  उच्च रक्तदाब तसेच 4 पुरुष व 4 स्त्रियांना मधुमेह आढळून आला. या रुग्णांना  जिल्हा कार्यक्रम अधिकारी (एनसीडी) डॉ. दीपक हजारी यांनी जिल्हा रुग्णालयातील मोफत तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेण्याचा सल्ला दिला.

000000
वीज अंगावर पडू नये यासाठी काळजी घ्या  
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 13 :- जिल्ह्यात होणाऱ्या पावसाच्या काळात वीज कोसळुन जीवतहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे. विशेषत: खरीपाच्या तयारीसाठी शेतशिवारात कामात मग्न असलेल्या शेतकरी, शेतमजुरांनी कोसळणाऱ्या वीजपासून बचावाच्या उपायांची माहिती घ्यावी व जीवतहानी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊसाच्या काळात होणाऱ्या वीज कोसळण्याच्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मान्‍सून सक्रिय होण्‍याच्‍या आधी अवकाळी आणि पूर्वमोसमी पावसाच्‍या काळात विजा कोसळण्‍याचे प्रकार घडतात. पाऊस पडण्‍याच्‍या आधी आकाशात अचानक ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात व मोठया आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात खरिपाची तयारी सुरु असते. त्‍यामुळे शेतात काम करीत असलेल्‍या शेतकरी, मजूर आणि पशूधनांना इजा होण्याची शक्यता वाढते. अशा परीस्थितीत उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात त्‍यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्‍याही परिस्थितीत घेवू नये. 
अवकाळी पाऊस आणि गडगडाच्या कालावधीत  कोसळणारी वीज ही उंच वस्‍तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्‍या वस्‍तूवर जास्‍त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे. तात्‍काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्‍ही पाय गुडघ्‍याजवळ घेऊन त्‍यांना दोन्‍ही हातानी आवळुन ठेवावे तथा हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्‍यांवर टेकवावी. एकटे उभे असलेले मोठे झाड आणि टेकडी किंवा डोंगराचा माथा येथे विजा चमकत असताना आश्रय घेणे टाळावे. सगळयात जास्‍त धोका झाडाखाली थांबल्‍यामुळे उद्भवतो ज्‍यांच्‍या फांदया छोटया व दूरपर्यंत पसरलेल्‍या असतात. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.  झाडाच्‍या जवळ किंवा खाली उभे राहिल्‍यामुळे मनुष्‍याला अशा प्रकारे ईजा होण्‍याची, दगावण्‍याची शक्‍यता असते. धातुंच्‍या वस्‍तू जसे छत्री, चाकु, गोल्‍फ खेळावयाची छडी, भांडे विशेषत: हे जर का शरीराच्‍या वरच्‍या बाजुला असल्‍यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्‍यात.
विद्युत सुवाहक असणा-या वस्तुंपासुन दूर रहावे. विजा चमकत असताना विद्युत प्‍लगमध्‍ये कोणत्‍याही ईलेक्ट्रॉनिक वस्‍तूची जोडणी देण्‍यात येवू नये. वीज आपल्‍या घरावर कोसळली तर त्‍यातील प्रभार प्‍लगच्‍या माध्‍यमातून विद्युत प्‍लगमध्‍ये येवू शकते. विजा चमकत असताना मोबाईल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्‍ही, दुरध्‍वनी यांचा वापर करु नये. चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे. विजा कडाडत असताना वाहनातून  बाहेर येवू नये.
विजा चमकत असताना धातुंच्‍या वस्‍तू घेवून बाहेर जावू नये. जसे छत्री, धातुंची भांडी इत्‍यादी. पाण्‍यात असल्‍यास त्‍वरीत बाहेर यावे. यात जर का होडी किंवा नाव असल्‍यास त्‍यातून लवकर बाहेर पडावे. विजा चमकत असताना जर आपण बाहेर आहात तर त्‍वरीत सुरक्षित आसरा घ्‍यावा. विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्‍यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्‍वचेला मुंग्‍या, झिणझिण्‍या आल्‍यासारखे वाटते. तेंव्‍हा समजून घ्‍यावे की, वीज आपल्‍यावर पडणार आहे यावेळी त्‍वरीत जमिनीवर बसलेल्‍या मुद्रेत जावे.
इमारत सुरक्षित आसरा ठरते. जर इमारत उपलब्‍ध नसल्‍यास गुंफा, कपार हे सुरक्षित ठिकाण ठरतात. सुरक्षीत आश्रय उपलब्‍ध झालेच नाही तर उंचीच्‍या वस्‍तुंखाली आश्रय घेवू नका. जर ओसाड ठिकाणी झाड आहे तर त्‍यापासून सुरक्षित अंतर ठेवून जमिनीला टेकून बसा. उंच झाडांचा कदापिही आश्रय घेऊ नका, ते वीजपाताला आकर्षित करतात.

0000000
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता
धनजंय मुंडे यांचा दौरा
           नांदेड, दि. 13 -  राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार 14 जुन 2017 रोजी हिंगोली येथून मोटारीने रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
            गुरुवार 15 जुन 2017 रोजी नांदेड येथे राखीव व सायंकाळी सोयीनुसार नांदेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...