Monday, September 12, 2016

मतदार यादयांची विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण मोहीम
18 सप्टेंबर, 9 ऑक्टोंबर रोजी केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार  
नांदेड, दि. 12 :- भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर विधानसभा मतदार यादयाच्‍या विशेष पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचा कालावधी शुक्रवार 16 सप्‍टेंबर 2016 ते 14 ऑक्‍टोबर 2016 असा आहे. तर रविवार 18 सप्‍टेंबर व 9 ऑक्‍टोंबर 2016 रोजी विशेष मोहीम निश्‍चीत केली आहे. यादिवशी जिल्‍हयातील सर्व केंद्रावर बीएलओ उपस्थित राहून अर्ज स्‍वीकारतील. याचा सर्व मतदारांनी लाभ घ्‍यावा , असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केले आहे. दिनांक 1 जोनवारी 2017 रोजी ज्‍यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशा सर्व मतदारांनी सुध्‍दा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.
            विशेष मोहिमेच्‍या तारखा व्यतिरिक्त  16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोंबर 2016 या कालावधीत जिल्‍हयातील सर्व तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्र व संबंधीत बीएलओ यांचेकडे अर्ज करता येतील. मतदारांनी अर्ज करताना आवश्‍यक ते पुरावे जोडूनच अर्ज करावेत. तसेच कुटूंबातील व्‍यक्‍तींनीच अर्ज जमा करावेत. त्रयस्थ व्‍यक्‍तीमार्फत गठ्ठयांनी अर्ज स्‍वीकरले जाणार नाहीत याची नोंद घ्‍यावी.
भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनाकांवर विधानसभा मतदारसंघाच्‍या मतदान यादयांच्‍या संक्षिप्‍त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, नावात दुरुस्‍ती, आक्षेप नोंदविण्‍यासाठी 16 सप्‍टेंबर ते 14 ऑक्‍टोबर 2016 हा कालावधी आयोगाने निश्‍चीत केला आहे. जिल्‍हयात सध्‍या मतदार संख्‍या 23 लाख 84 हजार 666 इतकी असून त्‍यापैकी पुरुष 12 लाख 43 हजार 586, स्त्री- 11 लाख 41 हजार 26 व  इतर- 54 मतदार आहेत.  
येत्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका
निवडणुकीस हीच यादी वापरण्‍याची शक्‍यता
            सन 2017 मध्‍ये जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुका प्रस्‍तावित आहेत. जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. त्‍यामुळे येत्‍या जिल्‍हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकासाठी दि. 1.1.2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरली जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्‍याची खात्री करावी तसेच यादीत नावेही नोंदवावीत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी नांदेड यांनी केलेले आहे.
फोटो जमा करावेत
ज्‍या मतदारांचे यादीमध्‍ये फोटो नाहीत अशा मतदारांनी संबंधित बीएलओकडे फोटो जमा करावेत जेणे करुन त्‍यांना ओळखपत्र देण्‍यात येतील.
दुबार नावे वगळणे
मतदार यादीत एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नाव नोंदविणे बेकायदेशिर आहे. त्‍यामुळे ज्‍या मतदारांना यापुर्वी एकापेक्षा जास्‍त ठिकाणी नोंदविली असतील त्‍यांनी एका ठिकाणावरुन नांव वगळण्‍यासाठी नमुना 7 मध्‍ये अर्ज सादर करावेत.

00000
दारु दुकाने आज बंद 
नांदेड दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी मुस्लीम बांधवाच्यावतीने मोठया प्रमाणात ईद उल अझहा (बकरी ईद) साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी ईद उल अझहा (बकरी ईद)  निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, अन्य नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4 एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.    

00000000
आयटीआय शिकाऊ उमेदवारांसाठी
भरती मेळाव्याचे गुरुवारी आयोजन  
नांदेड दि. 12 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे मारोती सुझुकी इंडिया लि. गुरगाव हरियाणा या कंपनीकडून गुरुवार 15 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वा. सभागृहात आयटीआय शिकाऊ उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षेसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात जास्तीतजास्त उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. आर. बुजाडे यांनी केले आहे.
आयटीआय पास व जुलै 2016 मध्ये परीक्षा दिलेले प्रशिक्षणार्थी व्यवसाय इलेक्ट्रीशीयन, जोडारी, मशिनिस्ट, मेकॅ. मोटार व्हेकल, टीडीएम, फॉउन्डीमॅन, मोल्डर, पेंटर ज., शिटमेटल वर्कर, टर्नर, वेल्डर, डिझल मेकॅ. डॉसमन मेकॅ. टॅक्टर मेकॅनिक या व्यवसायातील मुलांनी उपस्थित रहावे. स्टायफंड 8 हजार 776 रुपये महिना देण्यात येणार आहे. तसेच बोनस 2 हजार 600 रुपये मिळणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींने कळविले आहे. सोबत दहावी, आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व ओळखपत्र आणावे लागतील.

00000
जिल्हाधिकारी कार्यालयात
      बुधवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार 13 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने लगतच्या दिवशी बुधवारी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे.
जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
जिल्हा परिषदेत बुधवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 12 - जिल्हा परिषदेअंतर्गत सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, शिक्षक तसेच आगामी 6 महिन्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षक, कर्मचारी यांचे निवृत्ती वेतन विषयक तक्रारी ऐकून घेणे, त्यावर कार्यवाही करण्यासाठी बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत जिल्हा परिषद कॉन्फरन्स हॉल सामान्य प्रशासन विभाग येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी या पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येते. मात्र दुसऱ्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे बुधवार 14 सप्टेंबर रोजी संबंधितांनी पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

0000000
अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अपंग शाळेसाठी पायाभूत सोयी सुविधा
अनुदान योजना प्रस्ताव सादर करण्‍यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 12 – "जिल्‍हयातील धार्मीक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा पुरविण्‍यासाठी अनुदान योजनेसाठी इच्‍छुक शाळांकडून अर्ज शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील. प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी शासन निर्णय व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्‍यात येणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग नांदेड यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्‍त प्रस्‍तावांची छाननी, त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्‍या पात्र प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यापासून ते शनिवार 15 ऑक्टोंबर 2016 शासनास सादर करण्यात येणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी इच्‍छूक शाळांकडून अर्ज मागविण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्‍ताव सादर करण्‍याची यापुर्वी 8 ऑगस्ट व जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पात्र प्रस्‍ताव सादर करावयाची 31 ऑगस्ट पर्यंत मुदत विहित करण्‍यात आली होती.

000000
जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी
“संवाद पर्व” उपक्रम स्त्यूत्य - राहूल राऊत
नांदेड, दि. 12 :- सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या विविध समाजोपयोगी व कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी “संवाद पर्व” हा उपक्रम निश्चित स्त्यूत्य आहे , असे प्रतिपादन नांदेडचे गटविकास अधिकारी राहूल राऊत यांनी गुंडेगाव येथे काल केले.
नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व श्री साई गणेश मंडळ गुंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संवाद पर्व” या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राऊत बोलत होते. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, भुजंगराव हंबर्डे, दत्तराम पाटील कुरे, विस्तार अधिकारी दिलीप बच्चेवार, कृषि विभागाचे वसंत जारीकोटे व एन. जी. तुप्तेवार, मुख्याध्यापक आनंद ढेपे, ग्रामसेवक सी. एन. पुंड, गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक हंबर्डे, बळवंत घोगरे, संतोष कुरे आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ कसा घ्यावा याची माहिती तळागाळातील जनतेला नसते. “संवाद पर्व”च्या उपक्रमातून प्रशासकीय अधिकारी व जनतेशी संवादातून ही माहिती दिली जात आहे. म्हणून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना “संवाद पर्व” उपक्रमाच्या माध्यमातून निश्चित साध्य होत आहे, असे सांगून श्री. राऊत यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, मागासवर्गीय कामगार आदींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्यासाठी पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणारे अर्थसहाय्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुंडेगावाचा सर्वांगिण विकास झाला आहे. हागणदारीमुक्त गाव, निर्मलग्राम, वृक्षलागवड, जलयुक्त, तंटामुक्ती सारखे विविध पुरस्कारही गावाने मिळवून आदर्श गाव म्हणून नावलौकीक मिळविलेला आहे. हे गावाच्या एकीच्या बळावर होवू शकले आहे, असे सांगून दासराव हंबर्डे यांनी “संवाद पर्व” या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळाली आहे ही समाधानाची बाब आहे.
जलयुक्त शिवार योजने विषयी माहिती देताना कृषि विभागाचे वसंत जारीकोटे यांनी गुंडेगावने केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे गावात जलक्रांती झाली आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषि सिंचन योजना, तुषार व ठिबक सिंचन योजना, फळबाग लागवड आदी कृषि विषयक योजनांची माहिती देवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी “संवाद पर्व” या उपक्रमामागील हेतू विशद केला. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर मुख्याध्यापक गुणाजी कपाळे यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                              

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...