Thursday, January 2, 2025

 वृत्त क्रमांक 11 

‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत


नांदेड, दि. 3 जानेवारी :- ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सोमवार 6 ते शुक्रवार 24 जानेवारी 2025 पर्यंत मोबाईल व्हॅनमधून फिरते लोकअदालत जिल्ह्यातील निवडक गावापर्यंत पोहोचणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय नांदेड येथून सोमवार 6 जानेवारी रोजी मोबाईल व्हॅनच्या प्रवास कार्यक्रमास हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

 

त्यानंतर त्याच दिवशी लोहा तालुक्यातील मौजे सुनेगाव व पुढे 7 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील पेठवडज, 8 जानेवारी रोजी मुखेड तालुक्यातील पांडुरणी, 9 जानेवारी रोजी देगलूर तालुक्यातील करडखेड, 10 जानेवारी रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम, 13 जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील आटकळी, 14 जानेवारी रोजी धर्माबाद तालुक्यातील येवती, 15 जानेवारी रोजी उमरी तालुक्यातील सोमठाणा, 16 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातील बारड, 17 जानेवारी रोजी अर्धापूर भोगाव, 18 जानेवारी रोजी हदगाव तालुक्यातील तामसा, 20 जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील सारखनी, 21 जानेवारी रोजी किनवट तालुक्यातील इस्लापुर, 22 जानेवारी रोजी हिमायतनगर तालुक्यातील सरसम, 23 जानेवारी रोजी भोकर तालुकयातील मोघाळी येथे पोहोचणार आहे. तर नांदेड तालुक्यांतर्गत ग्रामपंचायत धनेगाव येथे 24 जानेवारी 2025 रोजी पोहोचणार आहे.

 

या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील वादपुर्व प्रकरणे, संबंधीत पोलीस स्टेशन हद्यीतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच गुन्हा कबुलीची प्रकरणे याठिकाणी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मो. युनुस अब्दुल करीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

वरील नमुद  दिवशी  प्रत्येक गावामध्ये सकाळी 11 वा. पासून फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून कायदेविषयक  शिबिरादरम्यान विविध कायद्यांचे मार्गदर्शन होणार आहे. यासंधीचा लाभ सर्व ग्रामस्थ, नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 10 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा दौरा


नांदेड, दि. 3 जानेवारी :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 4 जानेवारी रोजी परभणी शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने दुपारी 2 वा. विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.10 वा. नांदेड येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000 

 वृत्त क्रमांक 9 

माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत

 

सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका

 

यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध : आ.प्रताप पाटील चिखलीकर

 

बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील,

लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे,

आ. बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

 

नांदेड दि. 2 जानेवारी : राष्ट्रीय दुखवट्यामुळे लांबणीवर गेलेल्या माळेगाव यात्रेच्या शासकीय कार्यक्रमाला आज थाटात सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांचे नीटनेटके आयोजन करून यात्रेला आलेल्या लाखोंच्या समुदायाला खिळवून ठेवण्याचे कार्य आज नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायतीने पार पाडले.

 

प्रशासनामार्फत 5 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आजही हजारो पर्यटकांनी श्रद्धाळूंनी आणि यात्रेकरूंनी श्री. क्षेत्र खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी करमणुकीची साधने उपलब्ध आहेत. तसेच खरेदी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंपासून तर बाळ गोपाळांच्या खेळण्याच्या साहित्याची रेलचेल आहे. थंडीपासून बचाव करणारे बिछान्याचे साहित्य कपडे याची प्रचंड मोठी दुकाने यात्रेत आली असून पशूंचा बाजार लक्षवेधी आहे. शेकडो वर्षाच्या आयोजनाची परंपरा असलेल्या या यात्रेला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

5 जानेवारीला पशुस्पर्धांचा निकाल

आज पशुप्रदर्शन व स्पर्धेला तर कधी न बघितले असतील अशा पद्धतीच्या विविध प्रजातीचे अश्व, श्वान, वळू, कुक्कुट यांची देशातील विविध भागातून आलेली विविधता हजारोची नजर वेधून घेत होती. पशुप्रदर्शन व स्पर्धा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती. या पशुप्रदर्शनीचा निकाल ५ जानेवारीला वृत्तपत्रातून घोषित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यात्रेच्या सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, लातूर विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त डॉ नाना सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले,उदगीरचे पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नंदकुमार गायकवाड, नांदेडचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पडीले, यातिन पुजारी, हिंगोलीचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त एस. बी. खुणे, लातूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्रीधर शिंदे  यांची उपस्थिती होती.

 

कृषी प्रदर्शन थाटात

नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आयोजित प्रदर्शन व सत्कार समारंभाचे थाटात आयोजन करण्यात आले. फळे,भाजीपाला, मसाला प्रदर्शनातील दर्जेदार व जिल्ह्यातील शेतकऱ्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सत्कार सोहळा स्मरणीय ठरला आजच्या कार्यक्रमामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथील भगवानराव हंबर्डे, मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (म.) रामराव मगरे, अर्धापूर तालुक्यातील लहान येथील प्रभाकर हारकरी, भोकर तालुक्यातील रेणापूर येथील व्यंकट हामंद, हदगाव तालुक्यातील रुई (धा.) प्रकाश भालके, हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम येथील सुभाष राठोड, किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील ज्योतिबा गौणारकर, माहूर तालुक्यातील अंजनखेड येथील राजू बाळस्कर, उमरी तालुक्यातील पळसगाव येथील गणेश पवळे, धर्माबाद तालुक्यातील समराळा येथील अविनाश जैरमोड, बिलोली तालुक्यातील किनाळा येथील माधव भोसले, देगलूर तालुक्यातील भोकसखेडा येथील गोपाळ जाधव, मुखेड तालुक्यातील एकलारा येथील प्रभावती नरहरे, कंधार तालुक्यातील सुजानवाडी येथील कृष्णा भालेराव, लोहा तालुक्यातील पेनुर येथील बालाजी लोखंडे, नायगाव खै. तालुक्यातील वजिरगाव येथील माधवराव ढगे तर उत्तेजनार्थ अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील श्रीमती महानंदा कल्याणकर, हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील सचिन देवसरकर व कंजारा येथील ओम इंदेवार या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सीईओ संदीप माळोदे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सचिन कपाले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, राजकुमार मुक्कावार , समाज कल्याण अधिकारी सत्येंद आवूलवार,यात्रेच्या सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, कृषी विभागाचे विविध मान्यवर अधिकारी व माजी पदाधिकारी तसेच शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात्रेच्या निमित्याने जिल्हा परिषद प्रशासनामार्फत हा एक मोठा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

 

लावणी महोत्सवाला हजारोंची उपस्थिती

सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत नऊ संचांकडून सादर झालेल्या लावणी नृत्याने माळेगावात यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना वेड लावले.महोत्सवात संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाने सादरीकरण केले. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांनीही आपली दमदार उपस्थिती नोंदविली.

 

माळेगावसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

आजच्या सर्व शासकीय कार्यक्रमाचे उद्घाटन लोहाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. माळेगावच्या यात्रेची श्रीमंती वाढविण्यासाठी व परंपरा जोपासण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना प्रसंगी साकळे घालू असे आश्वासन यावेळी त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाला दिले. जिल्हा परिषदेचे सभापती असतानाच्या काळापासून या यात्रेच्या परंपरेची व इथल्या लोककलेची आपण जोडल्या गेलो आहोत त्यामुळे लागणारा खर्च व या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये बदल तसेच नव्याने काही आयोजन करण्याबाबत आपण जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तसेच सर्व लोकप्रतिनिधी मिळून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध असल्याचा त्यांनी तीनही कार्यक्रमात पुनरुच्चार केला.

 

लोकप्रतिनिधींची उपस्थिती

लावणी महोत्सवाला सायंकाळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ.हेमंत पाटील,लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे,आ. बाबूराव कदम कोहळीकर,माजी आ. गंगाधर पटणे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

3 जानेवारीला लोककला महोत्सव

3 जानेवारीला सकाळी 11 वाजता आरोग्य शिबिर होणार आहे. तर याच दिवशी जिल्हा परिषदेमार्फत पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल.   

4 जानेवारी रोजी सकाळी दुपारी १२वाजता शंकर पटाचे ( बैल जोडी,बैलगाडा शर्यत ) आयोजित करण्यात आली आहे. 

5 जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण समारोह होणार आहे. तर 5 जानेवारीला दुपारी बारा वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

00000




























Wednesday, January 1, 2025

 वृत्त क्रमांक 8

नांदेड जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ

नवीन वर्षाची सुरुवात वाचनाने

नांदेड दि. १ जानेवारी :- “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वाचन पंधरवाडयानिमित्त नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व वाचन सामूहिक कार्यक्रम
असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हयातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन,वाचन कौशल्य कार्यशाळा निवडलेल्या पुस्तकांचे सामुहिक वाचन लेखन व विद्यार्थी यांच्या मधील वाचन संवाद कार्यक्रम,पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राम मनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालय,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या अभ्यासिकेत सामुहिक वाचन करताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी, महापालिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनीही विद्यार्थ्यासोबत सामुहीक वाचन करुन “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची सुरुवात केली.

नांदेड जिल्ह्यात आज संभाजी सार्वजनिक वाचनालय,वाढवणा, भगवान श्रीकृष्ण वाचनालय,भोकर, हु.संतराम कांगठीकर वाचनालय,अर्जापूर,सचखंड गुरुव्दारा संचलित श्री हुजूर साहेब सार्वजनिक वाचनालय,नांदेड,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय,नगर परिषद कंधार, श्री समर्थ वाचनालय देगलूर,श्री संत नारायणगीरी महाराज सार्वजनिक वाचनालय वासरी, का.मातोश्री सुंदराबाई सार्वजनिक वाचनालय,बिलोली यांनी या उपक्रमात प्रामुख्याने सहभाग घेतला.
०००००





 वृत्त क्रमांक 7

​उद्योग राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांचा दौरा

 

नांदेड दि. 1 जानेवारी :  राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनिल नाईक हे गुरूवार 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वा. किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे माजी आमदार स्व. प्रदीप नाईक यांचेकडे सांत्वन भेट. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत राखीव. सकाळी​ 11.40 वा. माहूर, सारखणी मार्गे दहेली तांडा ता. किनवट येथून नाईक बंगला कार्ला रोड पुसद जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

0000 

  वृत्त क्रमांक 6

माळेगाव यात्रेत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार

                                                                                                                                                                         महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उदघाटन

 लावणी महोत्सव ठरणार आकर्षण ; लावणी महोत्सउवात नऊ संचाचे होणार सादरीकरण

                                                                                                                                                                     नांदेड दि. 1 जानेवारी :- श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार श्री खंडोबाच्या यात्रेत आज जिल्हा परिषदेच्यावतीने गुरुवार  2 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत कृषी प्रदर्शन, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन, कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, महिलांसाठी व बालकांसाठी स्पर्धा तसेच लावणी महोत्सव मुख्य आकर्षण ठरणार आहे.

                                                                                                                                                                     उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

                                                                                                                                                                  सकाळी 11 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धांचे उद्घाटन लातूर जिल्हयाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार श्रीजया चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

                                                                                                                                                                        कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव

                                                                                                                                                                       आज दुपारी 2 वाजता माळेगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हायाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार राजेश पवार व प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

                                                                                                                                                                 दुपारी तीन वाजता लावणी महोत्सव

                                                                                                                                                                   यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेला लावणी महोत्सव उद्या दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील व  खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार डॉ. तुषार राठोड व आमदार बालाजीराव कल्याणकर याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.    

चौकट

लावणी महोत्सवात नऊ संचाचे होणार सादरीकरण

लावणी महोत्सवात नऊ संचाचे सादरीकरण होणार असल्याने हा कार्यक्रम अतिशय आकर्षक ठरणार आहे. या संचांमध्ये प्रथितयश कलाकारांचा समावेश असून त्यामध्ये विविध ठिकाणांहून आलेले संच बहारदार लावण्यासह लोकसंगीत व नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. लावणी महोत्सवातील संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाचा समावेश आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांना देखील या महोत्सवात संधी मिळाली आहे. आज होणारा लावणी महोत्स व रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 5

जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन

महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी
मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबादच्या प्रागंणावर कार्यक्रमाचे आयोजन
#नांदेड दि. 1 जानेवारी :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटूंबासाठी मकर संक्राती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिध्द वस्तुंचे भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन 6 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यत करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद नांदेड याठिकाणी होणार असून या प्रदर्शनाबरोबर महाराष्ट्रातील विविध प्रसिध्द खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे. तरी या जिल्ह्यातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नांदेड यांनी केले आहे.
या सरस विक्री प्रदर्शनामध्ये महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या कुटूंबासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व राज्यातील व्हेज, नॉनव्हेज, साऊथ इंडियन व चायनीज प्रसिध्द खाद्य पदार्थाची मेजवाणी मिळणार आहे. यामध्ये नायगाव तालुक्याची घोंगडी, कंधारची बिबा गोंडबी व बिबा तेल, अर्धापूरची केळी चिप्स व हळद, माहूरचे बंजारा ड्रेस, नांदेडचा सोया पनीर, कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची शेंगदाना चटणी, बाजरीची कडक भाकरी, धर्माबादची लाल मिरची, लोह्याची बाजरीची खारोडी, हदगावचे व्हेज ऑम्लेट, अमरावतीची मांड्यावरची मडक्यावर केलेली पुरण-पोळी, बाजरीची भाकरी व बेसन आणि ठेचा, पुरुषांचे ड्रेस, साड्या, लहान लेकरांची खेळणी, शोभेच्या वस्तु, घर सजावटीच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, गंगाखेडची प्रसिध्द कलम, किनवटची धावंडा डिंक, चारोळी आणि मध, भोकरची आवळा कॅन्डी, सौदय प्रसाधने, बेन्टेक्स ज्वेलरी, नागपूरची संत्रा बर्फी, कोकणातील काजू व मँगो पल्प, रुचकर पापड, कुरडई, अहिल्यानगरचा चांदवडचा प्रसिध्द पेढा, विविध प्रकारचे लोणचे, गावरान झनझनीत मसाले, शेवया, नाचणीचे पदार्थ, सर्व प्रकारच्या जात्यावर केलेल्या डाळी , गावरान तूप, मुखेडचे सेंद्रीय लाकडी घाण्यावरचे करडई तेल, हस्तनिर्मित वस्तू, जयपुरी टोपी, नाशिकच्या मणुका, सावंतवाडीच्या लाकडी वस्तू, वाणाचे वस्तू, भांडी इत्यादी वस्तूंची विक्री होणार आहे.
तसेच या प्रदर्शनात दररोज संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणीचे आयोजन केले आहे. तरी नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांनी केले आहे.
00000

#सरसभव्यविक्रीप्रदर्शन






वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...