Monday, May 27, 2024

वृत्त क्र. 445

 कपाशीच्या वाणांची बियाणे जादा दराने विक्री

 केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 25:- आगामी खरीप हंगामासाठी शासनाने हायब्रीड कपाशी बीजी वाणाचे दर जाहीर केले आहेत. प्रति पाकीट 864 रुपयाने विक्री करण्याचे निर्देश शासनाकडून मिळाले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून अधिक दराने कोणत्याही वाणाच्या कपाशी बियाण्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत केले आहे .

 

आगामी खरीप हंगामात कपाशीची लागवड सोयीचे होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. परंतु गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच चांगल्या पावसानंतर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यावर लागवड करावी . तसेच शेतकऱ्यांनी देखील विशिष्ठ वाणांचा आग्रह न धरता निविष्ठा जादा दराने खरेदी करू नये असे आवाहन कृषि विभागाकडुन करण्यात आले आहे. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही तालुक्यात ठोक विक्रेत्याकडे आणि त्यांचेमार्फत किरकोळ विक्रेत्याकडे सध्या कपाशी बियाणे पुरवठा होत आहे. आता शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रति पाकिट ८६४ रुपये दरापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्ष तालुका स्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

खबरदारीचा उपाय म्हणून अधिक मागणी असलेल्या कपाशी वाणांची बियाणांची विक्री ही कृषी सहाय्यक यांचे निगराणीखाली होणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रावर कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी पुढील प्रमाणे कृषी विभागांचे अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत दूरध्वनी क्रमांक-9158417482, नांदेड तालुका कृषी अधिकारी मोकळे दूरध्वनी क्रमांक-9422140047, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी देवकांबळे  दूरध्वनी क्रमांक-9923135036, मुदखेड तालुका कृषी अधिकारी श्रीमती गच्चे दूरध्वनी क्रमांक-9403108216, तालुका कृषी अधिकारी लोहा पोटपल्लेवार दूरध्वनी क्रमांक-9527620807, कंधार तालुका कृषी अधिकारी गीते दूरध्वनी क्रमांक-9890450217 कपाशी बियाण्याची अधिक दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी वरील दिलेल्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि वाढीव दराने विक्री करीत असलेल्या कृषी सेवा केंद्रविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...