|
आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संपूर्ण भारतभर 21 ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृतीदिन’ म्हणून पाळला जातो. आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील 231 अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना ही मानवंदना…
देशाबाहेरील शत्रुंपासून राष्ट्राचे, राष्ट्रातील नागरिक, त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संरक्षण दलाच्या लष्कर, वायु सेना आणि नौदलातर्फे अहोरात्र पार पाडण्यात येत असते. तर देशांतर्गत शत्रूपासून, समाजविघातक कंटकांपासून नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे, कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे कर्तव्य संबंधित राज्याच्या पोलीस दलांकडून करण्यात येते. आपले कर्तव्य बजावताना काही वेळा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वीरमरणदेखील पत्करावे लागते. अशाप्रकारे कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. त्याशिवाय भारतातील सर्व पोलीस दलांकडून कवायतींचे आयोजन करून 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली जाते. 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्याचे कारण म्हणजे 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाखमधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस दलातील 10 जवान गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला कडवे आव्हान देत त्या 10 जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरली होती. या वीर पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना अतिशय उच्च कोटीचे शौर्य दाखवले होते. त्यांनी दाखविलेल्या त्या शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाण प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी, म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर ‘पोलीस स्मृतिदिन’ या नावाने पाळला जातो. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे देखील वेळप्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावून नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करण्यात तसूभरही कमी नाहीत. मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर,2008 रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेले सहपोलीस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर, पोलीस निरीक्षक बापूराव धुरगूडे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भोसले, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, वाहनचालक अरुण चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल सर्वश्री विजय खांडेकर, जयवंत पाटील, अंबादास पवार, योगेश पाटील आदींची शौर्यगाथा तर आपल्या मनावर कायमची कोरली गेली आहे.आपल्यासाठी शहीद झालेल्या या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कृतज्ञतापूर्ण मानवंदना. -देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) (वृत्त). |
Thursday, October 20, 2016
शहीद पोलिसांना मानवंदना
Wednesday, October 19, 2016
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
वाचन प्रेरणा दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- डॉ. ए. पी. जे. अब्दुल
कलाम यांची जयंती शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे विविध उपक्रम राबवून
वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळावी
यासाठी ग्रंथप्रदर्शन, वाचनकट्टा निर्मिती वाचलेल्या पुस्तकावर चिंतनात्मक विचार,
काव्यवाचन, मौलिक विचारमंथन आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर मराठी
आणि इंग्रजी भाषेत भित्तीपत्रे तयार करुन त्यांचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. त्यांनी
अस्तित्व या पुस्तकावर त्यांचे मुक्तचिंतन सादर करुन प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा
दिली. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन 2016-18
च्या तुकडीच्या संपर्क सत्राचे उद्घाटन केले. डॉ. शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मिळाल्याबद्दल पुस्तक भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनी याप्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. साखरे,
प्रा. सोळुंके, डॉ. मुळे, डॉ. बेलोकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी
ग्रंथप्रदर्शनास व वाचन कट्टावर सहभाग नोंदविला. मुक्त विद्यापीठाचे शिक्षणशास्त्र पदवी सन 2016-18 चे प्रवेशित
शिक्षक आणि नियमित बी.एड प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाची प्रशिक्षणार्थी तसेच सर्व
कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
0000000
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची
निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू
नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र विधान परिषदेतील नांदेड, सांगली-सातारा,
भंडारा-गोंदिया, यवतमाळ, पुणे, जळगाव या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक
जाहीर झाली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू
झाल्याची माहिती नांदेड जिल्हा निवडणूक
कार्यालयाने दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने या
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्यासाठी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी
राहणार आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. निवडणूक अधिसूचना जारी
करणे बुधवार 26 ऑक्टोंबर 2016. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार
2 नोव्हेंबर. नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवार 3 नोव्हेंबर. उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची अंतिम मुदत शनिवार 5 नोव्हेंबर. निवडणुकीसाठी मतदान शनिवार 19 नोव्हेंबर
2016 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होईल. निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22
नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होईल. या निवडणुकीची संपूर्ण
प्रक्रिया गुरुवार 24 नोव्हेंबर 2016 पूर्वी पूर्ण करण्यात येईल.
0000000
हृदय, मुत्रपिंड अवयदानासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॅारिडॅार
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना , प्रशासनाचे यश
नांदेड, दि. 19 :- अवयवदान आणि या
अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॅारिडॅार म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात
नांदेड यशस्वी झाले आहे. हृदय नांदेडच्या श्री. गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून
मुंबईकडे रवाना करण्यात आले. तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. यानिमित्ताने
विष्णुपूरीतील डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने
अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून, अवयव प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची
प्रक्रीया महानगरानंतर पहिल्यांदाच यशस्वी करून दाखवली आहे. नांदेडच्या सुधीर
रावळकर यांच्या अवयवांमुळे पाच जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. रावळकर कुटुंबियांनी
दाखविलेल्या धीरोदत्तपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अवयव प्रत्यारोपीत
होणाऱ्यांच्या कुटुंबात समाधान परतणार आहे.
अवयवदान आणि अवयवाच्या
वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला.
ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था
आणि आरोग्य यंत्रणांना गतीमान केले. विष्णुपूरीतून विमानतळापर्यंत हेलीकॅाप्टरनेही
हृदय पाठविण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली. पण अखेरीस विष्णुपूरी ते विमानतळ
हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या तेरा मिनिटांत पार करण्यात आले.
मुखेड तहसीलमधील रोहयोचे
सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर अपघात झाला
होता. उपचारार्थ दाखल केल्यानंतर, रावळकर यांचा मेंदू-मृत झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे आपघातग्रस्त रावळकर यांच्या कुटुंबियांना सावरण्याबरोबरच, जिल्हा प्रशासन
आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाने रावळकर यांच्या
अवयदान समंतीपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवांचे दान करण्यासाठी प्रयत्न सुरु
केले. याबाबत अवयदानाशी निगडीत औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात
आला. अवयवदाता आणि प्रत्यारोपण करावयाचा रुग्ण यांच्याबाबतच्या वैद्यकीय चाचण्या
तसेच अनुषांगीक सर्व औपचारिकता पुर्ण केल्यानंतर आज सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी
मुंबईतील फोर्टींस हॅास्पीटलचे हृदय-प्रत्यारोपण तज्ज्ञ डॅा. अन्वय मुळे, डॅा.
विजय शेट्टी, डॅा. संदीप सिन्हा तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी
हॅास्पीटलचे डॅा. कमलेश बोकील, मुत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमल नयन
बजाज रुग्णालयाचे डॅा. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले.
डॅा. शंकरराव चव्हाण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, डॅा. पी. टी.
जमदाडे, डॅा. राजेश अंबुलगेकर, डॅा. श्रीधर येन्नावार, डॅा. नितीन नंदनवनकर, डॅा.
डी. पी. भुरके, डॅा. एच. व्ही. गोडबोले यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयातील
शस्त्रक्रियागृह सज्ज ठेवली. दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी हृदय घेऊन डॅा. मुळे
आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या तेरा मिनिटात हा ताफा
विमानतळावर पोहचला आणि दोनच मिनिटात हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर
दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवान झाले. तर औरंगाबादचे पथक
मुत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले.
ग्रीन कॅारिडॅार
आणि वैद्यकीय सज्जतेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न
एकीकडे अवयदान आणि
प्रत्यारोपणासाठीच्या वैद्यकीय सज्जतेसाठी विष्णुपूरी आरोग्य संकुलातील
शस्त्रक्रियागृहाशी निगडीत वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी काल रात्रीपासून प्रयत्नशील
होते. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी काकाणी यांनी ग्रीन कॅारिडॅारसाठी जिल्हा पोलीस
अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडित,
उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याशी समन्वय साधला. विमानतळापर्यंतच्या ग्रीन
कॅारिडॅारसाठी नांदेड ग्रामीणचे निरीक्षक गजानन सैदाने आणि शहर वाहतूक शाखेचे
निरीक्षक राजा टेहरे, निरीक्षक नारनवार यांनी प्रयत्न केले.
थॅंक्यू..नांदेड..आणि
प्रशासनाचे अश्रू..
हृदय घेऊन डॅा. मुळे
वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्टमधून वाहनाकडे जाताना..तिथे असलेल्यांकडे
पाहून..हात हलवून म्हणाले...थॅंक्यू नांदेड..थॅंक्यू...त्यांचा विष्णुपूरी ते
विमानतळ हा ऐरवी चाळीस-पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागणारा प्रवास विक्रमी तेरा
मिनिटांत पार पाडला..त्यानंतर हृदयासह मुंबईकडे रवाना होतानाही, डॅा. मुळे यांनी
कृतज्ज्ञपोटी हात हलवून निरोप घेतला. एकीकडे नांदेडसारख्या शहरात अवयवदानाचा
प्रयोग यशस्वी झाला. हृदय, यकृत आणि मुत्रपिंड, डोळ यासारखे अवयव दान करण्यात यश
आले. पण दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाशी निगडीत एक उमदा सहकारी-मित्र
गमावल्याची खिन्नता..जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती.
0000000
Tuesday, October 18, 2016
नांदेड
तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांची आज बैठक
नांदेड दि. 18 :- नांदेड तालूक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार व सेतू
संचालक यांची आढावा बैठक बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. तहसिलदार नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली
तहसिल कार्यालय नांदेड येथे आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीत नांदेड तालुक्यातील
लाभार्थ्याची यादी अद्यावत करणे, शिधापत्रिका संगणकीकरण करणे, ईपीडीएसवर योजना अद्यावत करणे यासर्व बाबी
व इतर महत्वाच्या पुरवठा विषयक बाबीवर तहसिलदार हे आढावा घेणार आहेत.
अन्नधान्य नियतन मंजूरी नुसार ऑनलाईन नुसार कार्ड संख्या बरोबर करुन घेणे. अंत्योदय किंवा प्राधान्य कुटूंब
लाभार्थी पात्र शिधापत्रीकाधारक यांना अन्नधान्यची आवश्यकता नसेल तर या शिधापत्रीकाधारकांनी आपले अन्नधान्य
Give up करण्यासाठी बैठकीस सर्व रास्तभाव दुकानदार
यांनी स्वतः हजर राहण्याचे आवाहन तहसिलदार
नांदेड यांनी केले आहे.
0000000
सैनिकी शाळा
सातारा येथील प्रवेश प्रक्रिया सुरू
नांदेड दि. 18 :- सैनिकी शाळा सातारा येथे इयत्ता 6
वी व 9 वीच्या सन 2017-18 सत्राच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. ऑनलाईन परिपूर्ण भरलेले अर्ज मंगळवार 18 नोव्हेंबर 2016 रोजी पर्यंत भरावयाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.sainiksatara.org.in या
संकेतस्थळाला भेट दयावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट
सोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड
ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे प्राचार्य सैनिक शाळा सातारा या कार्यालयात
पोहोचण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत राहील.
इयत्ता 6 वीसाठी पाल्याचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2007 मधील झालेला असावा, इयत्ता 9 वीसाठी पाल्य 2 जुलै 2003 ते 1 जुलै 2004 मधील जन्म झालेला असावा. सध्या
मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 8 वीमध्ये शिकत असावा. इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी
प्रश्नपत्रिका फकत इंग्रजीमधून असतील. प्रवेश संस्था 6 वीसाठी अंदोज 100 इयत्ता 9
वीसाठी 5 अशी राहील.
राखीव जागा पुढील प्रमाणे
आहे. अनुसूचति जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती
साडे सात टक्के, सैनिक सेवतील आजी व माजी कर्मचाऱ्यांची मुले 25 टक्के अ.ज.
व अ.जा. यांच्या राखीव जागा सोडून राहतील.
प्रवेश परीक्षा रविवार 15 जानेवारी 2017 रोजी असून माहितीपत्रक व
प्रश्नपत्रिकाचे दरपत्रक सामान्यवर्ग, संरक्षणदल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर
मागास वर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये. फक्त अनुसूचित जाती व
अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी 300 रुपये आहे. मुलांच्या जातीच्या दाखल्याची
झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक आहे.
0000000
प्रयत्न केल्याशिवाय जीवनात
यश मिळणे अशक्य
- पोलिस
अधिक्षक संजय ऐनपुरे
नांदेड, दि. 18 :- जोश अंगात खूप आहे,
पण त्याचं करायचे काय, काय करु
नये योग्य वयात जाण आल्यास करिअर घडू
शकते. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना उतारवयात जपण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक संजय ऐनपुरे यांनी
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आयोजित व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
बोलताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.
श्री. ऐनपुरे म्हणाले की, करिअर घडविण्यासाठी मोठया शहरात जा , आपले आदर्श
निवडा, चांगल्या शिक्षकांचा संस्थेचा शोध घ्या यासाठी
स्थलांतर करावे लागले तर ते करा.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयपूर्तीसाठी अग्रक्रम ठरवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे त्यांनी सांगितले. तरुण वय
असल्यामुळे काही वेळा मोहाचे क्षण येतील ते ध्येयापासून परावृत्त करु शकतात
पण देशाचे नाव उंचावयाचे असेल तर
या मोहाच्या क्षणाला बळी न पडता
वेळीच स्वत:ला सावरावे. 8 ते
10 तास नियमित अभ्यासासाठी दयावा, असेही त्यांनी सुचविले. संत तुकारामाच्या पंक्ती स्पष्टीकरणासह सांगतानाच ग्रीक विचारवंत
सॉक्रेटिस यांच्या विचाराचा उहापोह आपल्या भाषणातून त्यांनी केला. विविध विषयांवर असलेली त्यांची मजबूत पकड विद्यार्थ्यांना मोहून टाकणारी
ठरली. यावेळी महिला व तक्रार निवारण समितीच्या समुपदेशिका राधा गवारे
यांनी वेगवेगळया कायद्या संदर्भात सविस्तर विवेचन केले. आधुनिक प्रसार माध्यमांचा गैरवापर मुला-मुलींनी केल्यास त्याच्या परिणामाची जाणीव करुन दिली. स्वत:च्या घरातल्या संगणकावर ही आक्षेपार्ह मजकुर, चित्र
असतील तर कायद्याच्यादृष्टीने अडचणीत आणणारे ठरेल असेही
त्यांनी सांगितले. मुला-मुलींसाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
उपप्राचार्य बी. व्ही. यादव, डॉ. जी.
एम. डक, प्रा. साळुंके
हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बिट्टेगिरी यांनी केले
तर आभार प्रा. दमकोंडवार यानी मानले.
0000000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

