Wednesday, January 18, 2017

केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 18 :- जिल्हयात मुदखेड, अर्धापूर तालुक्यात  केळीचे  क्षेत्र जास्त असल्यामुळे  केळी  पिकासाठी  किड  व रोग सर्वेक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पांतर्गत तीन किड सर्वेक्षक  पिकावरील किड  व रोगाचे सर्वेक्षण करीत आहेत. केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे  संदेश देण्यात येत आहे.
तापामानातील किमान घट ही करपा रोग वाढीसाठी पोषक असल्यामुळे करपारोग नियंत्रणासाठी  हिवाळयात बागेला पाण्याचा ताण देऊ नये. दिवसा ऐवजी  शक्यतो  रात्री  ठिंबक सिंचनाद्वारे पाणी दयावे. बागेत तसेच बांधावर ठिक-ठिकाणी  रात्री शेकोटी  पेटवून धुर करावा. त्यामुळे शुष्क वातावरणातील उष्णता वाढते. थंड वाऱ्याच्या संरक्षणासाठी  बागेभेावती शेडनेट, ताटी अथवा बारदान यांचे कुंपन करावे तसेच संजीव कुंपन बागेभेावती नसल्यास कुंपन म्हणुन ज्वारी , बाजरी , मका  किंवा कडब्बा यांच्या पेंडया पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडील बाजुस लावावे. किमान तापमानातील घट करपा रोगांच्या वाढीसाठी पोषक आहे. पाण्याचा जास्त भाग  रोगग्रस्त झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने जास्तीतजास्त पाने  कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढुन एकत्र होतात. मोठा  ठिपका होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होतो त्यासाठी लहान ठिपक्यावर  कार्बेन्डॅझिम  0.05 % (0.5 ग्रॅम / लिटर ) अधिक मिलरल ऑईल 1 %  (10 मिली लिटर)  प्रमाणत फवारणी करावी .  केळी करपा रोगापासुन केळीचे होणारे नुकसान टाळावे,  असे आवाहन डॉ. व्ही. व्ही. भरगंडे  उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
मतदार जागृती चित्रकला स्पर्धेत मालेगावातील
समीरच्या चित्राला राष्ट्रीयस्तरावर नामांकन
नांदेड, दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय मतदार जागृती अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला स्पर्धेत राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या नामांकनात नांदेडच्या मालेगाव (ता.अर्धापूर) येथील शेख समीर जिलानी याच्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिवस" दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने आयोगाने यावर्षी आयोगाने विविध स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या होत्या. त्यामध्ये 15 ते 18 या वयोगटातील विध्यार्थ्यासाठी "महत्व एका मताचे" या विषयावर चित्रकला स्पर्धां घेण्याचे सूचित करण्यात आलेले होते.
त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रत्येक तालुक्यातून दोन उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. सर्व तालुक्यातील उत्कृष्ठ चित्रांमधून जिल्हास्तरावर दोन उत्कृष्ट चित्र निवडून ती राज्यस्तरावर पाठविण्यात आली होती. राज्यस्तरावरून 36 जिल्ह्यातून प्राप्त चित्रांमधून 4 चित्रांचे नामांकन राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कै. मुंजाजी पाटील विद्यालय या शाळेतील शेख समीर जिलानी या विद्यार्थ्याच्या चित्राची राज्यस्तरावर निवड करण्यात येऊन, त्याचे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मा. मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांनी केलेले आहे. राज्यातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात आलेल्या चित्रात नांदेडसह परभणी, यवतमाळ व पालघर जिल्ह्यातून प्रत्येकी एका चित्राचा समावेश आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इ स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलेले होते. याशिवाय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने जिल्ह्यात हायस्कूलमध्ये मतदान यंत्राचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येत आहे. या समीरच्या या यशासाठी, त्याचे जिल्हा निवडणूक विभागाने अभिनंदन केले आहे.

000000

Tuesday, January 17, 2017

बांधकाम गुणनियंत्रण चाचण्यांबाबत
सा.बां. विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 17 :- मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील चालू असलेल्या विकासाची बांधकामे करणाऱ्या सर्व कंत्राटदार, बिल्डर्स, मजूर सहकारी संस्था, खाजगी बांधकाम यंत्रणा यांनी आपल्या बांधकामाचा उत्तम दर्जा राखण्यासाठी गुण नियंत्रण विभागाकडून विविध चाचण्या शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरात करुन घ्याव्यात तथा दर्जेदार बांधकाम करुन देशाच्या विकासात सहकार्य नोंदवावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता , गुण नियंत्रण विभाग ( उपेप्र ) नांदेड यांनी केले आहे.
शासनाने गुण नियंत्रण चाचण्यासाठी रास्त दराचे स्वतंत्र दरपत्रक मंजूर केले आहे. सविस्तर दर पत्रकासाठी खात्याचे https://wrd.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पहावे. दर हे ऑक्टोंबर 2016 ते सप्टेंबर 2018 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहतील.  जलसंपदा खात्यातील विविध बांधकामांची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाचे गुण नियंत्रण विभाग (उपेप्र) नांदेड हे कार्यालय चैतन्यनगर येथे कार्यरत आहे. या विभागांतर्गत नांदेड, मुदखेड, सेलू, लातूर आणि औरंगाबाद येथे उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा असून भारतीय मानकानुसार चाचण्या घेण्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत. सदर प्रयोगशाळेत वज्रचुर्ण (सिमेंट), संधानक ( काँक्रीट ), वाळू (सँड), लोह (स्टील) तसेच माती / मुरमाच्या विविध चाचण्या घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

0000000

Monday, January 16, 2017

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मकरसंक्रांत, भुगोल दिन साजरा
            नांदेड दि. 16 :- मकरसंक्रांत, भूगोल दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोपीय कार्यक्रम एकत्रितपणे शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे आज संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्या  डॉ. सुनंदा रोडगे या होत्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने,  सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. माने यांनी शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषा व मातृभाषेचे महत्व विशद केले. आपल्या भाषिक संस्कृतीचा आढावा घेत ग्रामीण भागातील प्रत्येक आई ही सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीत संक्रमित करीत होती, असे सांगून शिक्षणात मातृभाषेला महत्व देवून सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे असे नमूद केले. कार्यक्रमात बीएड व एमएड प्रशिक्षणार्थ्यांनी मकरसंक्रांतीचे व भुगोल दिनाचे महत्व विशद केले. प्रा. डॉ. बेलोकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सोळुके व डॉ. बेलोकर यांनी केले.

0000000
रास्तभाव धान्य दुकानात
फेब्रुवारीसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी फेब्रुवारी 2017 साठीची साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे. 
या नियतनानुसार  प्रती  व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 4 हजार 575 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड व लोहा-494, हदगाव-446, किनवट-389, भोकर-195, बिलोली-313, देगलूर-261, मुखेड-509, कंधार-417, लोहा-362, अर्धापूर-140, हिमायतनगर-223, माहूर-220, उमरी-53, धर्माबाद-143, नायगाव-251, मुदखेड-159. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहनही  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
दहावी, बारावी परीक्षांसाठीचे
संभाव्य वेळापत्रक संकेतस्थळावर
नांदेड, दि. 16 :- फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 29 ऑक्टोंबर 2016 पासून उपलब्ध करुन देण्यात आले होते. या वेळापत्रकाबाबत सूचना, हरकती त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात मागविण्यात आलेल्या होत्या.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी तसेच माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षाचे संभाव्य वेळापत्रकाबाबत लोकप्रतिनिधी, संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, अभिप्राय यांचे अवलोकन करुन इयत्ता 12 वीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. मात्र इयत्ता 10 वीच्या इतिहास, भूगोल यासह सर्वच मुख्य पेपर सलग न ठेवता एक दिवसाचा खंड देऊन बदल करण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार लेखी परीक्षा पुढील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( सर्वसाधारण व द्विलक्षी विषय ) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षा कालावधी मंगळवार 28 फेब्रुवारी 2017 मे शनिवार 25 मार्च 2017. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा- मंगळवार 7 मार्च 2017 ते बुधवार 1 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.  दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत  www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी , असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय शिक्षण मंडळ लातूर यांनी केले आहे.

000000
“प्रत्येक मताचे महत्व”
चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
नांदेड, दि. 16 :-   मतदार जागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. “प्रत्येक मतांचे महत्व” या विषयावरील ही स्पर्धा 7 जानेवारी रोजी घेण्यात आली होती. यात प्रथम क्रमांक केब्रीज विद्यालयाची अभिलाषा साहेब नरवाडे, द्वितीय सावित्रीबाई फुले विद्यालयाची किर्ती रविंद्र बंडेवार यांनी गुणानुक्रमे यश मिळविले आहे.
विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण व प्रमाणपत्राचे वितरण बुधवार 25 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार आहे. सर्वांनी मतदार जागृतीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...