Wednesday, May 22, 2024

वृत्त क्र. 439

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छूक संस्थानी 31 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने प्रशिक्षण संस्थेची निवड केली जाणार आहे. निवडण्यात येणाऱ्या संस्थेद्वारे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजू तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे अशा संस्थानी आपले प्रस्ताव दोन प्रतीत 31 मे 2024 पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा कार्यालयात सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटूंबाची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत म्हणून समाजातील गरजुंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्याटप्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. त्या संस्था आपले प्रस्ताव दाखल करु शकतील. तसेच 31 मे 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत यांची संबंधित संस्थानी नोंद घ्यावी, असेही आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने केले आहे.

प्रशिक्षणार्थी साठी नियम व अटी

अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदारास आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागेल.

0000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...