Saturday, March 16, 2024

 वृत्त क्र. 246

 

नांदेडमध्ये 26 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान

लातूरमध्ये 7 मे तर हिंगोलीतही 26 एप्रिलला मतदान

 

जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू ; भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

 

28 मार्चला अधिसूचना ; 4 एप्रिल उमेदवारीसाठी अंतिम तारीख

4 जून रोजी मतमोजणी ; 40 मतदान केंद्र संवेदनशील

 

नांदेड दि. 16 : नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली असून निवडणूक घोषित झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी, निवडणुकीशी संबंधित राजकीय पक्ष,उमेदवार, माध्यमे व अनुषंगिक सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

 

देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज भारतीय निवडणूक आयोगाने घोषित केल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिल. तर जिल्ह्याच्या संलग्न असणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे देशभरातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

 

 जिल्हयात 26.93 लक्ष मतदार 

नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण मतदारांची संख्या २६ लाख ९३ हजार ७१५ आहे. एकूण ३०४१ मतदान केंद्र यासाठी सज्ज झाले आहे. त्यापैकी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड, या सहा विधानसभा क्षेत्रातील १८.४३ लक्ष मतदार नांदेड लोकसभा मतदारसंघात २०६२ मतदान केंद्रावरून मतदान करणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ९ लक्ष ५० हजार ९७६ पुरुष, तर ८ लक्ष ९२ हजार १२९ महिला व १३९ तृतीय पंथी आपला मताधिकार बजावणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये २५ हजार १४ मतदार हे ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना बॅलेट पेपरने मतदान करता येणार आहे. प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

 

तर जिल्ह्यातील किनवट व हदगाव विधानसभा क्षेत्रातील ०५.५७ लक्ष मतदार६४९ केंद्रावरून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत. याशिवाय लोहा विधानसभा क्षेत्रातील ०२.९२ लक्ष मतदार ३३० मतदार केंद्रावरून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

 

प्रशासन सज्ज ; तरूणाईला साद 

लोकसभेसाठी सर्व समित्यांचे गठन करण्यात आले असून आजपासून या सर्व समित्या आपापल्या कक्षाचे काम करणार आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मतदान करताना निवडणूक ओळखपत्र नसले तरी 16 प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अन्य शासनमान्य अधिकृत ओळखपत्र दाखवून मताधिकार बजावता येणार असल्याचे स्पष्ट केले असून जिल्ह्यातल्या तरुण मतदारांनी तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनी स्वतःसोबत घरातील सर्व मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील यासाठी पुढाकार घ्यावा. लोकशाहीने मतदान प्रक्रियेमध्ये आपला अनुकूल मताधिकार व तटस्थता नोंदण्याची व्यवस्था ईव्हीएम मशीनद्वारे केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

ईव्हीएम अफवांवर विश्वास ठेऊ नका

ईव्हीएम संदर्भातील अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट करताना त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला तसेच सामान्य जनतेला ईव्हीएममध्ये कशा पद्धतीने पारदर्शी मतदान होते याची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निवाड्यामध्ये ईव्हीएमच्या पारदर्शितेबाबत स्पष्ट केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या दीड महिन्यात शेकडो सामान्य मतदारांनी इव्हीएमच्या पारदर्शी कार्यपद्धतीची माहिती घेतली आहे. त्यामुळे आता आचारसंहिता लागली असून याबाबत कोणीही अफवा पसरू नये,असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.

 

सोशल मिडियावर करडी नजर

जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता प्रसारमाध्यमांनी अतिशय जबाबदारीने वृत्तांकन करण्यासोबतच समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या नवतरुणांनी अधिक काळजी घेण्याचा इशारा त्यांनी दिला. सायबर सेल, आदर्श आचारसंहिता कक्ष तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षामार्फत समाज माध्यम हाताळणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असून या काळात सामाजिक सौहार्द, समाजामध्ये तेढ निर्माण होणाऱ्या धार्मिक पोस्ट, राजकीय पोस्ट टाकल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या नियमित अकाउंट वर कोणतीही राजकीय पोस्ट असेल तर ती काढून घेण्याची सूचना त्यांनी केली.आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीने कोणत्याही नियमाचा भंग झाल्यास गंभीर गुन्हे व कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

तातडीने बॅनर हटवा

शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे व खाजगी मालमत्ता तसेच कार्यालयामध्ये या कालावधीत असणारे योजनांचे राजकीय पक्षांचे कोणतेही बॅनर पोस्टर अनुक्रमे पुढील 24, 48 व 72 तासात काढून घेण्याचे निर्देशही आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सर्व शासकीय यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे तसेच या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रत्येक केंद्रावर प्रतिक्षालय

या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत राहावे राहू नये यासाठी त्यांच्यासाठी प्रतिक्षालय निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. आवश्यक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त मंडप टाकण्यात येईल, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सर्व इतर अपेक्षित सुविधांची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

गंभीर कारवाई करू : पोलीस अधीक्षक

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी जिल्ह्यातील आदर्श आचारसंहिता पाडणे व कायदा सुव्यवस्था राखणे यासाठी पोलीस दल सज्ज आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर यापूर्वीही सक्त कारवाई करण्यात आली असून गेल्या निवडणुकीत २६ गुन्हे याबाबत दाखल झाले होते. त्यापैकी दोन गुन्हेगारांना तुरूंगवास झाला आहे. यावेळी ९५ फ्लाईंग स्कॉड तसेच ड्रोणद्वारे सुद्धा निगराणी ठेवण्यात येईल. जिल्हाधिकारी व आपण स्वतः जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी केली असून निवडणूक आयोगाने अतिशय सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले असून कुणीही आचारसंहिता भंग होईल अशा कारवाईत पडू नये अशी सूचना ही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात 95 स्थितिक पथके व 97 भरारी पथके स्थापित असून मतदारांना कोणीही प्रलोभन देऊ नये याबाबत ही पथके दक्षता बाळगतील.

      

 यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा उप निवडणूक अधिकारी राजकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

असा आहे कार्यक्रम

निवडणुकीची घोषणा :16 मार्च

निवडणुकीची अधिसूचना : 28 मार्च नामनिर्देशनाची अंतिम तारीख : 4 एप्रिल

छाननी : 5 एप्रिल

अर्ज मागे घेण्याची तारीख : 8 एप्रिल

मतदान :26 एप्रिल

मतमोजणी :4 जून


कधी आहे मतदान

नांदेड : २६ एप्रिल

हिंगोली : २६ एप्रिल

लातूर : 7 मे

00000











No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...