Wednesday, May 22, 2024

वृत्त क्र. 438 दि. 21 मे 2024

 जिल्हयात टंचाई निवारण्याच्या आवश्यक सुविधा बहाल : जिल्हाधिकारी

·         टंचाईग्रस्त नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

नांदेड दि. २१ : नांदेड जिल्ह्यामध्ये टंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक गावांना पिण्याची पाणी टंचाई जाणवणार नाही. यासाठी आवश्यक सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 ९८ नळ योजनांची दुरुस्ती

नांदेड जिल्‍हयातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून या वर्षी एकूण ९८ - नळ योजना विशेष दुरुस्‍तींच्‍या प्रस्‍तावांना, ३१ - तात्‍पुरती पूरक नळ योजनेच्‍या प्रस्‍तावांना व ५७३ - नविन विंधण विहीरींच्‍या प्रस्‍तावांना प्रशासकीय मंजूरी देण्‍यात आली असून त्‍यापैकी बहुतांश कामे पूर्ण होवून सदर गावामध्‍ये टंचाई कालावधीमध्‍ये पाण्‍याचा पुरवठा सुरु झालेला आहे.

टॅंकरचे प्रस्ताव निकाली

तसेच उर्वरित टंचाई निवारण योजनांची कामे युध्‍दपातळीवर पूर्ण करण्‍यात येत आहेत. टंचाई कालावधीमध्‍ये विहीर,बोअर अधिग्रहण तसेच टॅंकरचे प्रस्‍ताव तातडीने निकाली काढून सदर गावामध्‍ये तात्‍काळ पाणी पुरवठा सुरु कर ण्यात आला आहे.

२१ खासगी टॅंकर मदतीला

विहीर व बोअर अधिग्रहण व टॅंकर मंजूर करण्‍याचे अधिकार नांदेड जिल्‍हयातील सर्व उप विभागीय अधिकारी यांना प्रदान करण्‍यात आले आहेत. ग्रामीण भागातील २१ गावे,/वाडी,तांडयामध्‍ये २१ खाजगी टॅंकरव्‍दारे व २७५ खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. टॅंकरची संख्‍या साधारणपणे मुखेड तालुक्‍यात - १४, कंधार – ५ माहूर – १ व भोकर तालुक्‍यात १ टॅंकरव्‍दारे पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे. तसेच टॅंकर व विहीर,बोअर अधिग्रहणाचे प्रस्‍ताव कुठल्‍याही स्‍तरावर प्रलंबित राहणार नाहीत याबाबत सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व गट विकास अधिकारी यांना जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडून सक्‍त निर्देश देण्‍यात आले आहेत.

चारा मुबलक प्रमाणात

नांदेड जिल्‍हयामध्‍ये जनावरांसाठी चारा मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असून कुठल्‍याही प्रकारची चारा टंचाई नाही. टंचाईग्रस्‍त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्‍हाधिकारी श्री. अभिजित राऊत हे तालुक्‍याच्‍या ठिकाणी आढावा बैठका घेत आहेत.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

तसेच तालुक्‍यातील टंचाईग्रस्‍त गावामध्‍ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्‍येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.जिल्‍हयातील नागरिकांची पाणी टंचाईच्‍या अनुषंगाने कुठल्‍याही प्रकारची तक्रार असल्‍यास त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षामधील दुरध्‍वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ व टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. सदर दुरध्‍वनी क्रमांक हे २४x७ चालू राहतील.

00000

वृत्त क्र. 440

                                                          बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

 

नांदेड दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर,  छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  

 

या परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970, 9011184242, 8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315,7387647902, 9011302997 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्र. 439

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छूक संस्थानी 31 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेद्वारे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे अशा संस्थानी आपले प्रस्ताव दोन प्रतीत 31 मे 2024 पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा कार्यालयात सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटूंबाची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून समाजातील गरजुंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्याटप्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. त्या संस्था आपले प्रस्ताव दाखल करु शकतील. तसेच 31 मे 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत यांची संबंधित संस्थानी नोंद घ्यावी, असेही आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने केले आहे.

प्रशिक्षणार्थी साठी नियम व अटी

अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदारास आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.

0000 

Monday, May 20, 2024

 वृत्त क्र. 437

21 मे रोजी एक दिवसाचा दुखवटा 

नांदेड दि. 20 मे : इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष महामहिम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री महामहिम हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले असून श्रद्धांजली म्हणून भारत सरकारने मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

 

या शोक दिनी राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकत असलेल्या सर्व इमारतींवर मंगळवार दिनांक 21 मे 2024 रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यात यावा आणि सदर दिवशी कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 436 

अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्क स्टेशनचे उद्घाटन

 

नांदेड दि. 20 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास 8 नविन अत्याधुनिक ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहे. या मशिनचे उद्घाटन व हस्तांतरण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक अनेस्थेशिया वर्क स्टेशन मशिनमुळे रुग्णांचे लॅप्रोस्कोपीक ऑपरेशन करणे सोईचे होईल.

 

या मशिनमध्ये Multipara Monitor, Ventilator, Boyle’s Machine (भुल देण्याकरीता लागणारे यंत्र) या सर्व सुविधा एकत्रितरित्या सामाविष्ट असल्यामुळे ते रुग्णांना येणाऱ्या अडचणी दुर होण्याकरीता व रुग्णसेवा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरीता उपयोगी पडणार आहे.  तसेच या मशिनमध्ये रक्तदाब, प्राण वायू, रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोजने, मेंदूचे सुक्ष्म निरीक्षण या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे रुग्णांच्या उपचाराकरीता तसेच पदविपूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये याचा उपयोग होणार आहे. रुग्णांच्या उपचारादरम्यान अत्याधुनिक शस्त्रक्रियेसाठी या मशिनचा उपयोग होईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांनी सांगितले. 

 

विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक सादर केले आणि या मशिनचे महत्व सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सचिन तोटावार, सहयोगी प्राध्यापक बधिरीकरणशास्त्र यांनी या मशिनमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करता येईल असे सांगितले.

 

या कार्यक्रमास उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण, डॉ. संजयकुमार मोरे, डॉ. चंडालिया, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, तसेच अध्यापक वर्ग निवासी डॉक्टर व परिचारीका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ. राजकुमार गीते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

0000




वृत्त क्र. 435

बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या मंगळवार 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

mahresult.nic.in,http://hscresult.mkcl.org,www.mahahsscboard.in,https://results.digilocker.gov.in, www.tv9marathi.com, http://results.targetpublications.org परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहितीचे प्रिंट आऊट घेता येईल. त्याचप्रमाणे डीजीलॉकर ॲपमध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालाबाबत अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत: च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://verification.mh-hsc.ac.in स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रत साठी बुधवार 22 मे 2024 ते बुधवार 5 जून 2024 पर्यत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग याद्वारे भरता येतील.

फेब्रुवारी-मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै-ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी- मार्च 2025 श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनपरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी सोमवार 27 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 434

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 20 :-नांदेड जिल्ह्यात 22 मे 2024 चे 6 सकाळी वाजेपासून ते 5 जून 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 22 मे 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 जून 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...