जिल्ह्यात 9 नगरपरिषद,
2 नगरपंचायतीच्या
निवडणुकीची मतमोजणी शांतता
सुव्यवस्थेत संपन्न
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच
नगरपरिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या
मतदानाची मतमोजणी आज शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली. निवडणुकीसाठी उत्साहात 74.18
टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या ठिकाणी
करण्यात आली.
जिल्ह्यातील (कंसात सदस्य संख्या) देगलूर (25),
धर्माबाद (19), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 17
सदस्य) या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि
माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी झाली.
यात नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या 197 जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक
रिंगणात होते. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या 9 जागांसाठी 53 उमेदवार निवडणूक
रिंगणात होते.
मतमोजणी नंतरची पक्षनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे –
नगराध्यक्ष पद (9 जागा) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 6, भारतीय जनता पक्ष – 1,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 1 आणि अपक्ष – 1.
नगरपरिषदांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी
निवड झालेले उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात पक्ष) :-
धर्माबाद – अफजल बेगम अ. सत्तार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- भाराकाँ), उमरी - अनुराधा सदानंद खंडारे (राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष). हदगाव – ज्योती बालाजी राठोड (भाराकाँ). मुखेड – बाबुराव हणमंतराव
देबडवार (भाराकाँ). बिलोली – मैथिली संतोष कुलकर्णी (भाराकाँ). कंधार – शोभाताई अरविंद
नळगे (भाराकाँ). कुंडलवाडी – अरुणा विठ्ठल कुडमूलवार (भारतीय जनता पक्ष). मुदखेड –
अन्सारी मुजीब अहेमद अमिरुद्दीन (अपक्ष). देगलूर - मोगलाजी ईरन्ना शिरसेटवार
(भाराकाँ).
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या एकूण 197 जागांवर
पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 73,
राष्ट्रवादी काँग्रेस – 51, भारतीय जनता पक्ष – 28, शिवसेना – 26, बहूजन समाज
पार्टी – 2, लोकभारती – 4, समाजवादी
पार्टी – 1, राष्ट्रीय समाज पक्ष – 2, एआय एमआयएम – 3, अपक्ष – 7.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी
सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण
समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली. निवडणुकीसाठी मुख्य
निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अन्य चार
वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आज सकाळी
10 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या
मार्गदर्शनानुसार मतमोजणीसाठी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नगरपरिषद
प्रशासन विभागाच्या प्रशासनाधिकारी विद्या गायकवाड यांनीही मतमोजणीच्या माहितीचे
संनियत्रण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व मतमोजणी यंत्रणा यांच्याशी सातत्यपुर्ण
समन्वय साधला. मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
ठेवण्यात आला.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी
श्री. काकाणी यांनी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम नियोजित आणि काटेकोर
नियोजनानुसार सुरळीत पार पाडल्याबद्दल निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे
अभिनंदन केले आहे. तर निवडणुक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या
विविध घटकांसोबत माध्यमांचे आणि पत्रकार आदींचे आभारही मानले आहेत.
0000000
No comments:
Post a Comment