Thursday, January 18, 2024

 वृत्त क्र. 55

 

रस्ता सुरक्षा अभियानातर्गत

हेल्मेट जनजागृती रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 15 जानेवारी  ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. त्याअनुंषगाने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे उद्घाटन सकाळी 8.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

या रॅलीत परिवहन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक वाहन वितरक व सामान्य नागरिक इत्यादी सुमारे 200 ते 220 अधिकारी / कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. ही हेल्मेट रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील प्रमुख रस्ते व एसपी ऑफीस चौक, कलामंदीर, आयटीआय चौक, श्रीनगर, राज कॉर्नर मार्गे साठे चौक, जुना मोंढा कौठा, लातूर फाटा, सिडको मार्गे एकूण 21 किमीचे अंतर पार करत प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये 35 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

या कार्यक्रमास या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते. शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व सुभाषचंद्र मारकड हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मंजूषा भोसले, गणेश तपकीरे व  निलेश ठाकूर, संघपाल कदम सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या हेल्मेट रॅलीद्वारे ‘हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त नांदेड' असा संदेश नागरिकांना देण्यात आला.

0000







वृत्त क्र. 54

 

रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत ऊस वाहतूक

करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टव टेप लावण्यात आले

 

§  रस्ता सुरक्षेविषयी माहूर येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 दिनांक  15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 17 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषी मालाची व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर /ट्रेलर तसेच कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टव टेप लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

या उपक्रमांतर्गत कुंटूरकर शुगर्स लि. येथील 70 ट्रॅक्टर व ट्रेलर तसेच शहर व परिसरातील 30 कचरा वाहतुक करणारी वाहने व इतर 40 मालवाहू व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव टेप लावण्यात आले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरे, मंजुषा भोसले, सहायक मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, नंदकुमार सावंत व आशिष जाधव यांनी परिश्रम घेतले.

 

तसेच रस्ता सुरक्षा अभियान-2024 अंतर्गत श्रीक्षेत्र माहूर येथील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात  विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि उपस्थित नागरिकांना वॉक ऑन राईट, अपघात होवू नये यासाठी व अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुड सेमिरीटन व हेल्मेटयुक्त, अपघातमुक्त गाव संकल्पनांची उपस्थितांना ओळख देण्यात आली. विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबतची माहितीपुस्तिका व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी असे एकूण 280 ते 300 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सहायक मोटार निरीक्षक सचिन मगरे, निलेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना /वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

00000





 वृत्त क्र. 53

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी  रोजी सकाळी 6 वाजेपासूनते 19 फेब्रुवारी 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

Wednesday, January 17, 2024

वृत्त क्र. 52

 19 ते 21 जानेवारी या कालावधीत बचत गटातील

महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  महिला आर्थिक विकास महामंडळातर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रम व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 19 ते 21 जानेवारी 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत लोकमान्य मंगल कार्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट जवळ, नांदेड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास नागरिकांनी भेट देवून बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अनंत खेत्रे यांनी केले आहे.  

या भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात 35-40 विविध प्रकारच्या पदार्थाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या मेळाव्यात विविध विषयावर व्याख्यान, महिला प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांचा सन्मान केला जाणार आहे. या मेळाव्यात महिला बचत गटांनी बनविलेल्या जात्यावरील सर्व प्रकारच्या डाळी, तांदळाचे पापड, घर सजावटीच्या वस्तू, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, रेडीमेड कपडे व विविध प्रकारचे कपडे, तूप, लोणचे तसेच नाविण्यपूर्ण पदार्थ व इतर बऱ्याच वस्तू व पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

00000   

 वृत्त क्र. 51


विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून

पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा

- समन्वयक प्रशांत पाटील

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न मिळालेल्या वंचित लोकांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रा” या देशव्यापी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यात सर्वत्र शेवटच्या टप्याकडे वाटचाल करीत आहे. या टप्प्यात सर्व यंत्रणांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या अधिकाधिक योजना पोहोचवाव्यात असे आवाहन विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी केले.

 

विकसित संकल्प यात्रा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व प्रगतीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मंजुषा कापसे व विविध विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्ह्यात या मोहिमेदरम्यान आरोग्य शिबिराला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहून समन्वयक प्रशांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या मोहिमेच्या शिबिरात सिकलसेल, बीपी, शुगर, यासारख्या विविध आजाराच्या तपासण्या कराव्यात. आदिवासी भागातील गावामध्ये पौष्टिक आहाराचे महत्व कळावे यासाठी स्टॉल लावल्याने नागरिकांना आहाराचे महत्व कळेल असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या समन्वयातून ही यात्रा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यत पोहोचावी यासाठी सुयोग्य नियोजन केले आहे. या नियोजनातून जिल्ह्यात आतापर्यत केलेल्या विविध कामाचा व लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाचा प्रशांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व विभागांनी लाभार्थ्यांपर्यत दिलेल्या लाभाची व केलेल्या कामाची माहिती व छायाचित्रे शासनाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावीत असेही त्यांनी सांगितले.

 

या यात्रेचा जिल्ह्यातील शुभारंभ किनवट या आदिवासी भागापासून 15 नोव्हेंबर 2023 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला होता. आज पर्यंत ही यात्रा 1 हजार 310 गावांपैकी 853 गावात ही यात्रा पोहोचली, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

00000





Tuesday, January 16, 2024

वृत्त क्र. 48

सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2024 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या 15 दिवसांत ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.  

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये माळेगाव यात्रा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, 2 दिवस गणपती उत्सव (पहिला दिवस व अनंत चर्तुदर्शी), नवरात्री उत्सव (पहिला दिवस व अष्टमी व नवमी) दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल. 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दि. 16 ऑगस्ट  2016 रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

0000

 

 वृत्त क्र. 50 

कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी

जिल्ह्यात 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 17 व 18 जानेवारी रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिम कालावधीत जात प्रमाणपत्र अर्ज उपलब्ध करुन देणे व आवश्यक कागदपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करतील, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. कुणबी असल्याबाबतच्या नोंदी सर्व सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी नोंदीची यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. आढळून आलेल्या सर्व नोंदी जिल्हा संकेतस्थळावरही अपलोड केल्या आहेत. कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु आहे.

विविध कार्यालयात 1967 पूर्वीच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीअंती आढळून आलेल्या नोंदीचा अहवाल वेळोवेळी सादर केला जात आहे. नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी, आढळून आलेल्या नोंदीची यादी तलाठी व ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 

ग्रामपंचायत कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्याची व भरुन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण भरलेला अर्ज जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा सामाईक सुविधा केंद्रात दाखल करण्यासाठी अर्जदारांना मदत करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करणार आहेत.

 

नागरिकांनी प्रथमत: त्यांचेशी संबंधित नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.gov.in/en/talukawise-kunbi-records/ संकेतस्थळावर आपले पूर्वजांचे नावांचा शोध घ्यावा. संबंधित नोंदी सापडल्यानंतर संबंधित कार्यालयातून नोंदीची प्रमाणित प्रत मिळवावी. उदा. मोडी भाषेतील नमुना 33 व 34 साठी संबंधित तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, प्रवेश निर्गम उतारा संबंधीत शाळेतून तर खासरा पत्रक, क पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही इत्यादी अभिलेखांतील आवश्यक नोंदीच्या प्रमाणित प्रती संबंधित तहसिल कार्यालयातून विहित शुल्क भरणा करुन प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...