Tuesday, October 18, 2016

प्रयत्न केल्याशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य
- पोलिस अधिक्षक संजय ऐनपुरे
नांदेड, दि. 18 :- जोश अंगात आहे, पण त्याचं करायचे काय, काय करु नये योग्य वयात जाण आल्यास करिअर घडू शकते. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना उतारवयात जपण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक संजय ऐनपुरे  यांनी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आयोजित व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य  पी. डी. पोपळे हे होते.
श्री. ऐनपुरे म्हणाले की, करिअर घडविण्यासाठी मोठया शहरात जा , आपले आदर्श निवडा, चांगल्या शिक्षकांचा  संस्थेचा शोध घ्या यासाठी स्थलांतर करावे लागले तर ते करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयपूर्तीसाठी अग्रक्रम ठरवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे त्यांनी सांगितले. तरुण वय असल्यामुळे काही वेळा मोहाचे क्षण येतील ते ध्येयापासून परावृत्त करु शकतात पण देशाचे नाव उंचावयाचे असेल तर या मोहाच्या क्षणाला बळी पडता वेळीच स्वत:ला सावरावे. 8 ते 10 तास नियमित अभ्यासासाठी दयावा, असेही त्यांनी सुचविले. संत तुकारामाच्या पंक्ती स्पष्टीकरणासह सांगतानाच ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस यांच्या विचाराचा उहापोह आपल्या भाषणातून त्यांनी केला. विविध विषयावर असलेली त्यांची मजबूत पकड विद्यार्थ्यांना मोहून टाकणारी ठरली. यावेळी महिला तक्रार निवारण समितीच्या समुपदेशिका राधा गवारे यांनी वेगवेगळया कायद्या संदर्भात सविस्तर विवेचन केले. आधुनिक प्रसार माध्यमांचा गैरवापर मुला-मुलींनी केल्यास त्याच्या परिणामाची जाणीव करुन दिली. स्वत:च्या घरातल्या संगणकावर ही आक्षेपार्ह मजकुर, चित्र असतील तर कायद्याच्यादृष्टीने अडचणीत आणणारे ठरेल असेही त्यांनी सांगितले. मुला-मुलींसाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
उपप्राचार्य  बी. व्ही. यादव, डॉ. जी. एम. डक, प्रा. साळुंके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बिट्टेगिरी यांनी केले तर आभार प्रा. दमकोंडवार यानी मानले.

0000000 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...