Monday, August 12, 2024








 



 

 वृत्त क्र. 706 

आजपासून तीन दिवस प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा !

 

घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

 

नांदेड दि. 12 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जनतेच्या मनात तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची जाज्ज्वल भावना कायमस्वरुपी त्यांच्या मनात राहावी, यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत 'हर घर तिरंगा' अर्थात घरोघरी अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना आणि प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्यासाठी 9 ऑगस्टपासून आयोजित उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हर घर तिरंगा अभियानात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी व्हावे. तसेच यंदा घरावर ध्वज फडकविण्याचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून आगळावेगळा आदर्श निर्माण घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा. राष्ट्रीय वेशभूषा करून सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ध्वजासोबत सेल्फी घेवून www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

***



 वृत्त क्र. 705 

खरीप मधील कापुस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप, पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रुपये 5 हजार (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे. 

सदरील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना देण्यात यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार ना हरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे. 

सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुना पत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून  शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेवपोर्टलवर माहिती भरली जाणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बऱ्हाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   

0000

 

 वृत्त क्र.  704 

शून्य ते सहा वयोगटातील बालकांची श्रवण दोष तपासणी शिबिर संपन्न

 

·  महसूल पंधरवडा निमित्त शिबिराचे आयोजन  

 

#नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  महसूल पंधरवडा-2024 निमित्त जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले. 50 बालकांची श्रवणदोष तपासणी या शिबिरात करण्यात आली.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा चिकित्सक डॉ.  संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलू, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक नितीन निर्मल आदींची  उपस्थिती होती.

 

हे शिबिर केवळ शीघ्र निदानापुरतेच मर्यादित न ठेवता येणाऱ्या काळात योग्य ते उपचार करण्यात यावे असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे 800 कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाली असल्याचे डॉक्टर संजय पेरके यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिघ्र निदान, उपचाराचे महत्त्व व गरज याविषयी सविस्तर अशी माहिती नितीन निर्मल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. तहसिलदार संजय वरकड यांनी या शिबिरास शुभेच्छा दिल्या तर मुरलीधर गोडबोले यांनी सूत्रसंचालनासह सर्वांचे आभार मानले.

00000







वृत्त क्र.  703

श्री चक्रधर स्वामी यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करून घेण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  सन 2024 मध्ये विहित केलेल्या जयंतीच्या परिपत्रकान्वये गुरुवार 5 सप्टेंबर 2024 रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन भाद्रपद शुल्क द्वितीया या तिथीनुसार त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे छायाचित्र संबंधित  जिल्हा शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सर्व शासकीय विभागांनी करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

00000

 वृत्त क्र.  702

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :-  कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जूलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी पुढील उपाययोजनाचा अवलंब करावा.

एकात्मिक व्यवस्थापन:

रसशोषक किडींचे व्यवस्थापन

· बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत पिकाला संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.

·   वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहीत नष्ट करावा.

· पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर २५पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टर लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.

·  कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे त्यामुळे चवळी पीकावर कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल.

·  वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडी, रानभेंडी इ. नष्ट करावी.

·  मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.

· रस शोषक किडीवर उपजीविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सिरफीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा इत्यादी परोपजीवी कीटकांची संख्या पूरेशी आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

·    रसशोषक किडींसाठी कपाशी पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे.

· सरासरी संख्या १० मावा/पान किंवा २ ते ३ तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीडे/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली., किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मि.ली., किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

·      पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा  किमान एक फूट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.

·   प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.

·  पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल •

·  पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिलीप्रति १० लीपाणी या प्रमाणे फवारणी.

· पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.

·      गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

·  प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा  सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

000000

 



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन 
हिंगोलीच्या कावड उत्सवासाठी रवाना

नांदेड, दि. 12 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी 4 वाजता  नांदेड, हिंगोली जिल्हाच्या दौ-यावर आगमन झाले. श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

#नांदेड विमानतळावर आ. बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे,अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित कावड यात्रेस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झालेत.

***




वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...