Thursday, July 18, 2024

 वृत्त क्र. 603 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद

नांदेड शहरात 22 केंद्र तर गावांमध्ये शिबीर

 

शहर व जिल्हयामध्ये 1.30 लक्ष अर्ज दाखल

 

नांदेड दि. 18 जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व त्रुटीच्या अर्जाची वर्गवारी तसेच चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल   करणवाल,महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

 

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या शिबिरांचा आढावा घेतला. अर्जाचे वर्गीकरण आणि चावडी वाचन करून योग्य अर्जांची निवड करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.पिवळी व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या सर्व महिलांनी अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

यावेळी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज सुरू झालेल्या मदत केंद्राची माहिती मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिली. या ठिकाणी महानगरातील महिलांनी आपले अर्ज दाखल करावेत, अर्ज दाखल करून घेण्यासाठी या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून शहराच्या विविध भागात 22 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी ग्रामीण भागात सुरू असलेल्या शिबिरांची माहिती दिली. गावागावात अर्ज स्वीकारण्यात येत असून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यामार्फत उत्तम काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय अर्जाचे वर्गीकरण,चावडीवाचन, यावरही यावेळी चर्चा झाली.

 

जिल्हयामध्ये 1.30 लक्ष अर्ज दाखल

दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया युद्ध स्तरावर सुरू आहे. यामध्ये ऑफलाइन अर्ज अधिक येत असून शहरांमध्ये ही संख्या 40 हजारावर पोहोचली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 90 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑफलाइन आणि ऑनलाइन मिळून ही संख्या असून एकूण 1.30 लक्ष अर्ज दाखल झाले आहे. जिल्ह्यामध्ये पाच लाखावर अर्ज दाखल होण्याची अपेक्षा आहे.

00000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...