Monday, September 12, 2016

जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी
संवाद पर्व उपक्रम स्त्यूत्य - राहूल राऊत
नांदेड, दि. 12 :- सर्वसामान्य जनतेपर्यंत राज्य शासनाच्या विविध समाजोपयोगी व कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम निश्चित स्त्यूत्य आहे , असे प्रतिपादन नांदेडचे गटविकास अधिकारी राहूल राऊत यांनी गुंडेगाव येथे काल केले.
नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथे जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व श्री साई गणेश मंडळ गुंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद पर्व या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राऊत बोलत होते. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, भुजंगराव हंबर्डे, दत्तराम पाटील कुरे, विस्तार अधिकारी दिलीप बच्चेवार, कृषि विभागाचे वसंत जारीकोटे व एन. जी. तुप्तेवार, मुख्याध्यापक आनंद ढेपे, ग्रामसेवक सी. एन. पुंड, गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक हंबर्डे, बळवंत घोगरे, संतोष कुरे आदी उपस्थित होते.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ कसा घ्यावा याची माहिती तळागाळातील जनतेला नसते. संवाद पर्वच्या उपक्रमातून प्रशासकीय अधिकारी व जनतेशी संवादातून ही माहिती दिली जात आहे. म्हणून शासन आपल्या दारी ही संकल्पना संवाद पर्व उपक्रमाच्या माध्यमातून निश्चित साध्य होत आहे, असे सांगून श्री. राऊत यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, मागासवर्गीय कामगार आदींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून त्यासाठी पंचायत समितीच्यावतीने देण्यात येणारे अर्थसहाय्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुंडेगावाचा सर्वांगिण विकास झाला आहे. हागणदारीमुक्त गाव, निर्मलग्राम, वृक्षलागवड, जलयुक्त, तंटामुक्ती सारखे विविध पुरस्कारही गावाने मिळवून आदर्श गाव म्हणून नावलौकीक मिळविलेला आहे. हे गावाच्या एकीच्या बळावर होवू शकले आहे, असे सांगून दासराव हंबर्डे यांनी संवाद पर्व या उपक्रमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळाली आहे ही समाधानाची बाब आहे.
जलयुक्त शिवार योजने विषयी माहिती देताना कृषि विभागाचे वसंत जारीकोटे यांनी गुंडेगावने केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे गावात जलक्रांती झाली आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषि सिंचन योजना, तुषार व ठिबक सिंचन योजना, फळबाग लागवड आदी कृषि विषयक योजनांची माहिती देवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी संवाद पर्व या उपक्रमामागील हेतू विशद केला. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर मुख्याध्यापक गुणाजी कपाळे यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                              

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...