Monday, May 27, 2024

वृत्त क्र. 445

 कपाशीच्या वाणांची बियाणे जादा दराने विक्री

 केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 25:- आगामी खरीप हंगामासाठी शासनाने हायब्रीड कपाशी बीजी 2 वाणाचे दर जाहीर केले आहेत. प्रति पाकीट 864 रुपयाने विक्री करण्याचे निर्देश शासनाकडून मिळाले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून अधिक दराने कोणत्याही वाणाच्या कपाशी बियाण्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत केले आहे .

 

आगामी खरीप हंगामात कपाशीची लागवड सोयीचे होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. परंतु गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच चांगल्या पावसानंतर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यावर लागवड करावी . तसेच शेतकऱ्यांनी देखील विशिष्ठ वाणांचा आग्रह न धरता निविष्ठा जादा दराने खरेदी करू नये असे आवाहन कृषि विभागाकडुन करण्यात आले आहे. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही तालुक्यात ठोक विक्रेत्याकडे आणि त्यांचेमार्फत किरकोळ विक्रेत्याकडे सध्या कपाशी बियाणे पुरवठा होत आहे. आता शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रति पाकिट ८६४ रुपये दरापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्ष , तालुका स्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

खबरदारीचा उपाय म्हणून अधिक मागणी असलेल्या कपाशी वाणांची बियाणांची विक्री ही कृषी सहाय्यक यांचे निगराणीखाली होणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रावर कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी पुढील प्रमाणे कृषी विभागांचे अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत दूरध्वनी क्रमांक-9158417482, नांदेड तालुका कृषी अधिकारी मोकळे दूरध्वनी क्रमांक-9422140047, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी देवकांबळे  दूरध्वनी क्रमांक-9923135036, मुदखेड तालुका कृषी अधिकारी श्रीमती गच्चे दूरध्वनी क्रमांक-9403108216, तालुका कृषी अधिकारी लोहा पोटपल्लेवार दूरध्वनी क्रमांक-9527620807, कंधार तालुका कृषी अधिकारी गीते दूरध्वनी क्रमांक-9890450217 कपाशी बियाण्याची अधिक दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी वरील दिलेल्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि वाढीव दराने विक्री करीत असलेल्या कृषी सेवा केंद्रविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

0000

Friday, May 24, 2024

 वृत्त क्र. 444

जेईई JEE (Advanced) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 24 मे :- जेईई JEE (Advanced)-2024 परीक्षा रविवार 26 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत दोन सत्रामध्ये नांदेड जिल्ह्यात 4 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन विष्णुपुरी नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूर रोड विष्णुपुरी नांदेड,  राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युतनगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगावरोड समोर  नांदला दिग्रस खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात रविवार 26 मे 2024 रोजी  सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 443 

रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ 

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे  विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 

 

नांदेड दि. 24 मे :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सीजन, सर्जिकल साहित्य तसेच किट्स व केमिकल्सकरीता लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

रुग्णालयाची संवेदनशीलता लक्षात घेता रुग्णालय परीसरामध्ये पोलीस चौकी उभारण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.

 

नांदेड मनपाकडून रुग्णालयास नियमीतपणे पाणी पुरवठा करण्याबाबत, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यानी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रगतीपथावर असलेल्या बांधकामाचा आढावा घेवून बांधकामाची गती वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

 

आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रुग्णालय संकुलातील अपघात विभाग, आय.सी.यु/एस.आय.सी.यु, लेबर रुम अशा विविध विभागांचा राऊंड घेतला. त्यामध्ये  विविध विभागामधील कर्तव्यावरील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयामधील स्वच्छता, बाहयरुग्ण तसेच आंतरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येमध्येमधील वाढ, रुग्णालय परीसरातील डुकरांचा नायनाट, इतर देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

0000



 लेख : 

पशुधनाचे ईअर टॅगिंग 1 जूनपासून बंधनकारक

 

कोरोनाचा आजारानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबत पशुंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड च्या धरतीवर पशुंसाठी ईअर टॅगिंग केले जात आहे. सुदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी एक जून पासून प्रत्येक पशुचे इअर टॅंगींग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

 

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून तर ईअर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात येणार आहे. पशुंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत  याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व पशुपालकांना नियमीतपणे करण्यात येत आहे.

 

पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास ईयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात विक्रीसाठी  येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे.  दिनांक 1 जून 2024 पासून तर ईअर टँग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केले जाणार आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे. 

 

1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था,दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. राज्यातर्गंत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होवू शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावी. तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

 

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000








 वृत्त क्र. 442

इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड दि. 24 :- इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेचा निकाल जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 12 वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क सोमवार 27 मे 2024 ते शुक्रवार 7 जून 2024 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 8 जून 2024 ते बुधवार 12 जून 2024 असा आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, शुक्रवार 31 मे 2024 ते शनिवार 15 जून 2024, उच्च माध्य.शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार 18 जून 2024 अशी आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु-मार्च 2024 परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी-मार्च 2025 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

Wednesday, May 22, 2024

 वृत्त क्र. 441 

गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर

व धरणालगत गावांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 22 मे :- लेंडी प्रधान प्रकल्प मुखेड तालुक्यातील मौ. गोणेगाव अंतर्गत लेंडी प्रकल्प धरण परीसर व धरण लगत असलेली मौ. गोणेगाव, रावणगाव, मारजवाडी, हसनाळ, भाटापुर व इटग्याळ (प.दे) मुखेड तालुक्यातील या गावाच्या हद्दीमध्ये त्यासाठी लेंडी प्रधान प्रकल्पाची होत असलेली कामे, ये-जा करणारी यंत्रणा, साहित्य व अधिकारी-कर्मचारी यांना विरोध करणारी सर्व गतीविधीस, मोर्चे, धरणे, उपोषणे, आत्मदहन व त्या अनुषंगाने इतर जमाव करण्यास 23 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 21 जुलै 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधीतास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, आणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश 22 मे 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.

0000

वृत्त क्र. 438 दि. 21 मे 2024

 जिल्हयात टंचाई निवारण्याच्या आवश्यक सुविधा बहाल : जिल्हाधिकारी

·         टंचाईग्रस्त नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड दि. २१ : नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक गावांना पिण्याची पाणी टंचाई जाणवणार नाही. यासाठी आवश्यक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 ९८ नळ योजनांची दुरुस्ती

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून या वर्षी एकूण ९८ - नळ योजना विशेष दुरुस्‍तींच्‍या प्रस्‍तावांना, ३१ - तात्‍पुरती पूरक नळ योजनेच्‍या प्रस्‍तावांना व ५७३ - नविन विंधण विहीरींच्‍या प्रस्‍तावांना प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली असून त्‍यापैकी बहुतांश कामे पूर्ण होवून सदर गावामध्‍ये टंचाई कालावधीमध्‍ये पाण्‍याचा पुरवठा सुरु झालेला आहे.

टॅंकरचे प्रस्ताव निकाली

तसेच उर्वरित टंचाई निवारण योजनांची कामे युध्‍दपातळीवर पूर्ण करण्‍यात येत आहेत. टंचाई कालावधीमध्‍ये विहीर,बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरचे प्रस्‍ताव तातडीने निकाली काढून सदर गावामध्‍ये तात्‍काळ पाणी पुरवठा सुरु कर ण्यात आला आहे.

२१ खासगी टॅंकर मदतीला

विहीर व बोअर अधिग्रहण व टॅंकर मंजूर करण्‍याचे अधिकार नांदेड जिल्‍हयातील सर्व उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्‍यात आले आहेत. ग्रामीण भागातील २१ गावे,/वाडी,तांडयामध्‍ये २१ खाजगी टॅंकरव्‍दारे व २७५ खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. टॅंकरची संख्‍या साधारणपणे मुखेड तालुक्‍यात - १४, कंधार – ५ माहूर – १ व भोकर तालुक्‍यात १ टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच टॅंकर व विहीर,बोअर अधिग्रहणाचे प्रस्‍ताव कुठल्‍याही स्‍तरावर प्रलंबित राहणार नाहीत याबाबत सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व गट विकास अधिकारी यांना जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडून सक्‍त निर्देश देण्‍यात आले आहेत.

चारा मुबलक प्रमाणात

नांदेड जिल्‍हयामध्‍ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असून कुठल्‍याही प्रकारची चारा टंचाई नाही. टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी श्री. अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठका घेत आहेत.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.जिल्‍हयातील नागरिकांची पाणी टंचाईच्‍या अनुषंगाने कुठल्‍याही प्रकारची तक्रार असल्‍यास त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षामधील दुरध्‍वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. सदर दुरध्‍वनी क्रमांक हे २४x७ चालू राहतील.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...