Friday, July 19, 2024

 विशेष लेख

 महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ.. 

        आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता ‘मार्वल’ कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे. 

            मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो. 

            कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी तयार केलेल्या संगणकामधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण म्हणता येईल. शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, समज आणि भाषेचे आकलन ही सर्व या संगणकीय क्षमतांची उदाहरणे म्हणता येतील. संगणक, संगणक-नियंत्रित रोबोट किंवा सॉफ्टवेअर बनवण्याची एक पद्धत आहे जी मानवी मन आणि बुद्ध‍िप्रमाणे विचार करते. मानवी मेंदूचा अभ्यास करून आणि माहितीचे विश्लेषण करून त्याचे परिणाम दर्शविते.

            वास्तववादी आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा, व्हिडीओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर भारतात होऊ लागला. त्यासोबतच गुगल एआय, चॅट-जीपीटी आदी माध्यमातूनही याचा वापर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे सिरी किंवा अलेक्सा ही नावे सुद्धा परिचित झाली आहेत. या मशीन्स सुद्धा मर्यादित स्वरुपात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा भाग म्हणता येतील. मानवाप्रमाणे विचार करण्याची कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची क्षमता सिद्ध होऊ लागली आहे. सध्या चॅटबॉट्सने जगात वादळ आणले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात डेटाचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. मोठमोठ्या कंपन्या दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आणि कामगारांना मदत करण्यासाठी याची मदत घेत आहेत. मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

            सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. यात गुन्ह्यांचे प्रकार आणि गुन्हेगारांची संख्या देखील मोठी असते. प्रत्येक बाबीत विविध प्रकारे मानवी मेंदूच्या क्षमतेचा वापर करून आणि उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करुन पोलीस दलाला या कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत मिळवून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  16 मार्च 2024 च्या बैठकीत घेतला आणि त्या अनुषंगाने तातडीने पावले उचलून ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली.

            कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या कंपनीस शासनामार्फत 4 कोटी 20 लाख रुपये प्रतीवर्ष याप्रमाणे पाच वर्षांकरिता 100 टक्के भागभांडवल देण्यात येणार असून भागभांडवलाचा पहिला हप्ता नुकताच वितरीत करण्यात आला आहे. 

            ‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर आणि मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. यांच्यात दि.22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार करण्यात येऊन शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासमोर पोलीस जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. 

            पोलीस दलाला कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून आणि मानवाप्रमाणे विचार करायला शिकवून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

            या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदल, गुप्तवार्ता विभाग, आंध्र प्रदेश, आयकर विभाग, सेबी आदी संस्थांना एआय सोल्युशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने ‘मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार ‘पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तर, भारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खाजगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असणार आहेत. तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.

            देशात नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची कार्यक्षमता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरामुळे आणखी वाढणार असून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची उकल तातडीने होण्यासाठी हातभार लागेल, यात शंका नाही. ‘मार्वल’ थेट शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणार आहे. त्यामुळे भविष्यात शासनाच्या इतर विभागांनाही कृत्रिम बुद्धीमत्तेचा लाभ मिळून महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश विविध क्षेत्रात जगभरात अग्रेसर राहील, हे निश्चित.

 -ब्रिजकिशोर झंवर

वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

00000




Thursday, July 18, 2024

 वृत्त क्र. 605 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे

अर्ज करण्यास 31 जुलै पर्यंत मुदतवाढ 

नांदेड,दि. 18 जुलै : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारचे परीपूर्ण प्रस्ताव इच्छुक संस्था व व्यक्ती यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड यांच्याकडे दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार व्यक्ती व संस्था यांचे सन 2023-24 या वर्षाकरिता दिनांक 31 मार्च 2024 पर्यत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु सदरच्या पुरस्काराचे इच्छुक व्यक्ती व संस्था यांच्याकडून कमी प्रस्ताव प्राप्त झाल्यामुळे सदर पुरस्काराच्या प्रस्तावासाठी दिनांक 31 जुलै पर्यत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.    

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दिनांक 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येते. 

या पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली दिनांक 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेली असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर संबंधित शासन निर्णय असून त्याचा संकेतांक क्रमांक. २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे.

00000

सुधारित वृत्त क्र. 604

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

आता बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी

 

'महास्वयंम' या पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

 

नांदेड,दि. 18 जुलै : राज्यातील असंख्य युवकांना आपले शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात वणवण फिरावे लागते. युवकांना विद्या वेतनासह आपण घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या 'महास्वयंम' या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. https://mahaswayam.gov.in या पोर्टलवर उमेदवारांना आणि उद्योग- व्यवसायांना, आस्थापनांना नोंदणी करता येणार आहे.

 

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दर महा अदा केले जाईल, असे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी नांदेड येथील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र पहिला मजला आनंद नगर रोड बाबा नगर नांदेड येथील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

000000

 वृत्त क्र. 603 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद

नांदेड शहरात 22 केंद्र तर गावांमध्ये शिबीर

 

शहर व जिल्हयामध्ये 1.30 लक्ष अर्ज दाखल

 

नांदेड दि. 18 जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व त्रुटीच्या अर्जाची वर्गवारी तसेच चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल   करणवाल,महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या शिबिरांचा आढावा घेतला. अर्जाचे वर्गीकरण आणि चावडी वाचन करून योग्य अर्जांची निवड करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.पिवळी व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या सर्व महिलांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज सुरू झालेल्या मदत केंद्राची माहिती मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिली. या ठिकाणी महानगरातील महिलांनी आपले अर्ज दाखल करावेत, अर्ज दाखल करून घेण्यासाठी या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून शहराच्या विविध भागात 22 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी ग्रामीण भागात सुरू असलेल्या शिबिरांची माहिती दिली. गावागावात अर्ज स्वीकारण्यात येत असून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत उत्तम काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अर्जाचे वर्गीकरण,चावडीवाचन, यावरही यावेळी चर्चा झाली.

 

जिल्हयामध्ये 1.30 लक्ष अर्ज दाखल

दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया युद्ध स्तरावर सुरू आहे. यामध्ये ऑफलाइन अर्ज अधिक येत असून शहरांमध्ये ही संख्या 40 हजारावर पोहोचली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 90 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑफलाइन आणि ऑनलाइन मिळून ही संख्या असून एकूण 1.30 लक्ष अर्ज दाखल झाले आहे. जिल्ह्यामध्ये पाच लाखावर अर्ज दाखल होण्याची अपेक्षा आहे.

00000



 


#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजना महिलांना आर्थिक हातभार लावणारी आहे. अर्ज दाखल केल्यानंतरची 'संसाराचा गाडा चालवायला मदत 'ही प्रतिक्रीया बोलकी आहे. जिल्हयात लाखावर अर्ज महिलांनी दाखल केले आहेत. #majhiladkibahinyojana

#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण नांदेड़ नगर निगम ने 22 केंद्र खोले हैं और आयुक्त ने महिलाओं से इन केंद्रों से आवेदन पत्र भरने में मदद लेने की अपील की है. #majhiladkibahinyojana

 

#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजना सर्वसामान्य महिलांच्या संसाराला हातभार लावणारी योजना असल्याची बोलकी प्रतिक्रिया महिलेने व्यक्त केली आहे.नांदेडमध्ये सध्या मनपा प्रशासनामार्फत 22 ठिकाणी अर्ज भरून घेतले जात आहे. #majhiladkibahinyojana



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...