Saturday, September 17, 2016

शंकरराव चव्हाण स्मृतीसंग्रहालयास
राज्यमंत्री खोतकर यांची भेट
नांदेड, दि. 17 :- माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयास वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे भेट देऊन, दिवंगत डॅा. चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांचाही यथोचित सत्कारही केला.
मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली डॅा. शंकरराव चव्हाण यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. यानिमित्ताने शारदा भवन एज्युकेशन सोसायाटीच्यावतीने या कार्यक्रमाये औचित्य साधण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, जिल्हा परिषदेचे तसेच मनपाचे पदाधिकारी, अधिकारी आदींची उपस्थिती होती.   
स्मृतीसंग्रहालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संग्रहालयातील प्रेक्षागृहात छायाचित्रकार होकर्णे प्रस्तुत कर्मयोगी या लघुपट प्रदर्शित करण्यात आला. उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांचा राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. राज्यमंत्री खोतकर यांनी स्मृतीसंग्रहालयाचीही मान्यवरांसोबत पाहणी केली.

0000000
शेतीपूरक व्यवसाय , प्रक्रिया उद्योगांद्वारे
जिल्ह्याच्या विकासाला दिशा देऊ या - राज्यमंत्री खोतकर
मुक्तीसंग्राम दिनी राष्ट्रध्वज वंदन; हुतात्म्यांना पुष्पचक्र, मानवंदनेने आदरांजली

नांदेड, दि. 17 :- आगामी काळात शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यांसह पशुसंगोपन व्यवसायासाठी नियोजनपुर्वक प्रयत्नातून जिल्ह्याच्या विकासासाठी दिशा देण्याचा प्रयत्न केले जातील , असा विश्र्वास वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे व्यक्त केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठया दिमाखात संपन्न झाला. या समारंभात शुभेच्छापर संदेश देताना श्री. खोतकर बोलत होते. यावेळी उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली.  
ध्वजवंदनापुर्वी राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष मंगलाताई गुंडले, महापौर शैलजा स्वामी, स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीच्यावतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे, गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक संदिप डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, पदाधिकारी, अधिकारी व जेष्ठ नागरिकांनीही पुष्पअर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.   
शुभेच्छापर संदेशात राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी नांदेड जिल्ह्याने मराठवाडा मुक्तीसंग्रामात धडाडीने सहभाग नोंदविला असून, मुक्तीसंग्रामातून ध्येयाप्रती सर्वस्वाचा त्याग करण्याची प्रेरणा घ्यावी लागेल असे नमूद केले. श्री. खोतकर पुढे म्हणाले की, गेली तीन वर्षे निसर्गाने अवकृपा केली होती, पण यंदा चित्र वेगळे आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, तर वेळेवर पेरण्या झाल्यामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट कामे झाली आहेत. त्यांचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. लोकसहभाग, जिल्हा प्रशासनाचे सुनियोजन आणि विविध घटकांचा सकारात्मक प्रतिसाद यांना अभियान यशस्वी करण्याचे श्रेय द्यावे लागेल. आगामी काळात जलसंवर्धनाची ही लोकचळवळ अशीच संवर्धित करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
यापुढे कृषी क्षेत्राशी निगडीत विविध उपक्रमांवर भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री. खोतकर म्हणाले की, शेतीमालाची साठवणूक, कृषि प्रक्रिया उद्योग तसेच शेतकऱ्याला बाजारपेठेशी संलग्न करणे, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शेतीपूरक उद्योग तसेच वनउपजाद्वारेही रोजगार निर्मिती यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पशूधन आणि त्यातील वैविध्य हे शेतीसाठी पूरक अशा उद्योगासाठी मोठी संधी असणारे क्षेत्र आहे. त्यामुळे पशुसंगोपन हा जोडधंदा न राहता तो मुख्य व्यवसायही होऊ शकतो. त्यासाठी पशुपालकांना प्रयोगशीलतेसाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे धोरण राहील असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनीही हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतानाच त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. पोलीस निरीक्षक शामराव राठोड यांनी परेड कमांडर म्हणून संचलन केले. व्यंकटेश चौधरी, सुधीर रावळकर, स्नेहलता स्वामी यांनी समारंभाचे सुत्रसंचालन केले. या समारंभास नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000
जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 26.53 मि.मी. पाऊस   
           नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यात  शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 424.40 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 26.53 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 802.59 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी 17 सप्टेंबर पर्यंत सरासरी 427.13 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने) लोहा- 112.31, भोकर- 100.16, अर्धापुर- 99.12,   नांदेड- 98.60, हदगाव-93.81, कंधार- 88.67, माहूर- 85.75,  बिलोली- 82.93, हिमायतनगर- 82.64, मुखेड- 82.14, नायगाव- 77.00, धर्माबाद- 74.35, मुदखेड- 71.70, किनवट- 69.50, उमरी- 68.00, देगलूर- 64.17.  जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  83.99 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात शनिवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 37.88 (899.13), मुदखेड- 22.00 (612.02), अर्धापूर- 19.33 (861.99) , भोकर- 40.50 (998.00), उमरी- 64.67 (677.60), कंधार- 47.50 (712.81), लोहा- 66.17 (935.84), किनवट- 5.00 (861.74), माहूर- 10.25 (1063.25), हदगाव- 13.57 (916.83), हिमायतनगर- 30.33 (807.65), देगलूर- 8.67 (577.68), बिलोली- 10.00 (802.80), धर्माबाद- 30.67 (680.71), नायगाव- 14.00 (705.00), मुखेड- 3.86 (728.41) आज  अखेर  पावसाची सरासरी 802.59  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 12841.46) मिलीमीटर आहे. 

00000

Friday, September 16, 2016

आदिवासी विकास राज्यमंत्री
राजे अम्ब्रीशराव यांचा दौरा
 नांदेड दि. 16 :- राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव हे शनिवार 17 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी नागपूर येथून शासकीय हेलिकॅाप्टरने सकाळी 11 वाजता सुभाषनगर हबीब कॉलनी समोर दत्तनगर रोड किनवट हेलिपॅडवर आगमन व तेथून शासकीय विश्रामगृहाकडे शासकीय वाहनाने प्रयाण, आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशहा व रघुनाथशहा स्मृतिदिनानिमित्त “जनजाती चेतना परिषदेच्या” कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कलावती गार्डन माहूर रोड किनवट. सायंकाळी 4  वा. शासकीय हेलिकॉप्टरने सुभाषनगर हबीब कॉलनी समोर दत्तनगर रोड किनवट येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000
जप्त रेतीसाठ्याचा सोमवारी
नांदेड तहसिलमध्ये लिलाव
 नांदेड दि. 16 :- नांदेड तहलिस कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा सोमवार 19 सप्टेंबर रोजी जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार नांदेड यांनी कळविली आहे.
नांदेड तालुक्यातील मौ. भणगी, सोमेश्वर, वाघी, पिंपळगाव को., नाळेश्वर, नागापूर, सायाळ, गंगाबेट, रहीमपुर खु., तरोडा खु, ब्रम्हपुरी, पिंपळगाव निमजी, बोंढार तर्फे हवेली, कामठा बु. गाडेगाव, मार्कंड लगतच्या गावठाणामध्ये अंदाजे 17 हजार 136 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. त्या रेतीसाठ्याचा जाहीर लिलाव सोमवार 19 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय नांदेड येथे ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींनी सोमवारी वेळेवर तहसिल कार्यालय नांदेड येथे उपस्थित रहावे तसेच लिलावात सहभागी होण्यासाठीच्या पात्रता अटी, शर्ती आदी तपशीलासाठी नांदेड तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

00000
मतदार यादीत नोंदणी, दुरुस्तीसाठी रविवारी
मतदान केंद्रावर अर्ज स्विकारण्यात येणार
नांदेड, दि. 16 :-भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा कालावधी शुक्रवार 16 सप्‍टेंबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2016 असा आहे. तर रविवार 18 सप्‍टेंबर व 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विशेष मोहीम निश्‍चीत केली आहे. यादिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा सर्व मतदारांनी सुध्‍दा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
            विशेष मोहिमेच्‍या तारखा व्यतिरिक्त  16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर 2016 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे जोडूनच अर्ज करावेत. तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्थ व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या संक्षिप्‍त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोबर 2016 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात सध्‍या मतदार संख्‍या 23 लाख 84 हजार 666 इतकी असून त्‍यापैकी पुरुष 12 लाख 43 हजार 586, स्त्री- 11 लाख 41 हजार 26 व  इतर- 54 मतदार आहेत.  
येत्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका
निवडणुकीस हीच यादी वापरण्‍याची शक्‍यता
            सन 2017 मध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका प्रस्‍तावित आहेत. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. त्‍यामुळे येत्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकासाठी दि. 1.1.2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरली जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्‍याची खात्री करावी तसेच यादीत नावेही नोंदवावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केलेले आहे.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांना यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.

00000
अल्‍पसंख्‍याक विभागाच्या शाळा अनुदान योजनेत
प्रस्ताव सादर करण्‍यास 30 सप्टेंबर मुदत
नांदेड, दि. 16 – "जिल्‍हयातील धार्मीक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजनेसाठी इच्‍छुक शाळांकडून अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील. प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्‍यात येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्‍त प्रस्‍तावांची छाननी, त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्‍या पात्र प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यापासून ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 शासनास सादर करण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी इच्‍छूक शाळांकडून अर्ज मागविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्‍ताव सादर करण्‍याची यापुर्वी 8 ऑगस्ट व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पात्र प्रस्‍ताव सादर करावयाची 31 ऑगस्ट पर्यंत मुदत विहित करण्‍यात आली होती.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...