Saturday, March 16, 2024

राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये

                                       - मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

 

आदर्श आचारसंहिता लागू

 

            मुंबई  दि. 16- :  लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके,  उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

            यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, 18 व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

          भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.

            पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मार्च, 2024 पासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26 एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 28 मार्च,2024 पासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल,2024 पासून सुरु होईल. चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 18 एप्रिल,2024 पासून सुरु होईल. पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे, 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे.  यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल, 2024 पासून सुरु होईल. मतमोजणी दिनांक 04 जून, 2024 रोजी होणार आहे.

30-अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक

             महाराष्ट्र विधानसभेच्या 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सुध्दा दुस-या टप्प्यात पोट निवडणुक घेण्यात येणार आहेत.  या पोट निवडणूकीचे मतदान दि.26 एप्रिल,2024रोजी होणार असून त्यासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.28 मार्च,2024 रोजी पासून सुरु होईल. 

आदर्श आचारसंहिता

        भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात  आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.  सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.

            आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल.  मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल.  लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे.  तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.

राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत.  त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्‍त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते. 

            सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्रे सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहे.  मात्र त्या साठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क संचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात सादर करावयाच्या आहेत. 

तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल/हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. 

मतदारांची संख्या

              सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.

तपशील

सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीचे मतदार

दि.23.01.2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील मतदार

दि.15.03.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या

1

पुरुष

4,63,15,251

4,74,72,379

4,78,50,789

2

महिला

4,22,46,878

4,37,66,808

4,41,74,722

3

तृतीयपंथी

2,406

5,492

5,559

 

एकूण

8,85,61,535

9,12,44,679

9,20,31,070

             

निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरु

निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.

मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत करण्यात आलेले प्रयत्न थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-

 

ü  मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची घरोघरी भेट

जुलै-ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेण्यात आली.

ü  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2024

ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.

ü  स्वीप

या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.

ü  दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे.  त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.  आजमितीस 5,99,166 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

ü  फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत झालेल्या मतदारांची वगळणी - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आलेले आहेत. 

ü  वरील सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत.  तसेच, पत्रकार परिषदा घेऊन इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे.  तसेच, राजकीय पक्षांच्या बैठकांचे इतिवृत्त जतन करण्यात आलेले आहेत. 

ü  दि.23.01.2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत :-

·       सन 2019 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्याप पर्यंत 34,69,535 इतकी वाढ झाली आहे.

·       सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन 2019 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 911 इतके होते.  याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 923 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

·       18-29 वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या  1,78,84,862 एवढ्या नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहेत.

·       याशिवाय 1,18,199 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

·       या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 5,99,166 इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत.   त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. 

·       अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13,15,166 इतकी आहे.  यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.  मतदार यादीतील अद्यावत आकडेवाडी नुसार त्यापैकी 52,908 मतदार 100 वर्षावरील आहेत.

 

मतदानाची टक्केवारी

            सन 2014 व सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

लोकसभा निवडणूक

पुरुष % मतदान

महिला % मतदान

एकूण मतदान

सन 2014

62.24

57.97

60.32

सन 2019

62.43

58.82

61.02

 

मतदान केंद्र :-

            सन 2019 च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये पुढील प्रमाणे वाढ झाली आहे.

तपशील

लोकसभा -2019

लोकसभा-2024

एकूण मतदान केंद्रे

95,473

97,325

 

                         भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे.  त्यामुळे प्रत्येक निवडणुकांच्या पूर्वी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येतात.  आजमितीस भारत निवडणूक आयोगाकडे 778 सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे.  आयोगाच्या मान्यतेनंतर ही अतिरिक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील.  त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 98,100 वर जाण्याची शक्यता आहे.

आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities), प्रसाधन सुविधा, इ. पुरविण्यात येणार आहेत.  त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. 

शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये एकूण 150 मतदान केंद्रे अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये उभारण्यात आलेली आहेत.

निवडणुकीसाठी कर्मचारीवृंद

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6.00 लाख इतका कर्मचारीवृंद नेमण्यात येणार आहे. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण

            राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हिडीओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणा-या मतदान अधिकारी / कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. 

ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM-VVPAT)

            राज्यामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM-VVPAT) चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2.47 लाख बॅलेट युनिट (Bus), एकूण 1.45 लाख कन्ट्रोल युनिट(CUs) आणि एकूण 1.53 लाख व्हीव्हीपॅट (VVPATs) यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि.29.12.2023 ते दि.29.02.2024 या कालावधीत राबविण्यात आला.  सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली.  या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला आहे. 

महत्वाचे आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications)

            यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काही आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications) विकसित केले आहेत. ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.

·     सी व्हीजिल (cVigil)

    आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

·     सक्षम ॲप

पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लिकेशन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

·         केवायसी Know Your Candidate App

मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.

·         ईएसएमएस ॲप ESMS App/Portal.

निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे.

1950 क्रमांकाची हेल्पलाईन

        राज्यस्तरावर (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर  (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरु करण्यात येईल.

मतदानाची सज्जता

            प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

 

**********






 वृत्त क्र. 248 

नांदेडमध्ये सोमवारी कव्वाली महोत्सव

 

नांदेड दि. 16 : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महासंस्कृती, महानाट्य महोत्सवापाठोपाठ नांदेडमध्ये सोमवारी 18 मार्च रोजी कव्वाली महोत्सव होत आहे. राज्यभरातील विख्यात कव्वाली गायक यामध्ये सहभागी होत असून कव्वाली प्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हा कार्यक्रम कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड येथे होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता कव्वाली महोत्सवाला शुभारंभ होणार आहे. नांदेड व परिसरातील कव्वाली प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000

 वृत्त क्र. 247

 

समाज घडविण्यात ग्रंथालयाची भूमिका महत्वाची

: ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम

 

·         ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवास प्रारंभ

·         रविवारी ग्रंथदालनाला भेट देण्याचे आवाहन

·         विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेड दि. 16 :- समाज घडविण्यात सार्वजनिक ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असून ग्रंथालये ही समाजाच्या मेंदूचे काम करतात. ज्या देशात उत्तम ग्रंथालये आहेत, त्या देशाचा विकास कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी केले. जिल्हा ग्रंथालयात आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

आज ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य अशा ग्रंथदिंडीने ग्रंथाची पालखी घेऊन करण्यात आली. सकाळी 8.30 वाजता ग्रंथ दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या ग्रंथ दिंडीमध्ये भजनी मंडळे तसेच अनेक शाळेतील लेझीम पथक सहभागी झाले होते. ही ग्रंथ दिंडी जिल्हा ग्रंथालय कार्यालयासमोर आल्यानंतर विविध ग्रंथ स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करुन या ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या ग्रंथोत्सवात 24 पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

 

संतांचे साहित्य ही आपल्यासाठी मोठी शिदोरी असून सदाचाराची शिकवण देणारे संत हेच साहित्यिकांचे पुढारी आहेत. शतकानुशतके हे पुढारी समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. त्यांचे ग्रंथ आजही लोक वाचतात. सयाजीराव गायकवाड महाराज, राजर्षी शाहू यांनी गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथ सहवासातून जगभर लौकिक केला. यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या साहित्य प्रेमीनी भाषा आणि साहित्याचे स्वतंत्र दालन निर्माण केले. आज ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ग्रंथालय चळवळ समृध्द होईल यात शंकाच नाही, असे उद्गगार ज्येष्ठ साहित्यिक तथा 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी नांदेड ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन करताना काढले.

 

वाचन संस्कृतीला बळ मिळावे व त्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती व्हावी तसेच लेखक, प्रकाशक व वाचक एका छताखाली यावेत व ग्रंथालय चळवळ परिपक्व व्हावी म्हणून ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते असे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. नांदेडची ग्रंथालय चळवळ समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात सार्वजनिक ग्रंथालयांची संख्या जास्त असूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकही प्रस्ताव दाखल झाला नाही याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करताना सर्वांच्या सहकार्याने नांदेड जिल्हा हा ग्रंथालय चळवळीत अग्रेसर ठेवू असे आश्वासन दिले.

 

जगात उत्क्रांती व क्रांती केवळ पुस्तकेच करू शकतात - गोविंद नांदेडे

जगामध्ये उत्क्रांती व क्रांती केवळ पुस्तकेच घडू शकतात म्हणून ग्रंथालयाने दर्जेदार पुस्तके वाचकांच्या हाती द्यावेत असे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड यांनी नांदेड ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी केले. जगात सर्वात प्रिय व्यवहार म्हणजे ज्ञान देणे हा होय आणि पुस्तके हीच खरी ज्ञान देणारी साधने आहेत. म्हणून ग्रंथचालकांनी वाचकाच्या हातात दर्जेदार ग्रंथ दिले पाहिजेत. देशात वाचन संस्कृती वाढली तर समाजात हिंसा होणार नाही. यातून सुसंस्कृत व संयमी समाजाची निर्मिती होवून आदर्श व उन्नत राष्ट्र उभे राहू शकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ ही सशक्त झाली पाहिजे. जिल्ह्यातील लेखक, कवींची पुस्तके आपल्या ग्रंथालयात वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजे अशी अपेक्षा ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी व्यक्त केली. ग्रंथोत्सवातून मोठ्या प्रमाणात दर्जेदार ग्रंथाची ग्रंथ खरेदी व्हावी व गावागावातील वाचनालय समृद्ध व्हावेत. वाचन संस्कृती तळागाळापर्यंत पोहचावी यासाठी ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या ग्रंथोत्सवात विविध पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात अत्यंत दर्जेदार पुस्तके ठेवण्यात आली आहे तेंव्हा सर्वांनी मोठ्या प्रमाणात या पुस्तकाची खरेदी करावी. रविवार 17 मार्च 2024 रोजी ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस असून ग्रंथप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

000000








 वृत्त क्र. 246

 

नांदेडमध्ये 26 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान

लातूरमध्ये 7 मे तर हिंगोलीतही 26 एप्रिलला मतदान

 

जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू ; भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

 

28 मार्चला अधिसूचना ; 4 एप्रिल उमेदवारीसाठी अंतिम तारीख

4 जून रोजी मतमोजणी ; 40 मतदान केंद्र संवेदनशील

 

नांदेड दि. 16 : नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली असून निवडणूक घोषित झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी, निवडणुकीशी संबंधित राजकीय पक्ष,उमेदवार, माध्यमे व अनुषंगिक सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

 

देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिल. तर जिल्ह्याच्या संलग्न असणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे देशभरातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

 

 जिल्हयात 26.93 लक्ष मतदार 

नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९३ हजार ७१५ आहे. एकूण ३०४१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील १८.४३ लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात २०६२ मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ९ लक्ष ५० हजार ९७६ पुरुष, तर ८ लक्ष ९२ हजार १२९ महिला व १३९ तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये २५ हजार १४ मतदार हे ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

 

तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील ०५.५७ लक्ष मतदार६४९ केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील ०२.९२ लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

 

प्रशासन सज्ज ; तरूणाईला साद 

लोकसभेसाठी सर्व समित्यांचे गठन करण्यात आले असून आजपासून या सर्व समित्या आपापल्या कक्षाचे काम करणार आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मतदान करताना निवडणूक ओळखपत्र नसले तरी 16 प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अन्य शासनमान्य अधिकृत ओळखपत्र दाखवून मताधिकार बजावता येणार असल्याचे स्पष्ट केले असून जिल्ह्यातल्या तरुण मतदारांनी तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनी स्वतःसोबत घरातील सर्व मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील यासाठी पुढाकार घ्यावा. लोकशाहीने मतदान प्रक्रियेमध्ये आपला अनुकूल मताधिकार व तटस्थता नोंदण्याची व्यवस्था ईव्हीएम मशीनद्वारे केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

ईव्हीएम अफवांवर विश्वास ठेऊ नका

ईव्हीएम संदर्भातील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करताना त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला तसेच सामान्य जनतेला ईव्हीएममध्ये कशा पद्धतीने पारदर्शी मतदान होते याची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यामध्ये ईव्हीएमच्या पारदर्शितेबाबत स्पष्ट केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या दीड महिन्यात शेकडो सामान्य मतदारांनी इव्हीएमच्या पारदर्शी कार्यपद्धतीची माहिती घेतली आहे. त्यामुळे आता आचारसंहिता लागली असून याबाबत कोणीही अफवा पसरू नये,असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.

 

सोशल मिडियावर करडी नजर

जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता प्रसारमाध्यमांनी अतिशय जबाबदारीने वृत्तांकन करण्यासोबतच समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या नवतरुणांनी अधिक काळजी घेण्याचा इशारा त्यांनी दिला. सायबर सेल, आदर्श आचारसंहिता कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षामार्फत समाज माध्यम हाताळणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असून या काळात सामाजिक सौहार्द, समाजामध्ये तेढ निर्माण होणाऱ्या धार्मिक पोस्ट, राजकीय पोस्ट टाकल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या नियमित अकाउंट वर कोणतीही राजकीय पोस्ट असेल तर ती काढून घेण्याची सूचना त्यांनी केली.आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीने कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास गंभीर गुन्हे व कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

तातडीने बॅनर हटवा

शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे व खाजगी मालमत्ता तसेच कार्यालयामध्ये या कालावधीत असणारे योजनांचे राजकीय पक्षांचे कोणतेही बॅनर पोस्टर अनुक्रमे पुढील 24, 48 व 72 तासात काढून घेण्याचे निर्देशही आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व शासकीय यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे तसेच या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षालय

या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत राहावे राहू नये यासाठी त्यांच्यासाठी प्रतिक्षालय निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. आवश्यक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त मंडप टाकण्यात येईल, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सर्व इतर अपेक्षित सुविधांची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

गंभीर कारवाई करू : पोलीस अधीक्षक

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता पाडणे व कायदा सुव्यवस्था राखणे यासाठी पोलीस दल सज्ज आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर यापूर्वीही सक्त कारवाई करण्यात आली असून गेल्या निवडणुकीत २६ गुन्हे याबाबत दाखल झाले होते. त्यापैकी दोन गुन्हेगारांना तुरूंगवास झाला आहे. यावेळी ९५ फ्लाईंग स्कॉड तसेच ड्रोणद्वारे सुद्धा निगराणी ठेवण्यात येईल. जिल्हाधिकारी व आपण स्वतः जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी केली असून निवडणूक आयोगाने अतिशय सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले असून कुणीही आचारसंहिता भंग होईल अशा कारवाईत पडू नये अशी सूचना ही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात 95 स्थितिक पथके व 97 भरारी पथके स्थापित असून मतदारांना कोणीही प्रलोभन देऊ नये याबाबत ही पथके दक्षता बाळगतील.

      

 यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा उप निवडणूक अधिकारी राजकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

असा आहे कार्यक्रम

निवडणुकीची घोषणा :16 मार्च

निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल

छाननी : 5 एप्रिल

अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल

मतदान :26 एप्रिल

मतमोजणी :4 जून


कधी आहे मतदान

नांदेड : २६ एप्रिल

हिंगोली : २६ एप्रिल

लातूर : 7 मे

00000











Friday, March 15, 2024

 वृत्त क्र. 245  

आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

माध्यमांसंदर्भातील एमसीएमसी समितीची बैठक

 

नांदेड दि. 15 :- लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. माध्यमांनी विशेषतः समाज माध्यमांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. आचारसंहिता लागताच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रसिद्धी साहित्याला संबंधित यंत्रणांनी काढून टाकावे, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

सोशल माध्यमांवर काम करणाऱ्या तरुणांनी आपल्या एखाद्या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग होऊन गंभीर कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याचा विचार करावा. तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व माध्यम प्रतिनिधींनी, सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामध्ये व्यक्त व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची जिल्हा दरसूची निश्चितीबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, माध्यम समिती व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य उपविभागीय अधिकारी विकास माने, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, गंगाप्रसाद दळवी, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे, ज्येष्ठ पत्रकार राजेश निस्ताने, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, तसेच माध्यम समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.  

 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आचार संहितेच्या काळात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज याबाबत सादरीकरण केले. तसेच या समितीमार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजाची विस्तृत माहिती सांगितली.

0000










 वृत्त क्र. 244  

जिल्हा स्विप कक्षाच्यावतीने १६ तालुक्याचा आढावा

नांदेड दि. 15 : - नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुक्यामध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी सक्रियतेने हा उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, पण मतदानाची टक्केवारी त्या अनुषंगाने कमी होत आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त टक्केवारीने मतदान करणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध व्हावा, या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा स्विप कक्षाची स्थापना केली आहे. या स्वीप कक्षाच्या वतीने विविध तालुक्यात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी विविध स्पर्धा, जनजागृती करीत आहेत.

आजपर्यंत सोळा तालुक्यातील स्विप कक्षाने कोणकोणते कार्यक्रम घेतले, काय नियोजन केले याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा स्विप कक्ष प्रमुख डॉ. पंजाबराव खानसोळे व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पाचंगे यांनी जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. अत्यंत काटेकोरपणे सर्व तालुक्यातील नियोजन करण्यात आले. या बैठकीच्या माध्यमातून विविध तालुक्यातील स्विप कक्षास भरीव मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस 16 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व कर्मचारी असे एकूण 53 अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. तर आभार राजेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मुदिराज, साईनाथ लबडे, आनंदी वैदय, साईनाथ चिद्रावार व संजय ढवळे यांनी परिश्रम घेतले.

00000






वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...