Monday, December 19, 2016

मुरघास, विद्युत चलीत कडबाकुटी
यंत्रासाठी पुशसंवर्धन विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 19 :-  राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास व विद्युत चलीत कडबाकुटी यंत्र 50 टक्के अनुदानावर वापरास प्रोत्साहन या योजनेसाठी शुक्रवार 23 डिसेंबर 2016 पर्यंत सर्वसाधारण , अनु. जाती, अनु. जमाती व अपंग पुरुष व महिला शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नियम व अटीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीशी संपर्क साधावा व अर्ज सादर करावीत , असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

000000
 जिल्ह्यात 9 नगरपरिषद, 2 नगरपंचायतीच्या
निवडणुकीची मतमोजणी शांतता सुव्यवस्थेत संपन्न
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच  नगरपरिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या मतदानाची मतमोजणी आज शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली. निवडणुकीसाठी उत्साहात 74.18 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या ठिकाणी करण्यात आली.
जिल्ह्यातील (कंसात सदस्य संख्या) देगलूर (25), धर्माबाद (19), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 17 सदस्य) या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी झाली. यात नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या 197 जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या 9 जागांसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
 मतमोजणी नंतरची पक्षनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे – नगराध्यक्ष पद (9 जागा) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 6, भारतीय जनता पक्ष – 1, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 1 आणि अपक्ष – 1.
नगरपरिषदांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी निवड झालेले उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात पक्ष) :- धर्माबाद – अफजल बेगम अ. सत्तार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- भाराकाँ),  उमरी - अनुराधा सदानंद खंडारे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष). हदगाव – ज्योती बालाजी राठोड (भाराकाँ). मुखेड – बाबुराव हणमंतराव देबडवार (भाराकाँ). बिलोली – मैथिली संतोष कुलकर्णी (भाराकाँ). कंधार – शोभाताई अरविंद नळगे (भाराकाँ). कुंडलवाडी – अरुणा विठ्ठल कुडमूलवार (भारतीय जनता पक्ष). मुदखेड – अन्सारी मुजीब अहेमद अमिरुद्दीन (अपक्ष). देगलूर - मोगलाजी ईरन्ना शिरसेटवार (भाराकाँ).
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या एकूण 197 जागांवर पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 73, राष्ट्रवादी काँग्रेस – 51, भारतीय जनता पक्ष – 28, शिवसेना – 26, बहूजन समाज पार्टी – 2, लोकभारती – 4,  समाजवादी पार्टी – 1, राष्ट्रीय समाज पक्ष – 2, एआय एमआयएम – 3, अपक्ष – 7.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीसाठी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नगरपरिषद प्रशासन विभागाच्या प्रशासनाधिकारी विद्या गायकवाड यांनीही मतमोजणीच्या माहितीचे संनियत्रण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी यंत्रणा यांच्याशी सातत्यपुर्ण समन्वय साधला. मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम नियोजित आणि काटेकोर नियोजनानुसार सुरळीत पार पाडल्याबद्दल निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तर निवडणुक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांसोबत माध्यमांचे आणि पत्रकार आदींचे आभारही मानले आहेत.

0000000
ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 19 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या मंगळवार 20 डिसेंबर 2016 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा तपशील पुढीलप्रमाणे मंगळवार 20 डिसेंबर 2016 रोजी मुंबई येथून खासगी विमानाने  सायंकाळी 6 .15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने कैलासनगरकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. श्री. अमित तिडके यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायं. 7.00 वा. ओम गार्डन, नवीन कवठा येथे श्री. उदयसिंह ठाकूर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यास उपस्थिती. सायं. 7.30 वा. मोटारीने माळाकोळी ता. लोहाकडे प्रयाण. रात्री 8.15 वा. माळाकोळी येथे आगमन व लिंबोटी (माळेगाव) ते माळाकोळी पाणी पुरवठा योजनेच्या उद्गाटन सोहळ्यास व विकास कामाचे भुमीपूजनास उपस्थिती. रात्री 9.15 वा. मोटारीने परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.   

000000

Sunday, December 18, 2016

जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी 74.18 टक्के मतदान; आज मतमोजणी

 जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी
74.18 टक्के मतदान; आज मतमोजणी
नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच  नगरपरिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यातील 283 मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी सरासरी 74.18 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्यालयी सोमवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
जिल्ह्यातील (कंसात प्रभाग संख्या) देगलूर (12), धर्माबाद (09), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 08) या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरिक्षक नियुक्त करण्यात आली होती. याशिवाय संबंधीत नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी असे एकूण 33 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मतदानासाठी 778 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 2 लाख 3 हजार 676 इतकी आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात धीम्यागतीने मतदान झाले. पण नंतरच्या टप्प्यात मतदानास वेग आला. दुपारी 3.30 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 56.58 टक्के मतदान झाले.
नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे - धर्माबाद नगरपरिषद- 70.73 टक्के, उमरी - 72.33, हदगाव - 66.52, मुखेड - 73.66, बिलोली - 69.48, कंधार -83.12, कुंडलवाडी - 81.46, मुदखेड - 71.45, देगलूर -  74.68. अर्धापूर नगरपंचायत- 78.46, माहूर नगरपंचायत - 78.57 टक्के.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांनी सकाळी मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय आणि संपर्क प्रस्थापित केला. नगरपरिषद प्रशासन विभागाच्या प्रशासनाधिकारी विद्या गायकवाड यांनीही संनियंत्रण समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यास सुरवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच 283 मतदान केंद्रावर सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रकियेस सुरवात झाली.
मुख्य निवडणूक निरिक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडून विविध मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेबाबत आढावा घेणे व मतदारांच्या सुविधांबाबत निर्देश दिले. निवडणूक निरिक्षकांनीही विविध मतदान केंद्राना भेटी देऊन, तेथील सुविधांचा आढावा घेतला. मतदानासाठी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठेही अनुचीत प्रकार न घडता मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. मतमोजणी त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्यालयी होणार आहे. त्यासाठीही निवडणूक यंत्रणेने सज्जता ठेवली आहे.  

0000000
अल्पसंख्याकाच्या विकास योजनांसाठी
प्रशासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी काकाणी
अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रम साजरा
नांदेड दि. 18 :- अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. समाजाच्या शैक्षणीक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना नेहमीच प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे सांगीतले. या समाजातील तरुणांनी शिक्षण आणि आपल्या स्वत:च्या क्षमता विकासावर लक्ष केंद्रीत करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. राजवंत सिंघ कदम्‍ब, डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांचीही व्याख्याने झाली.
कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेचे संचालक जी. बी. सुपेकर, अल्पसंख्याक विकास समिती सचिव तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड, जुबेर अहमद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, मौलाना आझाद विकास महामंडळाचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अल्‍पसंख्‍यांक समाज विविध धर्म, जाती, पंथ, प्रांत, भाषा, प्रथा, परंपरा यामध्ये विखुरला आहे. पण घटनेने देशाती सर्व घटकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक याबाबत समान अधिकार दिलेली आहेत. अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून साजरा करताना अल्‍पसंख्‍यांकांच्‍या उन्‍नतीसाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल.  कमतरतांवर कशी मात करता येईल आणि नेमकी बलस्थाने काय काय आहेत यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. अल्पसंख्याक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्‍युवृतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करणे, त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे समुह करून विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणे असे प्रयत्न करता येतील. पोलीस भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्गासाठी अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धा असायला पाहिजे, जास्‍तीत जास्‍त संख्येने लाभ घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या विविध समाजातील तरुणांनी डिजीटायझेशनच्या युगातील कौशल्य आत्मसात करावीत. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकासांच्या प्रशिक्षण, योजनांमध्ये सहभाग घ्यावा. त्याद्वारे आपली आणि समाजाची उन्नती साधावी, अशी अपेक्षाही श्री. काकाणी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट रोकडरहित (कॅशलेस) व्यवहार, आधार लिंकिंग अशा संकल्पनाबाबतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात डॉ.राजवंतसिंघ कदम्‍ब आणि डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांची अल्‍पसंख्‍यांक नागरिक त्‍यांच्‍या घटनांत्‍मक व कायदेशीर हक्‍कांची जाणीव-माहिती बदल राज्‍यघटनेत असलेल्‍या विविध कलमांच्‍या संदर्भात माहिती सांगितली. अल्‍पसंख्‍यांकांना राष्‍ट्रीय विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहातील समावेशाची आवश्‍यकतेबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच शेवटी आभारही मानले.

000000

Saturday, December 17, 2016

निवृत्तीवेतनधारकांच्या हयात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन
“जीवन प्रमाणपत्र” सुविधा उपलब्ध-कोषागाराचे आवाहन
नांदेड दि. 17 :- राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना हयातीचे दाखले देण्यासाठी बायोमेट्रीक म्हणजेच त्यांच्या बोटांचे ठसे किंवा त्यांच्या डोळयातील ‘आयरीस’ Finger Prints Reader किंवा Iris Reader या यंत्रावर ठेवून संबंधित निवृत्तीवेतन धारकाची ओळख पटविता येणे शक्य झाले आहे. नुकतेच जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे बोटांचे ठसे वाचण्यासाठी Finger Prints Readers ही यंत्रे बसविण्यात आली आहेत. निवृत्तीवेतनाचे प्रदान नियमीतपणे होण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच त्यांनतर देखील या नवीन “जीवन प्रमाणपत्र” ‘Digital Life Certificate’ सुविधेचा जास्तीतजास्त सेवा निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोग गग्गड यांनी केले आहे.
शासनाने जीवनप्रमाण www.jeevanpramaan.gov.in या नावाने वेबपोर्टल तयार केली आहे. सेवा निवृत्तीवेतनधारकांना दरमहा प्राप्त होणारे निवृत्तीवेतन नियमितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवृत्तीवेतन धारकांना आपले हयातीचे प्रमाणपत्र आपल्या बँकेमार्फत अथवा थेट कोषागारामध्ये जमा करावे लागते.
            बोटांचे ठसे घेण्याची सुविधा आपल्या जिल्हा कोषागारामध्ये आणि सर्व उपकोषागार कार्यालयांमध्ये करण्यात आलेली आहे तसेच इतर कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयातही ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. नजीकच्या काळात ही सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, राष्ट्रीयकृत बँका येथे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी निवृत्तीवेतन धारक व्यक्तीने आपली सर्व वैयक्तिक माहिती म्हणजेच त्यांचा पी.पी.ओ. क्रमांक (Pension Payment Order), बँक पासबुक, नाव, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेउन यावे. तेथे त्यांना ही माहिती ‘जीवन प्रमाण’ पोर्टल वर भरण्यासाठी मदत केली जाईल. त्यांचे बायोमेट्रीक ऑथेंटीकेशन पूर्ण झाल्यावर त्याबाबत त्यांच्या मोबाईलवर त्यांना एसएमएस प्राप्त होईल. यासाठी पी.पी.ओ. क्रमांक अचुक भरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
            जीवन प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ‘जीवन प्रमाण’ संकेतस्थळावर 'Pensioner Log-in’ केल्यास Digital Life Certificate सादर करण्याची व कोषागार कार्यालयात स्वीकृती यशस्वीरीत्या झाली किंवा नाही याची देखील माहिती संकेतस्थळावर आपल्याला मिळू शकेल. अर्थातच ही नवीन (Digital Life Certificate) सुविधा आपल्याला मिळालेली एक जास्तीची सुविधा आहे. आतापर्यंत आपण वापरत असलेली ‘कागदी हयातीचे प्रमाणपत्र किंवा दाखले’ हे यापुढे देखील देता येतील. त्यामुळे ज्यांना या सुविधेचा लाभ घेता येणे, अडचणीचे वाटत असेल, त्यांना यापूर्वी प्रमाणेच आपले हयातीचे दाखले आपल्या बँकेमार्फत, पोस्टाव्दारे किंवा थेट कोषागार किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपकोषागारामध्ये पाठविता येतील.

000000
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी
आयुर्वेद महाविद्यालयात तीन मतदान कक्ष
 नांदेड, दि. 17 : - महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 साठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे तीन मतदान कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या कालावधीत मतदान घेण्‍यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 ही प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयी घेण्याबाबत अवर सचिव तथा नि‍वडणूक निर्णय अधिकारी महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 यांनी कळविले आहे.  नऊ सदस्‍यांच्‍या या निवडणुकीकरीता एकूण 49 उमेदवार आहेत. महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेले नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 1 हजार 883 वैद्यकीय व्‍यावसायिक ( एमबीबीएस झालेले डॉक्‍टर्स) या निवडणुकीचे मतदार आहेत. ही मतदार यादी प्रबंधक महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद यांचेमार्फत प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निवडणुकीसाठी 14 अधिकारी-कर्मचारी आणि 4 चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रत्‍येक मतदान कक्षा करीता 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...