Wednesday, April 2, 2025

 वृत्त क्रमांक 341

नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा 

शांतता समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आवाहन 

नांदेड दि.२ एप्रिल : विविध सामाजिक उपक्रम, व धार्मिक उत्सवासाठी नांदेड शहर हे नावाजलेले आहे. सोबतच गेल्या काही वर्षात अन्य ठिकाणी काही घटना घडल्या तरी नांदेड शहराने आपला सामाजिक सलोखा कायम ठेवला आहे .एप्रिल महिन्यातील सर्व सण उत्सवामध्ये पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांनी नांदेडचा नावलौकिक कायम ठेवावा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आज येथे केले.

नांदेड येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, ईस्टर संडे व विविध सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह महानगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच शांतता समितीचे सदस्य तसेच विविध आयोजन समितीचे मान्यवर उपस्थित होते.

प्रामुख्याने सण उत्सवाच्या काळात महानगरपालिकेकडून स्वच्छता,दिवाबत्ती या संदर्भात पूर्तता व्हावी, रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, पाणीपुरवठा वेळेत व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यावेळी सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

00000





No comments:

Post a Comment

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार... अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे! https://notto.abd...