Wednesday, April 2, 2025

 वृत्त क्रमांक 341

नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा 

शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन 

नांदेड दि.२ एप्रिल : विविध सामाजिक उपक्रम, व धार्मिक उत्सवासाठी नांदेड शहर हे नावाजलेले आहे. सोबतच गेल्या काही वर्षात अन्य ठिकाणी काही घटना घडल्या तरी नांदेड शहराने आपला सामाजिक सलोखा कायम ठेवला आहे .एप्रिल महिन्यातील सर्व सण उत्सवामध्ये पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांनी नांदेडचा नावलौकिक कायम ठेवावा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज येथे केले.

नांदेड येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे व विविध सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह महानगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच शांतता समितीचे सदस्य तसेच विविध आयोजन समितीचे मान्यवर उपस्थित होते.

प्रामुख्याने सण उत्सवाच्या काळात महानगरपालिकेकडून स्वच्छता,दिवाबत्ती या संदर्भात पूर्तता व्हावी, रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, पाणीपुरवठा वेळेत व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यावेळी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

00000





 


 


 





 

 वृत्त क्रमांक 340

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा मुदखेड तालुक्यात दौरा

पंचायत समितीसह बारड, नागेली व डोंगरगावला भेट 

नांदेड, दि. १ एप्रिल : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज मुदखेड तालुक्यातील बारड, नागेली व डोंगरगाव येथे दौरा करुन ग्रामस्‍थाशी संवाद साधला. बारड येथे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला सतेच घरकुल बांधकामाला गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर विहीर तसेच 4 लाख 20 हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाची पाहणी केली. सध्या जुन्या योजनेतून पाणीपुरवठा होत असून, नव्याने सुरू झालेल्या योजनेव्‍दारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचनाही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली त्यांनी दिल्या.

ग्रामस्तरावर ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी सेग्रीगेशन शेड उभारण्याचे तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे निर्देशही मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिल्‍या. गावात स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारडच्या सरपंच मंगलताई बुरडे, उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, उप कार्यकारी अभियंता वाडीकर, वेरूळकर, ग्राम पंचायत अधिकारी अनुप श्रीवास्तव, कंत्राटदार काझी, दिगंबर टिप्परसे, भगवान पुयड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलेवार उपस्थित होते.

पंचायत समितीला आकस्मिक भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी मुदखेड पंचायत समितीला अचानक भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामकाजाचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी एस. एच. बळदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000






Tuesday, April 1, 2025

 वृत्त क्रमांक 339

विष्णुपुरी प्रकल्पातून शेतकऱ्यांना नियोजनानुसारच पाणीपुरवठा 

 जलसंपदा विभागाकडून चुकीच्या वृत्ताचे खंडण 

नांदेड दि.१ एप्रिल : जलसंपदा विभागामार्फत रब्बीसाठी चार पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाण्याचे नियोजन कधीच घोषित करण्यात आले नाही. ही माहिती चुकीची असून 2024-25 साठी रबी हंगामाकरिता तीन पाणी पाळ्या देण्यात येणार आहे. कृपया शेतकऱ्यांनी त्यानुसार रब्बीचे नियोजन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने रब्बी हंगाम सुरू होतांना केले होते.

यासंदर्भात नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता सी.आर. बनसोड यांनी अधिकृत माहिती जारी केली आहे. काही वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात चुकीचे वृत्त प्रसारित झाल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सन 2024- 25 यावर्षीच्या धरण साठा व त्या अनुषंगाने सिंचन नियोजन याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी  कार्यालयात 11 नोव्हेंबर 2024 रोजी बैठक झाली. त्यामध्ये रब्बी हंगाम 2024 -25 करिता कालव्यावरील सिंचनासाठी तीन पाणी पाळ्या देण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

त्यानुसार प्रथम पाणी पाळी दोन डिसेंबर ते 25 जानेवारी या काळात देण्यात आले. तर 26 जानेवारी ते 14 मार्च या कालावधीत द्वितीय पाणी देण्यात आले. याबाबत लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधानी आहेत. रब्बी हंगाम २८ फेब्रुवारी ला समाप्त होत असला तरी उभ्या पिकांना गरजे नुसार १४ मार्च पर्यंत आवर्तन सुरू ठेवले होते. उन्हाळी हंगामा करिता कालव्याच्या सिंचनासाठी कोणत्याही पाणी पाळीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे हे निराधार वृत्त विनाकारण पसरविले जात आहे.

लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना या संदर्भातील कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही तक्रारी नाही.मात्र काही वृत्तपत्रांमध्ये रब्बी हंगामाकरिता चार पाणी पाळ्या, उन्हाळी हंगामा करिता तीन पाणी पाळयाचे नियोजन घोषित केल्याचे म्हटले आहे. ही बाब चुकीची असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.

जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील सिंचनासाठी देण्यात आलेल्या दोन आवर्तनास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

काही वृत्तपत्रांनी भुईमूग व उन्हाळी ज्वारीचा शेतकऱ्यांनी पेरा केला असून पिकांना आवश्यक ते पाणी मिळाले नाही. हाती येणारे पीक पाण्याअभावी वाळत आहे, असे नमूद केले आहे. परंतु जलसंपदा विभागातर्फे कालव्यावरील उन्हाळी हंगामातील कोणत्याही पिकांना पाणी देण्याबाबतचे नियोजन कधीच जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा जलसंपदा विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती ठेवावी. त्यानुसार आपल्या पिकांचे नियोजन करावे, कोणत्याही अफवांना बळी पडू नये, योग्य ती माहिती घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात आली आहे.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...