Thursday, March 7, 2024

 वृत्त क्र. 212

उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7 :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात व नांदेड जिल्ह्यात घडत आहेत. भगरीवर मोठ्या प्रमाणात अस्परजिलस प्रजातीच्या बूरशीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखी विषद्रव्ये तयार होतात.  तापमान आणि आर्द्रता बूरशीच्या वाढीसाठी अनूकूल असते. अशी बूरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उपवासाला भगर खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

भगर खाताना काय काळजी घ्यावी 

बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा. शक्यतोवर पाकीटबंद भगर घ्या. ब्रँड नाव नसलेली  किंवा लेबल नसलेली भगर पाकीटे व सूटी भगर घेऊ नका. भगर घेतांना पाकीटावरचा पॅकींग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा. भगर साठवताना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकणबंद डब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बूरशीची वाढ होणार नाही.जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका. शक्यतोवर भगरीचे पीठ विकत आणू नका. भगरीच्या पिठामध्ये वातावरणातील ओलावा शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामूळे पिठाला बूरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी  खिचडी खावी. भगरीचे पीठ आवश्यक असेल तेवढेच दळून घ्या. जास्त दिवस पीठ साठवू नका. बाहेरुन दळून आणण्यापेक्षा घरीच  दळा. भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. दोन ते तिन दिवस सलग उपवास असताना या पदार्थांचे सेवन ॲसिडीटी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उलटी, मळमळ व पोटाचे त्रास होतात. या पदार्थांचे सेवन पचनशक्ती नुसार मर्यादेतच करावे.

 

भगरीचे सेवन करतांना या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

 

·   भगर विक्रेत्यांसाठी सूचना

 

विक्रेत्यांनी पॅकबंद भगरचीच विक्री करावी. भगर खरेदी करतांना घाऊक विक्रेत्याकडून पावती घ्यावी.

भगरीचे पॅकेट, पोत्यावर उत्पादकांचा पत्ता,परवाना क्र., पॅकींग दिनांक, अंतिम वापर दिनांक असल्याची खात्री करून घ्या. मुदतबाह्य भगर किंवा भगर पिठाची विक्री करु नये. सुटी भगर व खुले भगर पिठ शक्यतो विक्रीसाठी ठेऊ नये.

 

अन्न व औषध प्रशासनाचेवतीने भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

वृत्त क्र. 211

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण 

नांदेड दि. 7 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 एप्रिल 2024 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छूक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी 27 मार्च 2024 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

या प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या 108 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 मार्च, 2024 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या बाजूस गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड नि कोड-431811,संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 7620304096 / 7219709633 वर संपर्क करावा, असेही कळविले आहे. 


या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येइल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत, उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधाण्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उतीर्ण उमेदवारांना तसेच पदवी धारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 पेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थिचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थिचे बँक खात्यामध्ये दर महा जमा करण्यात येणार असल्यामूळे प्रशिक्षणार्थिंचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

Wednesday, March 6, 2024

 वृत्त क्र. 210

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी

·         आदर्श आचारसंहिता,कायदा सुव्यवस्था, संदर्भात सक्त सूचना जारी

·         माध्यमातील पेड न्यूज, अफवा, समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर करडी नजर


नांदेड दि. ६ : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी गेल्या दोन दिवसात विविध बैठका घेऊन निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता, कायदा सुव्यवस्था आणि माध्यमांचा गैरवापर याकडे विशेष लक्ष वेधले आहे. याबाबत कुठलीही हयगय सहन केली जाणार नाही, असे सक्त आदेश त्यांनी जिल्ह्यातील यंत्रणेला दिले आहेत.



नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये या संदर्भात दोन दिवसात तीन बैठकी घेण्यात आल्यात. यामध्ये विभाग व विविध कक्ष प्रमुखांची प्रामुख्याने बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रशिक्षण व निर्धारित कर्तव्याची माहिती दिली गेली.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशिक्षण व व्यवस्थापन कक्ष, आचारसंहिता कक्ष, कायदा व सुव्यवस्था निवडणूक विषयक वेबसाईट तयार करणे, माहिती व व्यवस्थापन कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष, ईव्हीएम कक्ष, निवडणूक साहित्य स्वीकृती व वितरण कक्ष,टपाली मतपत्रिका कक्ष मतदार यादी कक्ष, संगणक, सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान कक्ष, वाहतूक व संपर्क व्यवस्था कक्ष, मतपत्रिका छपाई व वाटप कक्ष, सीव्हीजील पब्लिक हेल्पलाइन, उमेदवार राजकीय पक्ष निवडणूक खर्च विभाग, मीडिया कक्ष ( माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती ) निवडणूक निरीक्षक कक्ष, मतमोजणी कक्ष, मतदार जनजागृती अभियान कक्ष, निवडणूक कायदेविषयक कक्ष, मतदान केंद्रावरील सुरक्षा व सुविधा कक्ष, अशा विविध समित्यांची स्थापना जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.


या सर्व समित्यांचे कर्तव्य, घ्यायची दक्षता, कार्यपद्धत, काल मर्यादा, अधिकार आणि व्याप्ती याबाबतचे प्रशिक्षण या काळामध्ये देण्यात आले. विशेषतः आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होता कामा नये, याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्याचे काम काही गुन्हेगारी तत्वांकडून केले जाते. अनेक ठिकाणी निवडणूक यंत्रणा, ईव्हीएम मशीन मतपत्रिका कायदा सुव्यवस्था, यंत्रणाबद्दलची सुविधा या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरविल्या जातात. समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो मात्र, असा चुकीचा प्रसार मोडून काढण्याचे सूचना व असे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश, त्या संदर्भातील तरतुदी याची माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यातील सायबर सेल या संदर्भात अधिक दक्ष असून याबाबतीत तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता प्रत्येक यंत्रणेने तयार करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. माध्यमातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया या संदर्भात निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. आचार संहिता जारी झाल्यानंतर या संदर्भातील काटेकोर पालन करण्याबाबत सूचना प्रामुख्याने यावेळी देण्यात आल्या.

संविधानाच्या कलम 324 अनुसार भारत निवडणूक आयोगाकडे कोणत्याही कर्मचाऱ्यांची कुठेही सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. यंत्रणेतील अधिकारी हे निवडणूक आयोगाच्या वतीने काम करत असतात. त्यामुळे अतिशय गांभीर्याने निवडणूक कार्याला घेण्याचे त्यांनी सूचित केले .त्यामुळे एकदा नियुक्त करण्यात आल्यानंतर निवडणूक कर्तव्यात बदल करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नये, ड्युटी चार्ज बदलून मागू नये,अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी या काळात आपले सर्वोत्तम प्रयत्न प्रक्रियेत देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

0000

विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

 वृत्त क्र. 209

विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

नांदेड, दि. 6 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना राबवितांना येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व सहकार्य करण्यात येइल. जास्तीत जास्त विद्यार्थी/विद्यार्थीनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांची प्रसिध्दी व प्रचार करण्यासाठी नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी मनपाचे उपायुक्त दिवेकर, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, पोलीस निरीक्षक उदय खंडेराये, पोलीस निरीक्षक विजय पुरी, माणिकराव लोहगावे जिल्हा परिषद सदस्य, प्राचार्य बालाजीराव पांडागळे, शंकरराव राठोड, सचिन पवार, रवी जाधव, स्वरुप राठोड व नागरीक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.




कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले. विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजु लाभार्थ्यासाठी मोदी आवास घरकुल योजनेचे 23 हजार 598 उदिष्ट ठेवण्यात आले होते. 100 टक्के उदिष्ट पुर्ण केल्याचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्हयामध्ये 100 मुलांसाठी विष्णुपुरी याठिकाणी तर मुलींसाठी 100 क्षमतेचे शेतकरी चौकच्या पुढे दिपनगर याठिकाणी नवीन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त गरजु विद्यार्थी/विद्यार्थीनिनी प्रवेश घ्यावा असेही आवाहन केले.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमातंर्गत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग नांदेडच्या अधिनस्त असलेल्या देगलूर तालुक्यातून विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्राथमिक आश्रमशाळा, शिळवणी बॉर्डर तांडा देगलूर, हदगांव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पळसा व हिमायतनगर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पोटा बु. हिमायतनगर तालुक्यातून प्रत्येकी शाळेस दित्तीय क्रमाक प्राप्त झाला आहे. यावेळी आश्रशाळेचे मुख्याध्यापक यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे,  यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्राध्यापक धारशिव शिराळ यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे सादरीकरण केले.

0000


 वृत्त क्र. 208

छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे

'शिवगर्जना’ महानाट्य कुटुंबासोबत बघा : जिल्हाधिकारी

·         9,10,11 मार्चला गुरुद्वारा मैदान, हिंगोली गेटवर दररोज सायंकाळी ६.३० वाजता सादरीकरण

नांदेड, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी 9 10 व 11 मार्च रोजी नांदेडकरांना आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह या महा नाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राला अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.

राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे.   दि. 9,10,11 मार्च  2024 रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट (सर्कस ग्राउंड, रेल्वे स्टेशन शेजारी )नांदेड  येथे आबालवृद्धाना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे, अशी  माहितीही त्यांनी दिली.





या संदर्भात वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून दररोज दहा हजार नागरिकांना बसण्याची सुसज्ज व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी आज दिले. शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस हे प्रयोग होणार आहेत या प्रयोगाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः अंगणवाडी सेविका, जिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, आशा वर्कर व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असणाऱ्या आरोग्य यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आयोजन समितीला दिले आहेत. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

शेकडो कलाकारांचा सहभाग आणि शिवचरित्रातील लक्षवेधी प्रसंगांची शृंखला, घोडे, उंट यांचा कल्पक वापर, तत्कालीन लोक कलेचे चित्तथरारक सादरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे हे महानाट्य प्रत्येक कुटुंबाने बघावे असे, आवाहनही करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे.  यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले.  

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.

12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रयोगाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना छत्रपती शिवरायांवरील हे महानाट्य पहाता यावे यासाठी हदगाव, नरसी-नायगाव, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार, उमरी, भोकर या ठिकाणावरुन प्रेक्षकांना नांदेडला येण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी नांदेड बसस्थानकावरुनही जादा बसेसची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगितले आहे.

00000

जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत सूचना

 वृत्त क्र. 207

जागतिक महिला दिन  साजरा करण्याबाबत सूचना

नांदेड, दि. 6 :- दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभागानी आपापल्या स्तरावर या संदर्भातील नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड आणि जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांना पत्राद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी सूचना निर्गमित केली आहे. शासन परिपत्रकात दिलेल्या सुचनेप्रमाणे शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्याचा, केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

0000

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

 वृत्त क्र. 206

वृद्ध साहित्यिक व कलावंतानी बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी

संलग्न केल्याबाबतची माहिती 15 मार्चपर्यंत कळवावी

नांदेड दि. 5 :-  राजर्षी शाहू मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन 1954-55 पासून राज्यात सांस्कृतिक संचालनालयामार्फत राबविली जाते. शासनाने आता ही योजना डीबीटी मार्फत राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. डीबीटीमार्फत ही योजना राबविण्यासाठी सर्व वृद्ध कलावंताचे बँक खात्याशी मोबाईल व आधार क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वृध्द कलावंतानी आपल्या आपले बँक खाते मोबाईल व आधार क्रमांकाशी संलग्न करुन त्याबाबतची माहिती 15 मार्च 2024 पर्यत तालुक्याच्या पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

सांस्कृतिक विभागाने जिल्ह्यातील तालुकानिहाय वृध्द कलावंताची गुगल शिट तयार केली आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील वृध्द कलावंत एकूण संख्या 1 हजार 251 असून तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड-24, अर्धापूर-52, भोकर 79, हदगाव-96, हिमायतनगर -71, किनवट-36, माहूर -23, मुदखेड-56 , उमरी 33, नायगाव-187, मुखेड-93, बिलोली-89, कंधार-151, लोहा-77, धर्माबाद-177, देगलूर-65 आहे. कलावंताचे बँक खात्याशी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक संलग्न केलेली माहिती संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीने प्राप्त करुन घ्यावी अशा सूचना सांस्कृतिक संचालनालयाने दिल्या आहेत, संबंधितानी यांची नोंद घ्यावी.

जे वृध्द साहित्यिक व कलावंत त्यांचे बँक खाते आधार कार्ड व मोबाईल क्रमांक संलग्न करुन त्याबाबतची माहिती दिलेल्या मुदतीत सादर करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...